Friday, April 29, 2011

श्रीमहाराज ' नामावतार ' - १०



|| श्रीराम समर्थ ||
   || श्रीसद्गुरु  ब्रह्मचैतन्य महाराज समर्थ ||

          भगवंत, ईश्वरभजन कसे करायचे याचा खुलासा करताना त्या भजनाचे स्वरूप सांगतात.-
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु |
                           मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायण: || गीता अ. ९-३४ ||
          तू माझ्याच ठिकाणी मन ठेवणारा असा हो, मला नित्य भजणारा असा माझाच भक्त हो, माझे पूजन करणारा हो आणि मलाच नमस्कार कर. याप्रमाणे चित्ताला माझ्या ठिकाणी समाहित करून मत्परायण झालेला -मला शरण होऊन राहणारा तू मलाच प्राप्त होशील - तू मलाच येऊन मिळशील. 
          श्रीमहाराज राममय, भगवंतमय झाले होते. श्रीमहाराज भगवद्रूप झाले होते. त्यांचे मन, त्यांचे भजन, त्यांचे पूजन, त्यांचा साष्टांग दंडवत प्रणाम हा शरणागत भावाने रामचरणी समर्पित होता. श्रीमहाराज रामरायाशी तन्मय झालेले होते. 
राममय श्रीमहाराज -
          श्रीमहाराज काशीयात्रेच्या परतीच्या प्रवासात हर्दा येथे काही दिवस राहून बरोबरच्या सर्व मंडळींना घेऊन गोंदवल्यास परत आले. सन १९०७ मध्ये, जवळपास अडीच वर्षे चाललेली काशीयात्रा संपवून ते घरी परत आल्याने गोंदवल्यात सर्वत्र आनंद पसरला. 
          यासुमारास श्रीमहाराजांचे वय बासष्ठ  होते. ' गोंदवलेकर महाराज ' म्हणून सर्वत्र त्यांची कीर्ती पसरली होती. समाजाच्या सर्व थरांमध्ये त्यांचे शिष्य होते. श्रीमहाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या आणि गोंदवल्यास रहावयास येणाऱ्या माणसांची संख्या दर दिवसागणिक वाढत होती. गोंदवल्यात सर्वत्र, सर्वकाळ नामाचा गजर व घोष ऐकावयास मिळत होता.नाम  घेणाऱ्यात लहान, थोर, गरीब, श्रीमंत, विद्वान पंडित, अशिक्षित, स्त्री, पुरुष, चांगले, वाईट असे सर्वजण होते. मंदिरामध्ये रोजच उत्सवाचे वातावरण असे. रामनाम हे सर्वांचे साधन होते. श्रीमहाराज जातीने सर्वांची विचारपूस करीत. अन्नदान नित्य नेमाने चाले. गोंदवल्यास आलेला मनुष्य प्रसादाचे भोजन केल्याशिवाय जाणार नाही यावर श्रीमहाराजांचा कटाक्ष असे. अन्न सर्वांना एक असे. रोजच्या जेवणात राळ्याचा भात, जोंधळ्याची किंवा बाजरीची भाकरी आणि तिखट आमटी असे पदार्थ असत. सणावारी एखादे पक्वान्न असे. गोंदवलेच्या पंचक्रोशीत लोकांना श्रीमहाराजांचा आधार वाटत असे. गरिबांचे ते तारणहार होते. दरिद्री स्त्रीपुरुषांना श्रीमहाराज मायबापासमान  होते. 
          श्रीराममंदिरातील रामरायाची मूर्ती ही श्रीमहाराजांसाठी प्रत्यक्ष परमात्मा असल्याची जाणीव होती. जीवनातील प्रत्येक क्रिया रामाकरिता, जगणे रामाच्या सेवेसाठी हा भाव त्यांच्या प्रत्येक कृतीत आणि उपदेशात व्यक्त होत असे. सगुणोपासनेतच भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होते आणि म्हणून त्याच्या अनुसंधानात जीवनातील प्रत्येक क्षण जावा यासाठी रामरायाची मूर्ती प्रेरणा देते अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला ते सांगत की, ' अरे, माझ्या रामाला एकदा डोळे भरून पहा आणि मग घरी जा.' जगात जे जे चांगले वाईट घडते ते रामरायाच्या इच्छेने घडते. जे जे फळ आपल्या प्रयत्नांना मिळते तेही रामरायाच्या इच्छेने मिळते अशी श्रद्धा ठेवण्यास ते सर्वांना सांगत. सर्व काही राम करतो, खरे कर्तेपण रामाचे, हा श्रीमहाराजांच्या उपदेशाचा गाभा होता. भगवंताकडे कर्तृत्व देऊन मीपणाने आपण नाहीसे होणे हे प्रत्येकाच्या मनी ठसावे म्हणून त्यांनी जन्मभर रामरायाला लोकांच्यासमोर ठेवले. 
          परंतु लोक गोंदवल्यास श्रीमहाराजांच्या दर्शनाला येत. गोंदवल्यास येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना राममय श्रीमहाराज रामरूप आणि पूज्य वाटत, आणि म्हणून त्यांची सेवा आपल्या हातून घडावी म्हणून प्रत्येकाची धडपड असे. श्रीमहाराज त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला सांगत, ' प्रथम रामाला नमस्कार करून यावे, नंतर इतरांना नमस्कार करावा. ' 
श्रीमहाराजांचा वाढदिवस - श्रीमहाराजांच्या वाढदिवसानिमित्त श्रीखंड करावे असे श्रीब्रह्मानंदांना वाटले आणि म्हणून त्यांनी त्यासाठी पैसे गोळा केले. ही गोष्ट श्रीमहाराजांना कळल्यावर ते रागावले आणि पैसे परत करण्यास सांगून म्हणाले, ' आपल्या रामाला काय कमी आहे ! असे गोळा करून कसे पुरे पडेल ? देणाऱ्याने स्वखुशीने दिले तर टाकू नये, परंतु आपण त्यांच्याजवळ कधी मागू नये. त्यात आपल्या उपासनेला कमीपणा आहे. आपण मागावे फक्त रामाजवळ ! तो देईल अथवा न देईल. जे होईल त्यामध्ये समाधान मानावे. '  
गोरक्षणार्थ गोशाळा - म्हसवडच्या यात्रेत जनावरांचा मोठा बाजार भरतो. एके वर्षी श्रीमहाराज यात्रेला गेले. कसाई लोक या बाजारात गायी विकत घेतात आणि मारण्यासाठी नेतात असे श्रीमहाराजांना समजताच त्यांना खूप वाईट वाटले. आणि त्यांनी चांगली किंमत देऊन त्या सर्व गायी विकत घेतल्या. गोंदवल्यास त्या गायींसाठी  मोठी गोशाळा बांधली व त्या सर्व गायी त्यामध्ये ठेवण्यात आल्या. त्यानंतर जेथे कोठे जनावरांचा बाजार भरे आणि तेथे गायी कसायांना विकल्या जाण्याची खबर मिळे तेथे जाऊन त्यांनी त्या गायींना पडेल ती किंमत देऊन सोडवून आणीत. गोशाळेसाठी खूप खर्च होई पण त्यांना त्याची पर्वा नसे. त्यांचे गायींवर अतोनात प्रेम होते. ते जातीने गोशाळेत जात व नेहमी तेथे झाडलोट करीत. गायींची सेवा ही भगवंताची सेवा हा भाव त्यांच्या मनी होता. गायींचे देखील त्यांच्यावर फार प्रेम असे. प्रत्येकीच्या जवळ जाऊन काहीतरी बोलून पाठीवरून हात फिरवला म्हणजे त्या फार खुशीत असत. 
श्रीमहाराजांवर विषप्रयोग - श्रीमहाराजांनी सन १८७६ च्या दुष्काळात जे काम केले त्याने औंधचा तत्कालीन राजा फार प्रभावित झाला आणि तेव्हापासून तो श्रीमहाराजांचा भक्त झाला. त्या राजाच्या मृत्यूनंतर राजघराण्यात वारस, संपत्ती यावरून मतभेद झाले आणि परस्परविरोधी कारस्थाने सुरु झाली. दोन तट पडले. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी सर्व अनैत्तिक मार्गांचा अवलंब सुरु झाला. हा सर्व प्रकार पाहून मुंबई सरकारने जेकब नावाच्या कलेक्टरला औंध येथे प्रशासक नेमले. औंधच्या राजघराण्यातील एक पांगळी स्त्री श्रीमहाराजांकडे येत असे. कटकारस्थानात पाप केल्याची कबुली तिने देताच व पुन्हा असे दुर्वर्तन करणार नाही हे मान्य केल्यावर त्या दिवसापासून श्रीमहाराज तिला योग्य सल्ला देत असत. 
