|| श्रीराम समर्थ ||
|| श्रीसद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज समर्थ ||
भगवंत कर्मयोग आचरण्याचे महत्त्व विशद करीत आहेत -
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादय: |
लोकसंग्रहमेवापि संपश्यन्कर्तुमर्हसि || गीता अ.३/२० ||
' जनकादि ज्ञानी पुरुषही ( आसक्तीरहित ) कर्मव्दारांच परमसिद्धीला प्राप्त झाले. यासाठी ( अर्जुना ) लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील कर्म करण्यासच योग्य आहेस.'
लोकसंग्रह व्हावा यासाठी कर्मयोग आचरला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना सन्मार्गाला लावण्यासाठी ज्ञानी (आत्मज्ञानी ) पुरुषाने लोकसंग्रहार्थ कार्य केले पाहिजे, लोकाभिमुख व्हायला पाहिजे. याच संदर्भात ज्ञानेश्वरांनी खालील ओवीत हाच आशय येक सुंदर दाखला देऊन सांगितला आहे.
मार्गी अंधासरिसा | पुढे देखणाही चाले जैसा |
अज्ञाना प्रकटावा धर्मू तैसा | आचरोनी || ज्ञा. अ. ३/१५६ ||
' रस्त्याने आंधळ्याच्या बरोबर पुढे चालणारा डोळस, आंधळ्यास सांभाळून घेऊन, त्याचे बरोबर चालतो, त्याप्रमाणे अज्ञानी मनुष्याला ज्ञान्याने आपण आचरण करून धर्म स्पष्ट करून दाखवावा. '
तुकामाईंनी श्रीमहाराजांना ज्या गोष्टी करण्याचा उपदेश केला, त्या जास्तीत जास्त लोकांना सन्मार्गाला, परमार्थाला लावण्यासाठीच होत्या हे ध्यानात येईल. श्रीमहाराजांनी सद्गुरूंचा अनुग्रह होताच उभ्या आयुष्यात जे जे केले त्यातून केवळ लोकसंग्रहच झाला नाही तर साधकाला उत्तम दिशादर्शन झाले.
तीर्थाटन आणि स्वगृही आगमन
श्रीमहाराज नैमिष्यारण्यातून अयोध्येस आले. तेथे त्यांची रामशास्त्री नावाच्या वेदांती पंडिताशी गाठ पडली. शास्त्रीबुवा सगुण उपासनेला तुच्छ व व्यर्थ मानीत असत. ' रामनामाने भवरोग नाहीसा होतो तेव्हा देहाचा रोग तर खात्रीने बरा होईल. ' हे श्रीमहाराजांचे सांगणे शास्त्रीबुवांनी प्रत्यक्ष अनुभवल्यावर त्यांचा भ्रमनिरास झाला.शास्त्रीबुवांच्या पत्नीची तब्येत अचानक खूपच बिघडल्यावर नामस्मरणाने तिला आराम पडला हे ध्यानी येताच त्यांनी श्रीमहाराजांना दंडवत घातला. त्यांची मुले काशीस रहात होती म्हणून मोठ्या आग्रहाने त्यांनी श्रीमहाराजांना काशीस नेले.
काशीमध्ये काही दिवस शास्त्रीबुवांच्या घरी राहिल्यावर श्रीमहाराजांनी आपला मुक्काम एका राममंदिरात हलविला. तेथे आईच्या सांगण्यावरून श्रीमहाराजांच्या दर्शनाला सहकुटूंब आलेल्या बंगालमधील निपुत्रिक जमीनदाराच्या पत्नीस रामनामाचा साडेतीन लाख जप करण्यास सांगून आशीर्वाद दिला. काशीमध्ये असताना एक चमत्कार घडला. एका तरुण दानशूर व्यापाऱ्याचे नवज्वराने अकाली निधन झाले. भारताच्या सर्व भागातून येणाऱ्या साधू, संत, बैरागी, यात्रेकरूना तो उदार आश्रय देत असे. त्याच्या अंत्ययात्रेसाठी मोठा जनसमुदाय लोटला. त्याची पत्नी सती जाण्यास सिद्ध झाली. श्रीमहाराज शास्त्रीबुवांच्या सांगण्यावरून तेथे आले. श्रीमहाराजांनी त्या पुण्यात्म्याच्या मुखात तीन वेळा ' श्रीराम ' म्हणून गंगाजल घातले तो काय आश्चर्य काही मिनीटातच तो व्यापारी झोपेतून जागा व्हावा तसे सावध होऊन उठून बसला. लोक श्रीमहाराजांचा जयजयकार करू लागले. त्यांच्या दर्शनासाठी एकच गर्दी उसळली हे पाहून श्रीमहाराजांनी एकदम गंगेत उडी मारली आणि ते नाहीसे झाले.