          सरकारी प्रशासक जेकब सुरुवातीला चांगला वाटला पण तो भ्रष्ट आणि कपटी असल्याचे दिसून आले. राजघराण्यातील दुफळीचा फायदा घेत तो दोघांच्याकडूनही पैसे खात असे. मात्र याला त्या पांगळ्या बाईचा अपवाद होता. ती त्याला पैसे देत नसे. ती श्रीमहाराजांच्या सल्ल्याने वागते असे त्याला सांगण्यात आले. जेकब मोठा कारस्थानी होता. आपल्यावर विषप्रयोग झाल्याचे कुभांड रचून त्याने श्रीमहाराजांना त्यात गोवले व त्यांची सातारा कोर्टात साक्ष काढली. श्रीमहाराज निर्दोष आहेत असा निकाल जज्जने दिला. 
          श्रीमहाराजांना बदनाम करण्याचा डाव फसल्यावर जेकबने श्रीमहाराजांवरच विषप्रयोग करण्याचे कारस्थान रचले. पहिले तीन प्रयोग फसले. पण चौथा माणूस मात्र या कामात निष्णात असावा. त्याने श्रीमहाराजांना जेवणाचे निमंत्रण दिले. श्रीमहाराज जेवायला गेले. त्या माणसाने त्यांना अन्नामध्ये सोमल मिसळून खायला घातले. घरी येताच श्रीमहाराजांना घशात, पोटात प्रचंड दाह होऊ लागला. त्यांना मरणप्राय वेदना झाल्या पण रामरायाने कृपा केली. संध्याकाळपर्यंत त्यांना थोडे बरे वाटू लागले. त्या रात्री सर्वांचा फराळ झाल्यावर श्रीमहाराजांनी भजनी निरुपण केले. निरूपणाचा विषय मांडताना त्यांनी सांगितले, ' ज्यावेळी समाजातली पुष्कळ माणसे अमर्याद विषयासक्त बनतात त्यावेळी कलियुग सुरु झाले असे समजावे. सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन बनतात. अर्थात विषयांची प्राप्ती करून घेण्यासाठी वाट्टेल ते कृत्य करण्याची त्यांची तयारी असते. अशा प्रसंगी भगवंताचे महात्म्य जो सांगेल त्यावर कठीण प्रसंग यायचेच पण परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सहीसलामत पार पडेल यात शंका नाही.  म्हणून प्रत्येकाने नामाला चिकटून असावे. '
          वयाच्या पासष्ठाव्या वर्षी श्रीमहाराजांवर झालेल्या विषप्रयोगाच्या प्रसंगानंतर त्यांना दम्याचा विकार जडला आणि तो शेवटपर्यंत राहिला. 
          काळजी करण्याचा विषय निघाला असता एका प्रसंगी श्रीमहाराजांनी सांगितले, ' आपण धीर धरून राहावे. परमात्मा आपल्याला मदत केल्याशिवाय राहत नाही. आपण खऱ्या मनाने भगवंतावर थोडा भार घालून असावे. तिथे लबाडी खपत नाही. आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवितो. ' 
          एके दिवशी दुपारी नित्यनेमाची पोथी वाचीत बसलेल्या मंडळींना श्रीमहाराज बोलले, ' नित्यनेम म्हणजे काय ? नित्याचा जो नियम तो खरा नित्यनेम. नित्य कोण ? जो कधीही बदलत नाही तो. याचा अर्थ, पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य होय. म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा. त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचे ? नियम करणे याचा अर्थ नियमन करणे, निग्रह करणे, वश करून घेणे, स्वाधीन करणे. आपले मन भगवंताच्या स्वाधीन करणे, त्याच्या ठिकाणी नेहमी ठेवणे, याचे नाव नित्यनेम. आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही; आणि देह हा जड, अशाश्वत असल्यामुळे या देहाने नित्य आणि शाश्वत अशा भगवंताचा नियम घडणे शक्य नाही. म्हणून देहाने घेता  येत असून देहाच्या पलीकडे असणारे, सूक्ष्म असल्यामुळे भगवंताशी शाश्वत संबंध असणारे, असे भगवंताचे नाम अखंड घेणे हा आपला खरा नित्यानियाम आहे. इतर सर्व गोष्टी, शास्त्रांची बंधने, पोथी वगैरे वाचणे, स्नानसंध्यादि नित्यकर्मे, ही पाळावीत, पण त्यांचा हट्ट वा आग्रह असू नये. कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे नाम मात्र सोडू नये एवढाच हट्ट क्षम्य आहे. ' 
          पैसे मागायला आलेल्या एका गरीब कुणब्याला कनवठीचे दोन रुपये दिल्यावर उपस्थितांना उद्देशून श्रीमहाराज म्हणाले, ' गृहस्थाश्रमी माणसाने असा नियम ठेवावा की, जो कोणी काही मागायला येईल त्याला 
' नाही ' म्हणू नये. आपल्याजवळ जे असेल त्यातले थोडे तरी त्याला द्यावे. अन्न द्यायला कधीच मागे पुढे पाहू नये. पैसे देताना मात्र आपली परिस्थिती पाहून आणि त्याचा हेतू पाहून तो मागेल त्याच्यापेक्षा जरा कमीच द्यावे.पण ' नाही ' म्हणणे हे चांगले नाही. ' 
पिशाच्चांशी संवाद व त्यांचे कल्याण -  पिशाच्च  बाधा झालेले पुष्कळ लोक गोंदवल्यास श्रीमहाराजांकडे येत असत. अनेकांचा अनुभव असा की,पिशाच्च बाधित माणूस श्रीमहाराजांच्यासमोर येताच ते पिशाच्च घडाघडा बोलू लागे. श्रीमहाराजांशी त्याचा संवाद होत असे. श्रीमहाराजांनी दटावल्यावर ते त्यांना भीत असे आणि झाडाला सोडून कायमचेच निघून जात असे. पिशाच्च  मुक्त होत असे, त्याचे कल्याण होत असे. 
          गोंदवल्यास श्रीमहाराजांजवळ भाऊसाहेब फॉंरेस्ट नावाचे एक सात्विक, निरुपद्रवी व एकमार्गी गृहस्थ होते. श्रीमहाराजांशी वागताना भाऊसाहेब अगदी मोकळेपणाने वागत. एकदा ते श्रीमहाराजांना म्हणाले, 
' महाराज, मी राग सर्वस्वी सोडला आहे.' त्यावर श्रीमहाराज बोलले, ' असे असेल तर फार उत्तम आहे. ' आणि तो विषय तेथेच थांबला. पुढे एका प्रसंगात भाऊसाहेब खूपच संतप्त झालेले पाहून श्रीमहाराजांनी त्यांना राग सोडल्याचे स्मरण देताच त्यांचा रागाचा पारा खाडदिशी उतरला तेव्हा श्रीमहाराज म्हणाले, ' राग जिंकणे ही गोष्ट इतकी सोपी नाही. स्वार्थ सुटायला आणि विकार ताब्यात यायला उपासनेचे बळ लागते. मी मी म्हणणाऱ्या तपस्व्यांना सुद्धा क्रोध आपल्या तावडीत पहाता पहाता पकडतो, मग आपल्यासारख्यांनी किती सावध रहायला पाहिजे ते बघा. म्हणून, जो नेहमी नाम घेईल त्याची सावधानता टिकेल आणि विकारांवर स्वामित्व चालेल असे मी म्हणतो. ' 
अजपाजप - श्रीमहाराजांच्या शरीराला कान  लावला असता त्रयोदशाक्षरी मंत्राचा अखंड ध्वनी  ऐकू आला असा अनेकांचा अनुभव होता. श्री न. चिं. केळकर यांचे वडील बंधू श्री महादेव चिं. केळकर यांनीही हा अनुभव घेतला होता. श्रीमहाराजांच्या टाळूला, छातीला, मनगटाला कान  लावताच केळकरांना त्रयोदशाक्षरी मंत्र स्पष्टपणे सारखा चाललेला ऐकू आला. यावंगलच्या शिवदीक्षितांनाही असाच अनुभव आल्यावर श्रीमहाराज त्यांना म्हणाले, ' यालाच अजपाजप असे म्हणतात. अनेक वर्षे अभ्यास केल्याने कोणालाही हे साध्य होईल. नामस्मरणाचा अभ्यास एका दृष्टीने फार सोपा आहे. त्याला कोणतीही उपाधी  लागत नाही. त्याला काळवेळ लागत नाही.  त्याला स्थलाचे किंवा देहाच्या अवस्थेचे बंधन नाही. जोपर्यंत जीवाला शुद्धी आहे तोपर्यंत नाम घेता येते. पण दुसऱ्या दृष्टीने नामस्मरणाचा अभ्यास फार कठीण आहे. नामाला स्वत:ची अशी चव नाही; म्हणून जरा नामस्मरण केले की त्याचा कंटाळा येतो. आपल्याला उपाधी असल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. उपाधीमध्ये मन रमते यासाठी, नामात  मन रमणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. ज्याचे मन नामात रंगू लागले त्याला स्वत:चा विसर पडू लागला असे समजावे.ज्याचे चित्त पूर्णपणे नामात रंगले  तो स्वत:ला पूर्णपणे विसरतो. त्यावेळी त्याला भगवंताचे दर्शन घडते. नामाची चटक लागली पाहिजे. ती चटक एकदा लागली म्हणजे जगामधले सर्व ऐश्वर्य तुच्छ वाटेल. हा बाजार मी इथे मांडून बसलो आहे तो त्यासाठीच आहे. प्रत्येकाला नामाची चटक लागावी म्हणून माझा प्रयत्न सारखा चालू आहे. कोणीतरी त्याचा अनुभव घ्यायला तयार व्हा. राम त्याच्या पाठीशी उभा आहे. ' 