या घटनेनंतर श्रीमहाराज काशीहून प्रयागला आले. तेथे काही बैरागी महंताच्या शोधात होते. त्यांनी श्रीमहाराजांना आपला महंत केले. त्या सर्व मंडळींबरोबर श्रीमहाराज मथुरा-वृंदावनला आले. येथे एक वर्षाचा काळ लोटला असेल. काशी येथे असताना ज्या बंगाली जमीनदाराला आशीर्वाद दिला होता त्याला मुलगा झाला. तो जमीनदार श्रीमहाराजांना भेटण्यासाठी उत्सुक होता. त्याने श्रीमहाराजांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी तीर्थक्षेत्री माणसे पाठविली. मथुरेत त्याच्या माणसांना श्रीमहाराज भेटताच त्यांनी जमीनदाराचे कलकत्त्याला येण्यासाठीचे आमंत्रण श्रीमहाराजांना सांगितले. त्या आमंत्रणाचा स्विकार करत श्रीमहाराज सर्व मंडळींसह कलकत्त्यात दाखल झाले. जमीनदाराने श्रीमहाराजांसाठी काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त करताच श्रीमहाराजांनी त्याला हरिहाट करण्यास सांगितले. हरिहाट म्हणजे भगवंत प्राप्तीच्या साधनांचा समारंभपूर्वक केलेला साप्ताह. या सात दिवसांच्या काळात सर्वांसाठी अन्नछत्रही असते. श्रीमहाराजांच्या आज्ञेनुसार जमीनदाराने हरिहाटाचा घाट घातला. यानिमित्त दानधर्म आणि अन्नदानही मोठ्या प्रमाणात झाले. श्रीमहाराजांना अग्रपूजेचा मान देण्यात आला. त्यांची हत्तीवरून मिरवणूकही काढण्यात आली.
हरिहाट संपल्यावर खूप लोक श्रीमहाराजांच्या दर्शनास येऊ लागले. श्रीमहाराजांना निजायाला किंवा बसायलाही फुरसत मिळेना. चार-सहा दिवस झाल्यावर जमीनदाराचा निरोप घेऊन श्रीमहाराज एक दिवस रात्री कोणालाही न सांगता कलकत्त्याहून निघाले. सातपुड्यात भ्रमंती करीत नर्मदेच्या काठाकाठाने प्रवास करीत इंदूरमध्ये आले. या काळात श्रीमहाराजांची विलक्षण अवस्था होती. बोलता बोलता, बघता बघता त्यांची समाधी लागत असे. एका डबक्याच्या चिखलामध्ये अशा समाधी अवस्थेत त्यांना एका गवळ्याने पहिले. त्या गवळ्याने श्रीमहाराजांना स्वच्छ पाण्याने धुवून एका मारुती मंदिरात उचलून नेऊन ठेवले.
गावाबाहेर फिरायला गेलेल्या इंदूरमधील एका श्रीमंत इनामदारास मारुती मंदिरात श्रीमहाराज दिसले. तो कोणी सिद्धपुरुष आहे असे वाटून त्याने त्यांना साष्टांग नमस्कार घातला व आपल्या बागेत रहायला येण्याची विनंती केली. त्याचा भाव पाहून श्रीमहाराज त्याच्या बरोबर बागेमध्ये गेले.