दर्शनासाठी उपवास - कऱ्हाडला राहणाऱ्या एका तरुण गृहस्थाने श्रीमहाराजांनी घरी येऊन आपल्याला दर्शन द्यावे, म्हणून उपवास सुरु केला. दर्शनासाठी अट्टाहास आणि त्यासाठी उपवास हे श्रीमहाराजांना अजिबात आवडले नाही. प्रत्यक्ष भेटीत ते त्याला म्हणाले, ' देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे काही खरे नाही. असे जर असते तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणाऱ्याना भगवंत लवकर वश झाला असता ! भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते. आपल्या मनामध्ये प्रापंचिक हेतू ठेवून भगवंताच्या नावाने उपवासासारखे कितीही कष्ट केले तरी ते पाहून लोक फसतील; पण भगवंत फसणार नाही. तुम्ही उपवास केला ही गोष्ट मला तितकीशी आवडली नाही. ' उपवास घडावा ' यात जी मौज आहे ती ' उपवास करावा ' यामध्ये नाही. भगवंताच्या  स्मरणामध्ये इतके तल्लीन व्हावे की आपण नेहमी त्याच्याजवळच वास करीत आहोत असे मनाला पटावे. मग देहाने अन्न खाल्ले म्हणून काय बिघडले ? पण चित्तात भगवंताचे नाम नसताना देहाने पुष्कळ उपवास केले तरी अशक्तपणाशिवाय दुसरे काही पदरात पडणार नाही. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा भगवंतापासून माणसाला दूर नेतात. त्यांच्या तावडीत सापडता कामा नये. प्रपंचात वावरत असताना या दोन्ही गोष्टींचा संबंध येणारच. तो टाळता येणे कठीण आहे; पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत. ' 
          श्रीमहाराज कऱ्हाडहून गोंदवल्यास परत आल्यावर त्यांना त्या माणसाच्या उपवासाबद्दल विचारले असता ते म्हणाले, ' हे वेडे  लोक असतात. आपण कशासाठी काय करीत आहोत हेच त्यांना कळत नाही. कोणत्याही कृतीला तिच्या हेतूवरून मोल येते. हेतू शुद्ध असून कृती एखादे वेळी बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते. पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्याच्यापासून दूरच राहतो. त्या माणसाने केलेला उपवास निष्काम नव्हता. तसा तो असता, केवळ भगवंताचे दर्शन व्हावे म्हणून तो उपवास करीत असता, तर मी त्याला साष्टांग नमस्कार घातला असता. निष्काम कर्माचे फार फार महत्त्व आहे. भगवंतासाठीच भगवंत हवा अशी आपली वृत्ती असावी. किंबहुना, नाम घेत असताना प्रत्यक्ष भगवंत समोर उभा ठाकला आणि ' तुला काय पाहिजे ' असे त्याने विचारले तर ' तुझे नामच मला दे ' हे त्याच्याजवळ मागणे याचे नाव निष्कामता होय. कारण, रूपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हातरी नाहीसा होईल, पण त्याचे नाम मात्र  अखंड टिकेल; आणि त्याचे नाम घेतले की त्याला इकडे येणे जरूरच आहे. म्हणून देहाला कष्ट देण्याच्या भानगडीत न पडता भगवंतासाठीच नाम घेत असावे, त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. ' 

|| जय जय रघुवीर समर्थ ||                   

Sunday, April 17, 2011

श्रीमहाराज ' नामावतार ' - ९





|| श्रीराम समर्थ ||
   || श्रीसद्गुरु  ब्रह्मचैतन्य महाराज समर्थ ||


          भगवंत आत्मज्ञानी भक्ताचे भजन कोण्या पद्धतीने चालते हे सांगत आहेत.-
मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्त: परस्परं |
                     कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च || गीता अ. १०-९ || 
          माझे परम भक्त निरंतर माझ्या चिंतनात तन्मय राहतात, त्यांचे प्राण मला अर्पिलेले असतात, आणि ते एकमेकाला बोध करीत व माझ्या कथा सांगत त्यातच नेहमी अत्यंत संतुष्ट आणि रममाण असतात.
          माझे भक्त स्वत:ला संपूर्णपणे भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेत निमग्न असतात. त्यांचे चित्त भगवंताच्या चरणकमलापासून कधीच विचलित होत नाही. प्रतिदिन ते भगवंताच्या लीलांचे स्तवन करण्यात रममाण झालेले असतात. त्यांचे चित्त, प्राण सतत भगवंताच्या ठायी विलीन झालेले असतात, आणि ते इतर भक्तांसमवेत भगवत चर्चा करीत आनंद अनुभवतात. 
          श्रीमहाराजांचा दिनक्रम गीतेतील या श्लोकानुरूप भगवंतमय होता. दासबोध, एकनाथी भागवत अशा धर्म ग्रंथांचे वाचन आणि त्यावर निरुपण रोज होत असे. ते, आलेल्या साधक भक्त परिवाराबरोबर दिव्य भगवतकथा सांगत, भगवत चर्चा करत, निरंतर भगवंत चिंतनात, नामस्मरणात मोठ्या आनंदात रममाण होत असत. रात्री भजनात तन्मय होत असत. श्रीमहाराजांचे प्राण भगवंताच्या नामासाठी समर्पित होते.
सन १८९६ ते १९०७ -     
          सन १८७६ नंतर वीस वर्षांनी १८९६ साली पुन्हा दुष्काळ पडला. श्रीमहाराज काशीयात्रेहून परत आल्यानंतर थोड्याच दिवसांनी दुष्काळाने आपले स्वरूप प्रकट केले. पहिल्या दुष्काळामध्ये ज्याप्रमाणे श्रीमहाराजांनी कामे काढून लोकांना खायला घातले. त्याचप्रमाणे यावेळी देखील त्यांनी व्यवस्था केली. जे लोक त्यांच्या शेतामध्ये कामाला येत त्यांना एक वेळचे जेवण मिळे. गावातील म्हाताऱ्याकोताऱ्यांना श्रीमहाराज फुकट धान्य देत. शिवाय मंदिरामध्ये बसून जो कोणी रामनामाचा दहा हजार जप करी त्याला एक वेळ जेवण मिळे. 
          श्रीमहाराज गोंदवल्यास परत आले असून तेथे स्थिर आहेत हे कळल्यावर लांबलांबून लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले. गोंदवले पुन्हा सजीव होऊन गजबजू लागले. श्रीमहाराजांकडे येणाऱ्या लोकात, बहुतेक लोक प्रपंचातल्या अडचणीतून मार्ग शोधण्यासाठी येत असत तर काही थोडे लोक पमार्थ साधण्यासाठी येत. विष्णूबुवा कुंभारे हे त्या थोड्या लोकात होते. त्यांनी एकदा श्रीमहाराजांना अनुग्रह देण्याची विनंती केली तेव्हा श्रीमहाराज म्हणाले ' तुम्हाला पूर्वी अनुग्रह झाला आहे ना ! मागच्या गुरूना जसे तुम्ही विसरला तसेच मला पण विसराल. एखाद्या पतिव्रतेसारखे गुरूशी वागावे लागते. आपला देह त्याला अर्पावा लागतो. एकदा एक गुरु केला म्हणजे दुसरा करू नये. ' यावर त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर श्रीमहाराजांनी त्यांना अनुग्रह दिला. हा अनुग्रह झाल्यावर विष्णूबुवांनी मोठ्या चिकाटीने जप केला. त्यांचे नामाचे प्रेम पाहून श्रीमहाराजांनी त्यांना दिक्षाधिकार दिला. वऱ्हाडात शेंदुर्णी गावी त्यांनी श्रीमहाराजांच्या नावाने मठ बांधला आणि आमरण भगवंताच्या नामाचा प्रसार केला.