इनामदारांची पत्नी जिजीबाई मोठी विलक्षण बाई होती. नवऱ्याने बागेमध्ये आणलेल्या श्रीमहाराजांची परीक्षा घेण्याचे ठरविले. त्यांना लालभडक तिखटाचे लाडू खायला घातले. श्रीमहाराजांनी ते सगळे लाडू खाल्ले आणि ' आणखी दे ' असे म्हणताच जिजीबाई ओशाळली. दुसरे दिवशी जळते निखारे परातीत घातले व श्रीमहाराजांपुढे खाण्यासाठी ठेवले. ते निखारेही तितक्याच शांतपणे श्रीमहाराजांनी खाल्ले व ' आणखी दे ' असे म्हणताच जिजीबाईची बोबडी वळली. डोळ्यातून पश्चात्तापाने अश्रूधारा वाहू लागल्या. श्रीमहाराज हे सिद्धपुरुष असल्याची खात्री पटली. शरण येत तिने श्रीमहाराजांचे पाय धरले.श्रीमहाराजांनी तिला रामनाम दिले आणि नामस्मरण करण्यास सांगितले.
इंदूरयेथील वास्तव्यात श्रीमहाराजांनी अनेकानेक लोकांना नामस्मरण करण्याचा उपदेश केला. इंदूरचे राजेही श्रीमहाराजांचे अनुग्रहीत झाले.श्रीमहाराजांचे नाव सर्वतोमुखी झाले. इनामदार, त्यांची पत्नी जिजीबाई, त्यांची मुलगी ताई, नेमाने श्रीमहाराजांना धारोष्ण दुध देणारा गवळी या साऱ्यांवर श्रीमहाराजांचा विशेष लोभ होता. काहीतरी निमित्त करून ' मला आता जायला हवे ' असे सांगून श्रीमहाराजांनी ' मी पुन्हा लवकरच येईन.' असे आश्वासन देऊन प्रेमाने सर्वांचा निरोप घेतला आणि लगेचच इंदूर सोडले.
इंदूरहून मजल दरमजल करित वाटेत मोठी तीर्थे पहात श्रीमहाराज गोंदवल्यास आले. नदीकाठच्या मारुती मंदिरात त्यांनी मुक्काम ठोकला. त्यांच्या बरोबर चार बैरागी शिष्यही होते. श्रीमहाराजांची प्रसन्न मुद्रा, बैराग्याचा वेश, तेज:पुंज व मजबूत शरीर पाहून लोकांना ते महात्मा वाटले. गावातले सर्व लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. संध्याकाळचे वेळी गीताबाई व रावजी हेही दर्शनासाठी दर्शनासाठी आले. त्यांना दुरून येताना पाहताच श्रीमहाराजांनी मनोमन साष्टांग नमस्कार घातला. गीताबाई- रावजींनी बैरागी वेशातील श्रीमहाराजांना , आठ वर्षापूर्वी घरातून निघून गेलेल्या मुलाबद्दल विचारणा केली. गोसाविबुवा म्हणाले ' असा मुलगा मी पहिला आहे. तो सध्या तीर्थयात्रा करित फिरत आहे. तो सुखरूप आहे. तुम्ही नामस्मरण करित रहा म्हणजे एका वर्षाने तो तुम्हाला नक्की भेटेल. ' दुसरे दिवशी भल्या पहाटे गावामधले कोणी उठण्याच्या आधीच श्रीमहाराज गोंदवल्यातून निघून गेले.
गोंदवल्याहून श्रीमहाराज खातवळला आपल्या सासुरवाडीला गेले. तेथेसुद्धा लोक दर्शनाला येऊ लागले. श्रीमहाराजांच्या सासूबाई मुलीला घेऊन गोसाविबाबांच्या दर्शनाला आले. सासूबाईंनी विचारले ' माझ्या मुलीचा घरधनी केव्हा परत येईल ? ' गोसाविबुवा म्हणाले ' तुम्ही अखंड नामस्मरण करावे. मुलीचा घरधनी सुखरूप आहे. तो लवकरच परत येईल. 'त्या दोघींना दिलासा मिळाला.
श्रीमहाराज खातवळहून निघून डाम्बेवाडीला गेले. तेथे त्यांची चुलतबहिण भीमाबाई दिलेली होती. तिचे दारी भिक्षेसाठी गेलेअसता तिने श्रीमहाराजांना ओळखले. 'गणू ' म्हणून हंबरडा फोडला आणि ती रडू लागली. तिचे सांत्वन करून, ' तीर्थयात्रा संपवून मी लवकरच येईन ' असे सांगून मागे वळून न पाहता जसे आले तसेच पाहता पाहता निघून गेले.
श्रीमहाराज तेथून श्री समर्थांच्या दर्शनास सज्जनगडावर गेले. नंतर तेथून रामेश्वरला जाण्यासाठी निघाले. वाटेत तिरुपतीला बालाजीचे दर्शन घेतले. प्रवासात एका मरणासन्न भिकाऱ्याची रामेश्वर दर्शनाची प्रबळ इच्छा पाहून शिष्यांच्या मदतीने त्याला उचलून बरोबर नेले. त्याला देवाच्या पायावर घातले. तेथेच त्याने प्राण सोडला.
रामेश्वरहून श्रीमहाराज वरदराजाच्या दर्शनासाठी कांचीला गेले. तेथे एका चांदीच्या व्यापाऱ्याची भेट झाली. त्याला मुलबाळ नव्हते. ते नवरा-बायको श्रीवरदराजाचे उपासक होते. व्यापाऱ्याची पत्नी महासाध्वी होती. नेहमी साधनेत मग्न असे. श्रीमहाराजांना भेटल्यावर तिला मुलगा भेटल्याचा आनंद झाला. श्रीमहाराजांना पहिले की, तिच्या अंत:करणात मातृप्रेमाचा उमाळा येई आणि तिच्या स्तनातून दुध वाहू लागे. तीन दिवसानंतर मोठ्या जड अंत:करणाने श्रीमहाराजांनी त्यांचा निरोप घेतला.
स्वगृही आगमन -
श्रीमहाराज नंतर येहळेगावला जाऊन तुकामाईंचे दर्शन घेऊन बरोबर एक वर्षाने पुन्हा गोंदवल्यास परत आले. ' जय जय रघुवीर समर्थ ' असे म्हणत आपल्या घरासमोर आले.आईने प्रथम त्यांना ओळखले नाही. पण दोघांची दृष्टादृष्ट होताच श्रीमहाराज आईकडे पाहून हसले, त्याबरोबर तिने एकदम त्यांना ओळखले आणि कडकडून मिठी मारली. डोळ्यातून आनंदाश्रूंचा पूर वहात होता. श्रीमहाराजांचेही डोळे पाणावले. इतक्यात रावजी तेथे आले. श्रीमहाराजांनी वडिलांना साष्टांग नमस्कार घातला. घरातील सर्व मंडळी जमा झाली. जिकडे तिकडे आनंदाचे वातावरण पसरले. बरोबर नऊ वर्षांनी श्रीमहाराज घरी परत आले होते. बालपणीचे मित्र भेटावयास येत होते.
श्रीमहाराजांचा वेश अजून तसाच म्हणजे कौपीन, विभूती, जटा, दाढी, हातात माळ व कुबडी आणि पायी खडावा असा होतो. ' पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे. ' अशी वार्ता सर्वत्र पसरली आणि आजूबाजूच्या गावातील शेकडो लोक श्रीमहाराजांच्या दर्शनास येऊ लागले. नामस्मरणाचे महत्त्व सांगून रामनामाचा जप करण्याचा उपदेश श्रीमहाराज सर्वांना करीत असत.
गृहस्थाश्रम विधीसाठी श्रीमहाराजांनी जटाभार उतरविला. यानिमित्त विपुल अन्नदान श्रीमहाराजांच्या घरी झाले. श्रीमहाराज पत्नीस आणण्यासाठी सासऱ्यांच्या बरोबर खातावळला गेले. चार दिवस राहून श्रीमहाराज पत्नीस घेऊन गोंदवल्यास परत आले.
श्रीमहाराजांची पत्नी सरस्वती मोठी सुलक्षणी, नकाडोळ्यांनी सुरेख आणि चतुर स्त्री होती. श्रीमहाराजांच्या सारखा पती आपल्याला मोठ्या भाग्याने मिळाला याबद्दल तिला धन्यता वाटे. भगवदभजन, नामस्मरण व अन्नदान या तीन गोष्टींनी आपल्या घराला मंदिराची शोभा यावी हा जो श्रीमहाराजांचा हेतू तो आपल्याकडून पार पडावा हि तिची मनापासून इच्छा असे. श्रीमहाराजांचेही तिच्यावर अत्यंत प्रेम होते. श्रीमहाराजांच्या आई, गीताबाईंना श्रीमहाराजांचा प्रपंच पाहून खूप समाधान वाटत असे. श्रीमहाराजांनी घराची कुलकर्णीपणाची वृत्ती सांभाळण्याचे आश्वासन आईला देताच तिला फार आनंद झाला.