          सन १८९७ सालचा एप्रिल महिना होता. दुष्काळाचे भयानक स्वरूप संपून लोकांना थोडी स्वस्थता लाभत होती. गोंदवले राममंदिर पुन्हा पूर्वीच्या वैभवात आले. श्रीमहाराजांचा भजन, निरुपण हा नित्याचा व्यवहार सुरु झाला. असेच एके दिवशी सकाळी सर्वजण भजनात तल्लीन असताना श्रीमहाराज पुढील अभंग पुन:पुन्हा म्हणत होते. 
 ' त्रेपन्न वर्षे भुमीभार |आता पाहू आपले घर ||
      देहमर्यादा सरली | मागे भक्ति करा भली ||
तुम्हा सांगितल्या खुणा | विसरू देऊ नका मना ||
      दीनदास आनंदला | राम बोलावितो मला || 
          लोकांना महाराज काय म्हणत आहेत हे उमगताच लोक हादरले, घाबरून गेले. तोच श्रीमहाराजांनी अभंग संपवला. भजन संपल्याचे सूचक असे ' जानकीजीवन स्मरण जय जय राम ' केले आणि म्हणाले, ' आज आता मी नैमिष्यारण्यात जाणार. माझ्यामागे तुम्ही सर्वांनी नामस्मरण करीत काळ घालवावा. ' हे ऐकून सर्व उपस्थितांना धक्का बसला. पुरुष, स्त्रिया, व मुले रडू लागली.श्रीमहाराजांच्या पाया पडून न जाण्यासाठी विनवू लागली. श्रीमहाराजांचा निश्चय पक्का होता. श्रीरामाला नमस्कार करून ते बाहेर पडले.सर्व जन समुदाय रडत रडतच त्यांच्या मागे लोटला. श्रीमहाराज टांग्यात जाऊन बसले. त्या वेळचे दृश्य अत्यंत हृदयविदारक होते लोक असहाय आणि दीन होऊन स्फुंदून रडण्यापलीकडे काही करू शकत नव्हते.
          टांगा चालू झाला तोच एकजण हात वर करून टांगा थांबवण्यासाठी  टांग्याच्या मागे धावत येत होता. श्रीमहाराजांनी टांगा थांबविण्यास सांगितले. घाबऱ्या घाबऱ्या कातर आवाजात तो मनुष्य सांगत होता,  'महाराज ! राम, सीताव लक्ष्मण यांच्या डोळ्यातून सारख्या अश्रूधारा वाहत आहेत !' हे ऐकून श्रीमहाराज उद्गारले, ' खरच ? ' टांगा मागे फिरला. टांग्यातून उतरल्यावर श्रीमहाराजांनी पाय धुतले आणि सोवळे नेसून रामापुढे गेले. रामरायाच्या डोळ्यातून गालावर ओघळलेले पाणी मऊ रुमालाने पुसून काढले, तरी अश्रूधारा येतच होत्या हे पाहिल्यावर श्रीमहाराजांचे डोळे पाणावले,' मी इथून निघून चाललो म्हणून का रडतोस ? मी जाऊ नये असे तुझ्या मनात असेल तर मला तरी जाऊन काय करायचे आहे ? हा बघ मी राहिलो. आता तू रडायचा थांब. ' हे त्यांचे शब्द ऐकल्यावर मूर्तीच्या डोळ्यातून पाणी येणे बंद झाले. 
          श्रीमहाराज गोंदवल्यास राहणार हे समजल्यावर दोन तीन तास असलेले उद्विग्नतेचे वातावरण एकदम नाहीसे होऊन जिकडेतिकडे प्रसन्नता भरून गेली. या प्रसंगा संदर्भात श्रीमहाराज म्हणाले, ' चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे. ज्याची भावना खरी शुद्ध आणि नि:संशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते. भावना मात्र शंभर नंबरी शुद्ध पाहिजे, तीत कसलीही भेसळ उपयोगाची नाही. ' 
          इंदूरच्या श्रीमहाराजांच्या भक्त असलेल्या गोदूबाईंच्या मुलाची मुंज होती. गोदूबाईंनी श्रीमहाराजांना पत्र लिहून इंदूरला येण्यास आमंत्रण केले. गोदूबाईंनी मुंज लागेपर्यंत श्रीमहाराजांची वाट बघितली, परंतु श्रीमहाराज  आले नाहीत. मुंजीची पंगत बसली. सर्व पदार्थ वाढून झाले. तूप वाढण्याची वेळ आली तेव्हा गोदूबाईंच्या लक्षात आले की परगावाहून मागवलेले तूप आलेले नाही. त्यांना प्रश्न पडला. श्रीमहाराजांच्या तसबिरीसमोर बसून, डोळ्यात पाणी आणून त्यांनी करुणा भाकली. तिला पूर्वी निरोपाच्या वेळचे शब्द आठवले, ' तू माझी आठवण केलीस की मी तुझ्याजवळ उभा राहीन. नामस्मरण करीत असावे.जेथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो.' तिने श्रीमहाराजांना कळवळून हाक मारताच श्रीमहाराज तसबिरीतून बाहेर आले. श्रीमहाराजांनी पावशेराच्या तुपाच्या भांड्यातून पंगतीत तूप वाढले.तीनशे पान जेऊन उठले पण त्या भांड्यात तितकेच तूप शिल्लक होते. श्रीमहाराज तिला म्हणाले ' गोदे ! तू स्वत:ला रामाची भक्त समजतेस ना ? मग येवढ्या सध्या प्रसंगाला घाबरतेस हे काय ? असो, त्याच्या नामाला विसरू नकोस. भगवंताच्या नामात फार मोठी सत्ता आहे. जो नामामध्ये स्वत:ला विसरला त्याच्या मागे मागे राम फिरला.' ' येतो ' म्हणून सांगून श्रीमहाराज देवघरामध्ये गेले आणि नाहीसे झाले. या प्रसंगाला उद्देशून श्रीब्रह्मानंद आरतीमध्ये म्हणतात -'इद्दल्लीद्दू दुरिन भक्तागे दर्शन कोट्टवने || ' ( एके ठिकाणी राहून अन्य ठिकाणी असलेल्या भक्ताला श्रीमहाराज दर्शन देतात.' )
          श्रीमहाराजांना पहिल्या कुटुंबापासून एक मुलगा व दुसऱ्या कुटुंबापासून दोन मुलगे व एक मुलगी झाली. तीनही मुलगे तान्हेपणीच वारले. मुलगी मात्र तीन वर्षांची होऊन कालवश झाली. श्रीमहाराज तिला ' शांता ' या नावाने हाक मारीत. ती भजनाचे वेळी मंदिरात श्रीमहाराजांच्या जवळ असे. ती गेली तेव्हा श्रीमहाराज बोलले, ' कोणाच्या पोटी कोण जन्म घेतो हे सामान्य माणसांना कळणे शक्य नसते. फक्त सत्पुरुषांना ते कळते. पुष्कळ वेळा चांगले अधिकारी जीव एखाद्या लहानशा वासनेमुळे अडकून पडतात. मग ते अध्यात्मदृष्ट्या चांगल्या कुळामध्ये जन्मास येतात. तेथे त्यांची ती वासना तृप्त व्हायला फारसा वेळ लागत नाही, म्हणून लहानपणीच ते जग सोडून जातात. त्यांच्या मृत्यूचे दु:ख करणे बरोबर नाही. वासनेशी झगडणे हे शुरांशी वैर करण्यासारखे आहे. ती केव्हा आपला घात करील याचा नेम नसतो. त्यासाठी सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा म्हणजे वासनेचे आपोआप तळपट होऊन जाते.' 
          भाऊसाहेब केतकर म्हसवडला असताना श्रीमहाराजांचा परिचय झाला होता. त्याला आता पंचवीस वर्षांचा काळ लोटला. या काळात ते श्रीमहाराजांच्या संपर्कात नव्हते. श्रीमहाराज गदगला गेले असता तिथे भाऊसाहेब भेटले. भाऊसाहेब जुनी ओळख विसरले होते. पण श्रीमहाराजांनी पूर्वी त्यांच्याबरोबर म्हसवडला गेल्याची आठवण सांगितली आणि विचारले ' तुम्ही रोज गीता वाचता का ? ' भाऊसाहेबांना सर्व आठवले आणि खूप आनंद झाला. वयाच्या पन्नासाव्या वर्षी झालेल्या या पुनर्भेटीला उद्देशून भाऊसाहेब सांगतात, ' अहो, काय सांगू तुम्हाला ! हरवलेली आई भेटल्यावर मुलाला जसे होते तसे मला झाले. आमचे नवराबायकोचे एकदम ठरले की आता श्रीमहाराजांच्याकडे जाऊन रहायचे, श्रीमहाराज सांगतील तसे वागायचे. त्यामुळे पेन्शन घेतल्यावर काय करावे ही अडचण मुळी राहिलीच नाही.' 
          कुच्ची या गावी कृष्णाजीपंत भागवत नावाचे हुशार व चिकित्सक गृहस्थ रहात होते. कलीयुगात खरे वैराग्य आढळणार नाही आणि वैराग्या अभावी कोणीही साधू बनणे शक्य नसल्यामुळे या काळात खरा भगवद्भक्त आढळणार नाही. जिकडेतिकडे भोंदूपणा, धूर्तपणा, स्वार्थ, आणि पैशाचा लोभ दृष्टीस पडेल, असे त्यांचे मत होते. श्रीमहाराजांना भेटल्यावर त्यांचे मतपरिवर्तन झाले. त्यांची डोकेदुखीची जुनी व्यथा गेली. त्यांना श्रीमहाराज हे प्रत्यक्ष मारुती आहेत असा साक्षात्कार झाला. तेव्हा श्रीमहाराज त्यांना म्हणाले, ' पंत, तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्वकाळ माझ्या संगतीचा लाभ घडेल. ज्याच्या मुखी नाम आहे, त्याच्या हृदयामध्ये माझी वसति राहे.' 
          पुण्यात श्रीमहाराजांची पुष्कळ मंडळी असल्यामुळे ते बऱ्याच वेळा पुण्यात येत.श्रीमहाराजांचा व लोकमान्य टिळकांचा निकट परिचय होता. श्रीमहाराज पुण्यास आले म्हणजे लोकमान्य एक रुपया व नारळ घेऊन न चुकता त्यांना भेटण्यास येत. त्यांचे बोलणे बहुधा एकांतात होत असे. श्रीमहाराज, लोकमान्य आपल्याला का आवडतात हे सांगताना म्हणत, ' अत्यंत नीतिमान, अत्यंत निर्भय, अत्यंत नि:स्वार्थी आणि भगवंतावर निष्ठा - या गुणांमुळे ते मला फार प्रिय आहेत. ' 
          मोरगिरीला श्रीमहाराजांचे एक राममंदिर आहे. तेथे वामनराव पेंढारकर या नावाचे एक चांगले उपासक होते. लग्न झाल्यानंतर बावीस वर्षांनी त्यांना मुलगा झाला. जरा मोठा झाल्यावर तो सारखा आजारी पडू लागला. शेवटचा उपाय म्हणून वामनराव सहकुटुंब गोंदवल्यास आले. मुलाला त्यांनी श्रीमहाराजांच्या पायावर घातले. त्यावेळी श्रीमहाराज म्हणाले, ' वामनराव, हा मुलगा रामाने आपल्याला दिला. ती त्याची ठेव आहे. तिचे काय करायचे हे आपण रामावर सोपवू. ' मुलगा जगला नाही. पण श्रीमहाराजांच्या सहवासात राहिल्याने त्या उभयतांनी तो काळाचा प्रहार  मोठ्या धीरोदात्तपणे झेलला. एखाद्या सत्पुरूषाप्रमाणे मुलाचे आईबाप शांत राहिले. रडणे, ओरडणे असे काही न करता मुलाची उत्तरक्रिया श्रीमहाराजांनी सांगितल्यानुसार केली. श्रीमहाराज म्हणाले, ' सत्संगतीने मनुष्याच्या वृत्तीत कसा पालट होतो हे या नवराबायकोच्या वागण्यावरून चांगले कळेल. सत्संगती आणि भगवंताचे नाम, यानेच होतो आराम. '     
          एकदा रात्री साडेअकराच्या सुमारास भजन आरती आटोपून श्रीमहाराज नागप्पा नावाच्या इसमाबरोबर कंदील, छत्री घेऊन बाहेर पडले. एका पडक्या घराच्या आसऱ्याने झोपलेल्या दोन वाटसरुना जागे करून मंदिरात  चलण्यास सांगितले. पाऊस पडत असल्याने ही भिंत केव्हाही कोसळेल असा इशारा दिला. त्यापैकी एक मुकाट्याने उठला व मंदिरात जाऊन निजला. दुसरा तेथेच पडून राहिला. रात्री पावसाचा जोर वाढला. भिंत  कोसळली व तो वाटसरू तिच्याखाली चिरडून मरण पावला. दुसऱ्या दिवशी श्रीमहाराजांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा ते बोलले, ' अरेरे !  मी त्याला काल रात्री सूचना देऊन आलो, पण त्याने ऐकले नाही . माणसांचे असेच घडते. सत्पुरुषाजवळ राहून जर मनुष्य आज्ञापालन शिकला नाही तर तो काहीच शिकला नाही. जो आज्ञापालन करील त्याला भोग भोगावे लागतील हे खरे, परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था होईल. प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे. भोग येण्याचा समय झाला म्हणजे प्रथम बुद्धीवर परिणाम करतो. तेथे आपण सावध राहून सत्पुरुषांच्या सांगण्याप्रमाणे वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावल्यावाचून राहणार नाही.' 
          गोंदवल्यास श्रीमहाराजांच्याकडे वामनराव या नावाचे एक वारकरी येऊन राहिले होते. श्रीमहाराजांचे कपडे वामनराव सांभाळीत. त्यांना ज्ञानेश्वरी वाचण्याचा व समजून घेण्याचा फार नाद असल्यामुळे लोक त्यांना ' वामनराव ज्ञानेश्वरी ' असे म्हणत. वामनराव मोठा साधक वृत्तीचा मनुष्य होता. त्याला कामक्रोधादी विकारांविषयी श्रीमहाराज सांगत होते, ' विकार हे काही मुळात टाकाऊ नाहीत. ते भगवंताने दिलेले आहेत म्हणून त्यांना जीवनात योग्य स्थान असेलच असेल; किंबहुना व्यवहारामध्ये विकारांची जरूर आहे. विकारांवर  आपण सत्ता गाजवून वापरायला शिकले पाहिजे, विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नये. विकारांना आपण वापरावे, विकारांनी आपल्याला वापरू नये.' 
          ' परमार्थ साधण्यासाठी विकार नाहीसे करायचे नसतात, पण ते पूर्ण ताब्यात मात्र ठेवावे लागतात. क्रोधाने साधकाची फार मोठी हानी होते.' 
          एकदा, ' रामाजवळ काय मागाल? ' असा प्रश्न करून श्रीमहाराज बोलले ' मी माझी जाणीव, मीपणाची जाणीव, नाहीशी कर असे मी मागेन. मीपणाची जाणीव परमार्थात फार घात करते. ती नाहीशी झाल्याशिवाय परमार्थात प्रगती होणार नाही.' 
           उत्सवासंदर्भात श्रीमहाराज सांगतात ' कोणत्याही देवाच्या उत्सवाचा मुख्य हेतू हा की, आपल्याला त्याचे स्मरण  अधिकाधिक व्हावे. भगवंताचे स्मरण हे भगवंताच्या प्राप्तीसाठीच करायचे असते. परंतु भगवंताचे नाम सर्व प्रकारच्या दुरितांचा पण नाश करते.' 
          ' पण नाम घेऊन प्रापंचिक सुख मागणे म्हणजे कामधेनू मिळत असता ती टाकून गाढव मागण्यासारखे आहे. नामाने प्रत्यक्ष भगवंत घरी येत असता पैसा, लौकिक किंवा संतती जर आपण मागितली तर ते दु:खाला कारण होते.' 
          ' स्वत:ला विसरणे म्हणजेच समाधी समजावी. नाम घेताना स्वत:चा विसर पडणे हि सर्वोत्कृष्ट समाधी होय. नामात  स्वत:ला विसरायला शिकावे.' 
         अण्णासाहेब कुबेर एकदा ' मला काहीतरी नियम सांगा ' असे म्हणून श्रीमहाराजांच्या मागे लागले. तेव्हा श्रीमहाराज म्हणाले की, ' नेहमी भगवंताचे नाम घेणे हाच सर्वोत्तम नियम आहे. मग आणखी निराळा नियम कशाला हवा? ' पण अण्णासाहेब म्हणायचे की  'जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आम्ही नियम पाळतो, मग परमार्थामध्ये का नको? ' त्यावर श्रीमहाराज म्हणाले ' प्रपंचातले नियम देहबुद्धीचे असतात, ते पाळणे सोपे असते. भगवंताचा नियम त्याच्या कृपेनेच पाळला जातो. मी नियम पाळीन असा अहंकार परमार्थात चालत नाही.' 