रावजींकडून सर्व दप्तर श्रीमहाराजांनी स्वत:कडे घेतले. त्याकाळी कुलकर्णीपणाला गावाच्या दृष्टीने फार महत्त्व असे. कुलकर्णीपणाची सर्व कामे श्रीमहाराज अप्रतिमपणे करू लागले.
दप्तर सांभाळण्यास लागून जेमतेम चार महिने झाले असतील तोच एके दिवशी आईला ' आपण या कामाला कंटाळलो ' असे सांगून बदली दुसरा मनुष्य देऊन कुलकर्णीपणाच्या व्यापातून आपण मोकळे झाले. श्रीमहाराजांचे वय या सुमारास २८-२९ च्या आसपास होते. ते गोंदवल्यास सतत रहात नसत. गोंदवले भोवतालच्या लहान मोठ्या गावाला या ना त्या निमित्ताने जात असत. तेथील लोकांना भगवंताच्या नामाकडे वळवण्याच्या प्रयत्नात ते असत. या सुमारास भाऊसाहेब केतकरांचा परिचय झाला. भाऊसाहेब केतकर सरकारी नोकरीत होते. प्रथम भेटीतच श्रीमहाराजांनी त्यांना आपलेसे केले.
श्रीमहाराज पत्नीसह पुन्हा गुरुभेटीला निघाले. ते येहळेगावला पोचले त्यावेळी श्रीतुकामाई घरीच होते. उभयतांनी श्रीतुकामाईना वाकून नमस्कार केला. त्या दोघांना पाहून श्रीतुकामाईंना खूप आनंद झाला. त्यांनी त्या दोघांना आठ दिवस ठेऊन घेतले. निघायचे वेळी सरस्वती पाया पडायला आली त्यावेळी श्रीतुकामाईंनी तिला सहज विचारले, ' माय, तुला काय पाहिजे ? ' ती म्हणाली ' यांच्यासारखा मला मुलगा व्हावा एवढीच माझी इच्छा आहे.' हे तिचे मागणे ऐकून गुरु व शिष्य दोघेही हसले.पण श्रीतुकामाई ' तथास्तु ' असे बोलले. आणि निरोप दिला. श्रीमहाराजांना स्वत:साठी काही मागणे तेही एका अशाश्वत गोष्टीचे मागणे हे मुळीच रुचले नाही. 'त्यांच्या कृपेने मुलगा होईल पण तो अल्पायुषी होईल ! ' असे त्यांनी पत्नीस सांगताच तिला आपली चूक उमगली. तिला पश्चात्ताप झाला हे पाहून तिला योगदीक्षा देण्याचे ठरवले आणि तिला घेऊन नाशिकला गेले.
नाशिकला आल्यावर श्रीमहाराजांनी पत्नीस जोगीण बनविली. तिला योगदीक्षा दिली. त्यांनी तिला सिद्धासन घालण्यास शिकविले. तिला काही योगमुद्रा सांगितल्या. श्वासाबरोबर नाम घ्यायला शिकविले. मानसपूजा शिकवून तिची धारणा दृढ केली. सहा महिन्यात भगवंताचे ध्यान लावता येण्यापर्यंत तिची तयारी झाली. नाशिकमधील हा काळ दोघांनी फार आनंदात, नामस्मरणात घालविला. सरस्वतीची वृत्ती नामस्मरणात तल्लीन होऊ लागली हे पाहिल्यावर तिची समजूत घालून तिला घरी परत पाठविले व स्वत: श्रीमहाराज उत्तरेकडे निघून गेले.
श्रीमहाराजांची पत्नी गोंदवल्यास परत आल्यावर आपला ध्यानधारणेचा अभ्यास तिने पूर्ववत चालू ठेवला. नामस्मरण तर सारखे चालू असे. आपल्या मानसपूजेमध्ये ती श्रीमहाराजांची पूजा करित असे.
इकडे श्रीमहाराज नाशिकहून इंदूर, काशी , अयोध्या असा प्रवास करत नैमिष्यारण्यात गेले. तेथे काही काळ ध्यानधारणा करून जवळपास दहा महिन्यांनी गोंदवल्यास परत आले.