          श्रीमहाराजांनी सांगितलेला, रोज जेवणापूर्वी तीन वेळा 'श्रीराम ' म्हणण्याचा नियम अण्णासाहेब कुबेरांना पाळता आला नाही तेव्हा ते खजील झाले. श्रीमहाराजांना ' माझ्यावर कृपा करा ' अशी विनवणी करू लागले तेव्हा श्रीमहाराज म्हणाले, ' देहबुद्धीचे प्रापंचिक नियम आपल्या निश्चयाच्या जोरावर पाळता येतात; परंतु भगवंताचा नियम पाळायला आपल्या निश्चयाबरोबरच त्याच्या कृपेची जोड लागते. शिवाय, ज्या अर्थाने प्रापंचिक नियम अंगवळणी पडतो त्या अर्थाने भगवंताचा नियम अंगवळणी पडू नये. त्या नियमाच्या आचरणात नित्य नवे प्रेम आणि जिवंतपणा असावा. भगवंताच्या नियमाचे पालन जितके जास्त घडेल तितकी  त्याच्या अस्तित्वाची जाणीव वाढत जाणे जरूर आहे. म्हणून तो पळताना त्याच्या कृपेची याचना मनापासून करावी. तेथे मीपणाचे वारे नसावे.त्याचे नाम घ्यावे म्हणजे तो कृपा करतो. तसे केल्यावाचून  त्याला गत्यंतर उरत नाही.' 
श्रीमहाराज पुन्हा काशीयात्रेला निघाले.- 
       सन १८९७ साली श्रीमहाराज नैमिष्यारण्यात जाण्यास निघाले होते, त्यावेळी रामरायाच्या डोळ्यातून अश्रूपात झाल्यामुळे त्यांचे जाणे रहित झाले. त्यानंतर आठ वर्षे गेली. सन १९०५ साली ते पुन्हा काशीयात्रेस निघाले. निघण्याच्या वेळी श्रीमहाराज श्रीरामाच्या दर्शनासाठी आले. त्यांनी मोठ्या प्रेमाने रामरायाचा निरोप घेतला. बरोबर शंभर माणसे निघाली. इतकी सर्व मंडळी बरोबर घेऊन श्रीमहाराज प्रयागला गेले. 
          प्रयागला सर्वांसह श्रीमहाराज एका मोठ्या धर्मशाळेत उतरले. सर्व मंडळीनी तीर्थकृत्ये केली. वेणीदान हा विधी त्रिवेणी  संगमावर करावयाचा असतो. त्यासाठी नावेने संगमावर जावे लागते. वीस बावीस जोडप्यांसह श्रीमहाराज गंगेच्या किनाऱ्यावर आले. सर्व मंडळींसह श्रीमहाराज स्वत: नावेमध्ये बसले. बरोबर आलेले इतर यात्रेकरू तीरावरच थांबले. नावेत सर्व मंडळी अत्यंत आनंदात होती. नाव नीटपणे किनाऱ्यापासून साधारण पन्नास यार्ड गेली असेल इतक्यात तिच्या बुडाला भोक पडून नदीचे पाणी जोराने आत शिरू लागले. नावाड्याने पाणी आत येऊ न देण्याची खटपट सुरु केली. नावाडी पाणी काढण्याचा प्रयत्न करीत होता पण व्यर्थ. कारण पाण्याचा जोर इतका विलक्षण होता की नावेने आपली दिशा सोडली व ती नदीच्या धरेला लागून वहात चालली. नावेतील सर्व मंडळी घाबरली. सर्वत्र हाहा:कार उडाला. काही देवाचा धावा करू लागली, रडू, ओरडू लागली. किनाऱ्यावरच्या लोकांना मदतीसाठी हाक मारू लागली. मात्र श्रीमहाराज शांत होते. आपल्या मंडळींची भीतीने अशी स्थिती झालेली पाहून श्रीमहाराज मोठ्याने म्हणाले, ' बाळांनो ! घाबरू नका. राम आपला पाठीराखा आहे. आपण त्याचे नाव मोठ्याने घेऊन त्याचा धावा करू या. ' असे बोलून ज्या भोकातून पाणी आत येत होते त्याच्यावर आपली कफनी ठेवून श्रीमहाराजांनी आपल्या पायाने ती दाबून धरली आणि ' जय जय श्रीराम, जय जय श्रीराम ' असा घोष करून टाळ्या वाजविण्यास आरंभ केला. तीरावरच्या मंडळीतही घबराट पसरली. तीरावरच्या लोकांनी आरडाओरडा करताच सरकारी नावा  सुटून या नावेच्या दिशेने चालू लागल्या. किनाऱ्यावर श्रीमहाराजांबरोबर आलेली मंडळी एकच आकांत करू लागली. सरकारी नावा  बुडणाऱ्या नावेच्या जवळ येताच श्रीमहाराजांनी एका मोठ्या नावेत एक पाय व बुडणाऱ्या नावेत दुसरा पाय ठेऊन कमरेवर हात देऊन उभे राहिले  व इतर मंडळींना म्हणाले, ' त्या नावेत चला सगळे. एकेकजण हळूहळू जा. ' सर्व माणसे लगबगीने नव्या नावेमध्ये बसली. सगळेजण नव्या नावेत आलेत याची खात्री झाल्यावर फुटक्या नावेवरचा आपला पाय श्रीमहाराजांनी उचलला. पाय उचलताच फुटकी नाव गंगेच्या पोटात नाहीशी झाली. सर्व सुखरूप तीरावर आले. पुढे नंतर वेणीदानाचा समारंभ पार पडला. 
          प्रयागला बरेच दिवस राहून मग सर्व मंडळींना घेऊन श्रीमहाराज काशीला गेले. श्रीमहाराज काशीला आले आहेत हे समजल्याबरोबर शेकडो स्त्रीपुरुष श्रीमहाराजांच्या दर्शनास येऊ लागले. 
          काशीत मुक्काम असताना श्रीमहाराजांचा ठरलेला असा कार्यक्रम नसे. सामान्यत: रोज सकाळी कोणीतरी दर्शनासाठी येई. त्यावेळी चर्चेमध्ये भगवंताच्या भक्तीबद्दल अनेक रीतीने विवेचन होई. बारा वाजण्याच्या सुमारास सर्वजण गंगेवर स्नानासाठी जात. स्नान करीत असताना श्रीमहाराज पोहत असत. त्यांना उत्तम पोहता येत असे. स्नान आटोपल्यावर ते विश्वेश्वराच्या दर्शनास जात. नंतर घरी परत आल्यावर  भोजन होई व संध्याकाळी पुन्हा गंगादर्शन व देवदर्शन बहुतेक होई. रात्री भजन व आरती होऊन नंतर मंडळी झोपी जात. 
          काशीमध्ये श्रीमहाराजांच्या प्रेमातला एक मोठा वेदांती पंडित होता. त्याला वादाची भारी हौस होती. वादाचा फोलपणा सांगताना एकदा श्रीमहाराज त्याला म्हणाले, ' नामाने जे काम होते ते जगामध्ये कोणालाही-प्रत्यक्ष भगवंताला देखील करता येत नाही. इत:पर वादाच्या ऐवजी नामाची हौस बाळगावी. विद्वत्तेचा उपयोग  नामाची निष्ठा वाढविण्याकडे करावा, आधी नाम घ्यावे आणि मग वाटले तर विद्वत्ता मिळवावी. पण ज्याला नामाची चटक लागली तो इतर भानगडीमध्ये पडतोच कशाला? '
          काशीला बरेच दिवस काढून श्रीमहाराज अयोध्येला गेले. अयोध्येला असतानाच श्रीमहाराज नैमिष्यारण्यात जाऊन आले व नंतर सर्व मंडळींना घेऊन इंदूरला गेले. पूर्वीची सर्व मंडळी दर्शनास येऊ लागली. श्रीमहाराज इंदूरहून हरद्यास आले. येथे त्यांचा दीड दोन वर्षे मुक्काम झाला. हा सर्व काळ फारच 
आनंदात  गेला; आणि त्या प्रांतातील पुष्कळ लोक भगवंताच्या नामाला लागले. हर्दा येथेच श्री.न.चिं.केळकर हे श्रीमहाराजांना भेटले. त्यांचे वडील व मोठे बंधू हे श्रीमहाराजांचे अनुग्रहित होते. 
          शंकासमाधानाबद्दल श्रीमहाराज सांगतात, ' शंका हि फार चिवट आहे. ती मरता मरत नाही. शिवाय काही शंका आचरणाने आणि अनुभवानेच नाहीशा होतात. म्हणून मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते आणि सर्व शंका विरून जातात.' 
          हरद्यास असतानाच श्रीमहाराज पुन्हा एकदा अयोध्यामार्गे नैमिष्यारण्यात जाऊन आले. 
          ' मला देव दाखवा ' असा हट्ट करून उपोषणास बसलेल्या एका साधकाला श्रीमहाराज सांगतात ' भगवंत हा हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही. तो एका प्रेमानेच वश होतो. प्रेमामध्ये  हट्ट आणि कष्ट झाले तर ते शोभतात आणि हिताचे होतात. आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेव्हढे बघतो. परमार्थ आपोआप वाढावा , त्याला ताण देऊन वाढवू नये.' 
          हरद्यास असतानाच वडिलांची श्राद्धतिथी आल्याने श्रीमहाराजांनी तेथेच श्राद्धविधी केले. 
          श्रीमहाराज पुन्हा ऑक्टोबर १९०६ मध्ये नैमिष्यारण्यात गेले. ' तुमच्या अंतकाळी मी हजार राहीन ' असे वचन श्रीमहाराजांनी नानासाहेब पेशवे यांना दिलेले होते. ते वचन पूर्ण करण्यासाठी श्रीमहाराज नैमिष्यारण्यात आलेले होते. नानासाहेब त्यावेळी खूपच आजारी होते. दोघांची दृष्टादृष्ट होताच दोघांच्याही डोळ्यातून पाणी वाहू  लागले. त्यानंतर नवव्या दिवशी नानासाहेब पेशव्यांनी देह ठेवला. श्रीमहाराजांनी स्वत: त्यांच्या चितेला अग्नी  दिला. 

|| जय जय रघुवीर समर्थ || 
                         


     
                  

Monday, April 4, 2011

श्रीमहाराज ' नामावतार ' - ८




|| श्रीराम समर्थ ||
   || श्रीसद्गुरु  ब्रह्मचैतन्य महाराज समर्थ ||


          भगवंत ज्ञानी व अज्ञानी यांच्या कर्मातील भेद दाखवून अज्ञान्यास सुधारण्यासाठी ज्ञात्याने काय करणे अवश्य आहे हे सांगत आहेत. -
सकता: कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत |
कुर्याद्विद्वांस्तथासक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम || अ. ३-२५ ||
          हे अर्जुना ! लोकसंग्रह करू इच्छिणाऱ्या ज्ञानी पुरुषाने  ( व्यावहारिक ) कर्मात आसक्त झालेले अज्ञानी लोक ज्याप्रमाणे वागतात त्याप्रमाणे पण आसक्ती सोडून वागले पाहिजे. 
          ज्याप्रमाणे अज्ञानी ( सकाम ) पुरुष आपल्या स्वार्थसिद्धीसाठी सावधपणे आणि तत्परतेने कर्म करतात  त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषांनीही लोकसंग्रहार्थ अर्थात दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करावे. तत्त्वज्ञ पुरुषांनी, कर्म करण्याशी त्यांचे कसलेही प्रयोजन नसतानासुद्धा, संपूर्ण कर्तव्यकर्मांना काळजीपूर्वक करीत राहावे. ज्यामुळे कर्मामध्ये आसक्त असलेल्या पुरुषांची निष्काम कर्माविषयी महत्त्वबुद्धी जागृत होईल आणि ते सुद्धा निष्काम भावनेने कर्म करू लागतील.
          श्रीमहाराजांनी आपले जीवन नामासाठी वेचले. तीर्थयात्रा केल्या, अन्नदान केले, आणि प्रापंचिकांना प्रपंचात राहून परमार्थ कसा साधता येतो याचे स्वत:च्या आचरणाने उत्तम उदाहरण घालून दिले. दुष्काळात लोकोपयोगी कामे हाती घेतली. निष्काम भावनेने कर्म करण्याचा एक आदर्शच लोकांसमोर ठेवला. 
श्रीमहाराजांनी लोकसंग्रहार्थ केलेले कार्य -
          सुमारे सन १८९० पासून श्रीमहाराजांचा अधिक काळ आता गोंदवल्यासच मुक्काम असे.श्रीमहाराजांचे वय या सुमारास ४५-४६ च्या आसपास होते. बाहेरच्या पुष्कळ लोकांना त्यांची माहिती झाल्याने आणि ते गोंदवल्यास जरा स्थिर राहिल्याने लोकांचे त्यांच्याकडे येणे-जाणे खूपच वाढले.
          वयाच्या नवव्या वर्षी श्रीमहाराज पहिल्या प्रथम घराच्या बाहेर पडले तेव्हापासून वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षांपर्यंत आपला पुष्कळसा काळ त्यांनी भारतभ्रमणात घालवला. ते बहुधा एकट्याने संचार करीत, आणि एका लंगोटीशिवाय त्यांच्याजवळ काही नसे. भारतवर्षातील सर्व तीर्थे त्यांनी पहिली व अनेक वेळा काशीची कावड रामेश्वरास नेली. श्रीमहाराज भारतवर्ष तीन वेळा पायी हिंडले. इतक्या अफाट पर्यटनामध्ये अक्षरश: लाखो लोकांशी त्यांचा संबंध आला. ज्या ज्या माणसांचा त्यांच्याशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. या लोकात, सिद्धीसाठी साधन करणारे योगी, वेदांती, पंडित, संन्यासी, बैरागी, कर्मठ वैदिक विद्वान, श्रीमंत, गरीब, सरकारी अधिकारी, प्रोफेसर होते. अशा सर्वांना श्रीमहाराजांनी नामाला लावले.
          प्रवासामध्ये हजारो लोकांना त्यांनी अनुग्रह दिला. उत्तरेत श्रीमहाराजांना लोक ' दख्खनका साधू ' म्हणून ओळखत. इंदूरमधील वास्तव्यात जेव्हा तेथील लोकांना श्रीमहाराज हे गोंदवल्याचे आहेत असे कळले तेव्हा इंदूरचे लोक त्यांना ' गोंदवलेकर महाराज ' असे म्हणू लागले.
          भजन, प्रवचन, नामसंकीर्तन, शंका समाधान यासाठी श्रीमहाराजांच्या भोवती गावातील तसेच अन्य ठिकाणाहून सेवेसाठी, साधनेसाठी आलेल्या मंडळींचा गराडा असे. श्रीमहाराज प्रवासातले अनुभव, हकीकती लोकांना सांगत असत.
          एकदा कर्नाटकातल्या हल्याळ मुक्कामातील हकीकत श्रीमहाराज सांगत होते. हल्याळात एके दिवशी एका दारी ' जय जय रघुवीर समर्थ ' असे म्हणून भिक्षेसाठी गेले असता त्या घरातील दु:खी स्त्रीने आपल्या तापाने फणफणणाऱ्या मुलाबद्दल सांगितले. ती हे रडत रडतच  सांगत होती. श्रीमहाराजांनी तिला धीर दिला व स्वत: त्या मुलाजवळ गेले. ' मुलाचा ताप मी घेतला ' असे सांगून बाहेर पडले. मुलगा बरा झाला. नंतर काही दिवसांनी या तापाची आठवण करून देताच श्रीमहाराजांनी स्वत:ला एका खोलीत अकरा दिवस कोंडून घेतले. श्रीमहाराज तापाने कण्हत होते. बाराव्या दिवशी श्रीमहाराजांनी ताप उतरताच विहिरीवर अंघोळ केली. दुसऱ्याचा भोग भोगून संपविला.
गोंदवल्यास श्रीराममंदिर बांधले.- 
          श्रीमहाराज गोंदवल्यास स्थिर राहू लागल्यावर त्यांच्या दर्शनासाठी, सेवेसाठी, उपासनेसाठी येणाऱ्या लोकांची संख्या सतत वाढत होती. लोकांच्या निवासाची, उतरायची व्यवस्था, तसेच श्रीमहाराजांचे घर अपुरे पडू लागले म्हणून आपल्या घरासमोरच्या भागामध्ये त्यांनी प्रशस्त असे राममंदिर बांधण्यास प्रारंभ केला.
          अगदी बालपणापासून श्रीमहाराजांचे श्रीरामरायावर नितांत प्रेम होते. श्रीरामचंद्राच्या चरणी त्यांची वृत्ती इतकी तन्मय होती की, जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामचंद्राच्या इच्छेनेच घडते अशी त्यांची धारणा होती. 'राम काय करील ते खरे, ' अथवा ' रामाच्या इच्छेने जे घडेल ते खरे,' हेच त्यांचे शेवटचे आणि सुरुवातीचे सांगणे असे. ही जी अंत:प्रेरणा या राममंदिराच्या उभारणीमागे जशी होती तशीच श्रीतुकामाईंनी अनुग्रह दिल्यावर केलेली, ' राममंदिरांची स्थापना करून रामनामाचा प्रसार कर ' ही आज्ञाही कारण होती.
          कोणाकडेही पैशाची याचना न करता, अथवा पदरी सांठलेले द्रव्य नसतानाही लोकांनी उत्स्फूर्तपणे दिलेल्या पैशातून मंदिर आकाराला येत होते.
          श्रीरामाच्या मूर्तीविषयी देखील अदभूत असे घडले. श्रीमहाराज म्हणत ' आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल. ' आणि घडलेही तसेच. तडवळे गावच्या कुलकर्णी यांनी नवीन  वाडा बांधला.रामाचे मंदिर बांधावे म्हणून राम, लक्ष्मण व सीता अशा तीन मूर्ती घरात आणून ठेवल्या. दुर्दैवाने वाडयाला आग लागली. वाडा भस्मसात झाला. मूर्तींनाही आगीची झळ पोचली. कुलकर्णी यांना दृष्टांत झाला की, मूर्ती गोंदवल्यास श्रीब्रह्मचैतन्यांच्याकडे द्याव्यात. त्यांनी आपणहून त्या मूर्ती श्रीमहाराजांना आणून दिल्या. श्रीमहाराजांनी एका चांगल्या कारागिराकडून तिन्ही मूर्तींना उजाळा दिला व त्यांचे जळकेपण पुष्कळ कमी करून घेतले.