सन १८७६-७७ साली फार मोठा दुष्काळ पडला होता. सरकारचे प्रयत्न अपुरे पडत होते. श्रीमहाराज या काळात गोंदवल्यास होते.श्रीमहाराजांनी आपल्या शेतात दुष्काळी कामे सुरु केली. काम करणाऱ्याला रोज एक भाकरी आणि वाडगाभर आमटी मिळायची. श्रीमहाराजांनी आपली धान्याची कोठारे उघडी केली.रोज दीडहजार माणसे अन्न घेऊन जात. भुकेने व्याकूळ झालेले जीव पाहून श्रीमहाराजांना खूप दु:ख होत असे.
भारतवर्षात इंग्रजांच्या विरुद्ध क्रांतीचा प्रयत्न करणाऱ्या पुरुषांमध्ये वासूदेव बळवंत फडके यांचे नाव अग्रगण्य आहे. दुष्काळात गरिबांच्यासाठी सर्वस्व त्याग करण्यास सिद्ध झालेल्या श्रीमहाराजांना बघून वासूदेव बळवंताना फार आनंद झाला. क्रांतीला मदत व आशीर्वाद घेण्यासाठी श्रीमहाराजांना भेटण्यासाठी वासूदेव बळवंत गोंदवल्यास आले. श्रीमहाराजांनी काळ अनुकूल नसल्याने त्यांना बंडापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची समजूत न पटल्याने ते तडक पुण्याला निघून गेले.
याच सुमारास सरस्वतीला दिवस राहिले. नऊ महिने पूर्ण होऊन ती बाळंत होऊन तिला मुलगा झाला. तो हुबेहूब श्रीमहाराजांसारखा दिसे. मुलगा अल्पायुषी ठरला. एक वर्षाच्या आतच मुलगा मरण पावला.नंतर थोड्याच दिवसांनी सरस्वतीला ताप येऊ लागला. तापाचा जोर विशेष नव्हता पण तो हटत नव्हता. तिचा अन्तकाल समीप आल्याचे श्रीमहाराजांनी ओळखले व तिला त्याची कल्पना दिली. नामस्मरण करता करता तिने सिद्धासनात रामनाम घेत शांतपणे प्राण सोडला.
सरस्वती वारल्यावर श्रीमहाराज प्रवासाला निघून गेले. जिजीबाई फार आजारी आहे असे समजल्यावरून ते इंदूरला गेले. याच सुमारास रावजींचे देहावसान झाले. वडिलांच्या दहाव्यासाठी श्रीमहाराज अचानक गोंदवल्यास आले. ज्येष्ठ पुत्र या नात्याने श्रीमहाराजांनी उत्तरक्रिया विधी केले.
तीन-चार महिने झाल्यावर त्या काळच्या रिवाजाप्रमाणे श्रीमहाराजांना मुली सांगून येऊ लागल्या. या वेळी श्रीमहाराजांचे वय ३०-३२ असावे. आईच्या आग्रहाखातर श्रीमहाराजांनी पुन्हा लग्न करण्याचे मान्य केले. गोंदवल्यापासून काही दूर अंतरावर असलेल्या आटपाडी गावच्या सखाराम देशपांडे यांच्या जन्मांध मुलीशी श्रीमहाराजांनी दुसरा विवाह केला. दुसऱ्या पत्नीचे नावही सरस्वती असे ठेवले. लग्न झाल्यावर श्रीमहाराज चार-सहा महिने गोंदवल्यास राहिले. याच काळात श्रीमहाराजांच्या धाकट्या भावाचे निधन झाले. पाठोपाठ काही दिवसातच श्रीमहाराजांची धाकटी बहिण मुक्ताबाई वारली. अशा रीतीने थोड्या काळामध्ये घरातील चार माणसे मृत्युमुखी पडली. गीताबाईंना अतोनात दु:ख झाले.
श्रीमहाराजांच्या वडिलोपार्जित पुष्कळ जमिनी होत्या. भाऊबंदानी जमिनी संबंधात तंटे उपस्थित केले. भांडणे उकरून काढली. श्रीमहाराजांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.या साऱ्याचा श्रीमहाराजांवर काहीही परिणाम झाला नाही.
पंढरपूरच्या भडगावकर वैद्यांकडे श्रीमहाराजांचे जाणेयेणे विशेषत्वे असे. भडगावकर मंडळींच्यापैकी अप्पासाहेब यांनी तर श्रीमहाराजांना सर्वस्व अर्पण केले.
अलिबागच्या सदूभाऊ लेलेंचीही श्रीमहाराजांच्यावर आत्यंतिक श्रद्धा होती. सदूभाऊंनी श्रीमहाराज त्यांचे घरी मुक्कामास असताना त्यांना सोन्याच्या पत्र्याने मढवलेला एक तुंबा भेट दिला. श्रीमहाराजांनी तो हातात घेतला आणि त्यांच्या समोरच आपटून फोडून टाकला व तडक तेथून निघून गेले.
अलिबागहून श्रीमहाराज उत्तरेकडे जाण्यास निघाले. वाटेमध्ये अबूच्या जंगलातून जात असता भिल्ल लोकांच्या टोळीने त्यांना घेरले. त्यांची प्रसन्न आणि तेजस्वी मुद्रा आणि धीरगंभीर वृत्ती पाहून त्यांना शरण गेले. श्रीमहाराजांनी त्या सर्वांना अनुग्रह दिला. नामस्मरणाची दीक्षा दिली.चोऱ्या करण्यापासून परावृत्त केले.
नर्मदेच्या किनाऱ्याने पुढे जात असता महेश्वर नावाच्या गावी दोन मांत्रिकांची गाठ पडली. श्रीमहाराजांना काहीतरी मंत्रसिद्धी अवगत आहे असा त्यांचा समज झाला. श्रीमहाराजांनी मंत्रसिद्धी त्या दोघांना शिकवावी अशी गळ घातली.श्रीमहाराजांनी त्यांना आपल्याजवळ रामनामाखेरीज कसलाही मंत्रतंत्र अवगत नसल्याचे सांगूनही त्या दोघांची समजूत पटली नाही. त्यांनी श्रीमहाराजांना नागपाश बंधनात टाकले. त्यातून मुक्त करावे यासाठी श्रीमहाराजांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. अखेरीस श्रीमहाराजांनी डोंगराच्या कड्यावरून खाली उडी घेताच नाग छिन्नविच्छिन्न होऊन मरून पडले, आणि श्रीमहाराज मोकळे झाले. त्या दोघा मांत्रिकांना पश्चात्ताप झाला. ते शरण येऊन श्रीमहाराजांच्या पाया पडले. श्रीमहाराजांनी त्यांना क्षमा केली व रामनामाची दीक्षा दिली. मंत्रतंत्राच्या आहारी न जाण्याचा उपदेश केला. त्यांच्यापैकी एक तेथेच थांबला तर दुसरा, ज्याचे नाव सच्चिदानंद होते, तो श्रीमहाराजांच्या बरोबर पुढील प्रवासास निघाला.
श्रीमहाराज उज्जैनला आले. पूर्व परिचित सर्व मंडळी जमा झाली. छान सत्संग घडला. नामस्मरण, भजन, कीर्तन, वेदांतश्रवण व अन्नदान यांचा धडाका सुरु झाला. याच मुक्कामात एका मोठ्या सरकारी अधिकाऱ्याने श्रीमहाराजांना जेवणाचे निमंत्रण दिले. हेतू श्रीमहाराजांची परीक्षा घेण्याचा होता. घडले असे कि त्याच सुमारास त्यांचा मुलगा विषमाने आजारी पडला. श्रीमहाराज जेवायला आले त्या दिवशीच त्या मुलाचे प्राणोत्क्रमण झाले. रावसाहेबांच्या पत्नीने भर पंक्तीत त्याचे प्रेत आणलेले पाहून सर्वच चक्रावले. श्रीमहाराज शांत होते. त्यांनी मुलाला आपल्या मांडीवर घेतले. मुलाच्या आईला मुलास मात्रा चाटविण्याची आज्ञा केली. श्रीमहाराजांनी मुलास हाक मारण्यास सुरुवात केली. तिसरी हाक ऐकताच मुलाने डोळे उघडले आणि थोडी हालचाल केली. सर्वजण अचंबित झाले. रावसाहेबांनी श्रीमहाराजांच्या पायावर लोळण घेतली. त्यानाही रामनाम दिले. श्रीमहाराज सांगत, रावसाहेब पुढे फार योग्यतेला पोचले.
श्रीमहाराज उज्जैनमध्ये आहेत हे कळताच जिजीबाई तेथे आली. मोठ्या हट्टाने आणि आग्रहाने त्यांना इंदूरला घेऊन गेली. तेथे पूर्वीचा गवळी त्यांना भेटला. त्याचा अंतकाळ श्रीमहाराजांनी साधला. श्रीमहाराजांच्या मांडीवरच त्याने प्राण सोडला.
जिजीबाईची मुलगी ताई मुळातच अशक्त होती. लग्नानंतरही ती फारशी सुधारली नाही. त्यात तिला दिवस गेले. डॉक्टरांनी रक्तक्षयाचा संशय व्यक्त केला. श्रीमहाराजांवर अपार श्रद्धा, अखंड नामस्मरण आणि श्रीमहाराजांच्या कृपेने ती सुखरूप बाळंत झाली.
जिजीबाईच्या भावाच्या ओळखीने एक प्रोफेसर श्रीमहाराजांच्याकडे येऊ लागला. तो बुद्धिमान असला तरी अश्रद्ध होता, परंतु तितकाच प्रामाणिक होता.सुरुवाती सुरुवातीला तो श्रीमहाराजांशी वाद घालत असे. पण श्रीमहाराजांना जवळून समजून घेतल्यावर त्याचा भ्रम दूर झाला. त्यालाही श्रीमहाराजांनी रामनामाची दीक्षा दिली. ' श्रीरामरायाशी त्याचे संभाषण होत असे इतकी त्याची तयारी झाली.' असे श्रीमहाराजांनी स्वत:च एकदा सांगितले.
जिजीबाईंच्या कुटुंबाशी घनिष्ठ संबंध असलेले मोडक नावाचे श्रीमंत गृहस्थही श्रीमहाराजांचे अनुग्रहीत होते. त्यांचा मुलगा हरी ज्याला सर्वजण भैय्यासाहेब म्हणत असत. त्याचे श्रीमहाराजांवर विलक्षण प्रेम होते. तो चोवीसतास श्रीमहाराजांच्या बरोबर राहू लागला. भय्यासाहेब मोडकांच्या ओळखीने त्यावेळचे इंदूरचे दिवाण रावसाहेब पळशीकर यांचे श्रीमहाराजांकडे येणेजाणे सुरु झाले. त्यांच्या सांगण्यावरून इंदूरचे राजे तुकोजीराव होळकरही श्रीमहाराजांना भेटले. त्यांच्यावरही श्रीमहाराजांची कृपा झाली. त्यानाही श्रीमहाराजांनी नामस्मरणात राहण्याचा उपदेश केला.
इंदूरच्या याच मुक्कामात श्रीआनंदसागर व श्रीब्रह्मानंद या दोघांची श्रीमहाराजांशी गाठ पडली. हा मुक्काम जरा जास्तच लांबला. श्रीमहाराज जेथे रहात तेथे भजन, नामस्मरण आणि अन्नदान धडाक्याने सुरु होई. अनेक प्रकारचे, अनेक प्रांतीचे लोक श्रीमहाराजांकडे येऊन समाधान पावत व परत जाताना 'नाम ' घेऊन जात.
श्रीमहाराजांनी इंदूरहून आपल्या गुरूंच्या दर्शनासाठी येहळेगावला जायचा विचार बोलून दाखवताच जिजीबाई आणि भय्यासाहेब मोडक यांनी सद्गुरूंच्या भेटीसाठी बरोबर घेऊन जाण्याची विनंती केली. श्रीमहाराजांनी दोघानाही बरोबर घेतले आणि सर्व मंडळींनी इंदूर सोडले. जवळ जवळ एक महिन्याने ते येहळेगावला पोहोचले. श्रीतुकामाईंना पाहिल्यावर श्रीमहाराज, जिजीबाई व भय्यासाहेब मोडक या सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. श्रीतुकामाईंचे आशीर्वाद घेऊन श्रीमहाराज सर्व मंडळींसह गोंदवल्यास आले.
|| जय जय रघुवीर समर्थ ||
No comments:
Post a Comment