          सन १८९१ मध्ये मंदिर बांधून तयार झाले. प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरला. भजन, अखंड नामस्मरण सप्ताहास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. रोज भजन, नामस्मरण, कीर्तन, पुराण आणि अन्नदान मोठ्या धडाक्यात सुरु झाले. भारतातील सर्व तीर्थक्षेत्रातून, मोठ्या शहरातून मोठमोठे विद्वान, पंडित, वैदिक ब्राह्मण समारंभासाठी आले होते.
          श्रीरामरायाची प्राणप्रतिष्ठा ' न भूतो न भविष्यति | ' अशी मोठ्या समारंभपूर्वक झाली. श्रीरामरायाला स्नान घालण्यासाठी पवित्र नद्यांचे व समुद्राचे पाणी आणले होते. श्रीमहाराजांनी मंदिर बांधणाऱ्या कामगारांसह सर्व निमंत्रितांचा, विद्वानांचा यथोचित सत्कार केला. अन्नदानाला सीमा नव्हती. शेवटच्या दिवशी जवळपास दहा हजार लोक जेवून  तृप्त झाले. त्या दिवशी मंदिरात रामरायासमोर श्रीमहाराजांनी भजनाची सुरुवात, 
' छत्रसिंहासनी अयोध्येचा राजा | नांदतसे माझा मायबाप ' या अभंगाने केली. श्रीमहाराज भजनात देहभान विसरले. उपस्थित सर्वही भजनात तन्मय झाले. श्रीमहाराजांनी स्थापन केलेल्या पहिल्या राममंदिराची स्थापना मोठ्या अभूतपूर्व अशा समारंभात झाली.
बत्ताशा घोडा व लंगडी गाय - श्रीमहाराजांवर विशेष निष्ठा असलेल्या, भिकाजी श्रीपत नावाच्या एका फौजदाराने श्रीमहाराजांना उत्तम जातीचा एक पांढरा, सुंदर, मस्त घोडा अर्पण केला. श्रीमहाराजांखेरीज तो कोणाला दाद देत नसे.त्या मूक जनावराचे श्रीमहाराजांवर आणि श्रीमहाराजांचे त्याच्यावर विलक्षण प्रेम होते. श्रीमहाराजांनी ' बत्ताशा ' अशी हक मारून पाठीवर थाप मारताच तो घोडा आनंदाने फुरफुरू लागे. श्रीमहाराज पुष्कळ वेळा त्याच्यावर बसून त्याला चांगला लांब फिरवून आणीत तेव्हा स्वारी मोठी खूश असे.
          पोसायची ऐपत न राहिल्याने एकाने आपली जनावरे काढून टाकण्यास आरंभ केला..त्याच्याजवळ एक लंगडी गाय होती. ती त्याने श्रीमहाराजांना दिली. या गायीचाही श्रीमहाराजांना लळा होता. श्रीमहाराजांनी ' गंगे ' असे म्हणून एकदा प्रेमाने कुरुवाळून तिच्याशी संभाषण केल्यावरच ती निमुटपणे गोठ्यामध्ये जाई.
बाळंभट जोशी - बाळंभट जोशी हे गोंदवल्यास दत्तमंदिरामध्ये पुजारी होते. त्यांना गांजाचे व्यसन लागले. नामस्मरण करण्याच्या अटीवर ' मी तुमचे व्यसन पुरवीन ' असे श्रीमहाराजांनी त्यांना सांगितले. रोज नेमून दिलेला जप करण्याच्या मोबदल्यात श्रीमहाराज एक आण्याचा गांजा आणवून देत असत. श्रीमहाराज स्वत: जातीने हे करतात हे पाहून एका प्रसंगी बाळंभटांना वैषम्य वाटले आणि त्यांनी श्रीमहाराजांच्या साक्षीने, रामाच्या पायावर हात ठेवून शपथ घेतली आणि त्या दिवसापासून ते सर्व व्यसनातून मुक्त झाले. 
बापूसाहेब साठ्ये - बापूसाहेब साठ्ये यांची मूनसफ म्हणून दहिवडीला बदली झाली. त्यांना पोटदुखीचा जुनाट विकार होता. ते श्रीमहाराजांच्या दर्शनाला गेले असता श्रीमहाराजांच्या गोड व नम्र वागण्याची बापुसाहेबांवर छाप पडली. श्रीमहाराजांच्याकडे जेवायला गेले असता श्रीमहाराजांनी दिलेल्या झुणकाभाकरीच्या कृपाप्रसादाने त्यांची पोटदुखी कायमचीच गेली. 
शंकरशास्त्री म्हासुर्णेकर - शंकरशास्त्री म्हासुर्णेकर यांची श्रीमहाराजांच्या ठिकाणी फार निष्ठा होती. काव्यनाटकादि पढलेले शास्त्रीबुवा मोठे भाविक व सात्त्विक वृत्तीचे होते. श्रीमहाराजांचे त्यांच्यावर फार प्रेम होते, इतकेच नव्हे तर श्रीमहाराजांनी अनुग्रह देण्याचा अधिकार त्यांना दिला होता. 
मद्रासची अम्मा - श्रीब्रह्मानंदांच्या सल्ल्यानुसार मद्रासहून गोंदवल्यास आलेल्या एका मुलीला श्रीमहाराजांनी आश्रय दिला. श्रीमहाराज तिला अम्मा म्हणत. तिला शिवणकाम आणि जरीची कलाकुसर छान करता येत असे. राम, लक्ष्मण व सीता यांच्यासाठी सुंदर सुंदर पोशाख श्रीमहाराज तिच्याकडून तयार करून घेत. अम्मा जाऊन-येऊन गोंदवल्यास राहत असे. शेवटचे दिवस तिने गोंदवल्यास काढले.   
बोधवचने - प्रसंगोपात्त  श्रीमहाराजांनी केलेला उपदेश, त्यांचे बोल बोधवचनासमान आहेत.
          ' राम देतो तेवढ्यामध्ये समाधान मानायला शिकावे. रामाचे देणेच तेवढे हिताचे असते, आपले देहबुद्धीचे लोढणे त्याच्याखाली जोडू नये. ' 
          ' प्रापंचिक माणसाने घरात असलेले सर्व देऊन टाकू नये हि गोष्ट खरी, परंतु प्रसंग आला असता सर्व देण्याची तयारी पाहिजे हेही खरे. थोर मनाच्या माणसाला परमार्थ साधतो.' 
          ' भगवंताला सर्वांपेक्षा ' स्व ' द्यायला पाहिजे. ' स्व ' दिल्यावर सर्व न दिले तरी चालते, कारण ते आपले - आपल्या मालकीचे - राहातच नाही. उलट सर्व देऊनही जर ' स्व ' द्यायचा राहिला तर सर्व दिल्याचे समाधान मिळत नाही. भगवंताला ' स्व ' देणे म्हणजे ' मी त्याचा आहे ' ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवणे होय.' 
          ' नाम हे ओंकाररूप आहे. ते वेदारंभी आहे, ते वेदांच्या अंतीही आहे, तेच भगवंताला प्रिय आहे. म्हणून ते घेत गेल्याने भगवंताची भक्ती घडते. कलीयुगामध्ये तर हेच साधन थोर आहे. ' 
धाकटे राममंदिराची स्थापना - श्रीमहाराजांचा व्याप जसा वाढू लागला तसे गोंदवल्यास दर्शनास, वास्तव्यास येणाऱ्यांची संख्याही वाढू लागली. थोरले मोठे राममंदिर अपुरे पडू लागल्याने श्रीमहाराजांनी धाकटे राममंदिर बांधले आणि लोकांना - विशेषत: सहकुटुंब येणाऱ्यांना - उतरण्यास व सामान ठेवण्यास सोयीचे व्हावे म्हणून काही खोल्यादेखील बांधल्या. 
वैदिक कर्म व नामाचे श्रेष्ठत्त्व - श्रीमहाराजांनी वैदिक विद्वानांच्या विप्रसभेत केलेल्या भाषणाचा, सडेतोड प्रतिपादनाचा सारांश -
          ' वेदांची आज्ञा मला शिरसावंद्य आहे. वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते हेही मी मान्य करतो. परंतु ज्या भगवंताची प्राप्ती  व्हावी म्हणून चित्तशुद्धी करायची त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल तर कर्ममार्गाचे पर्यवसान कर्मठपणामध्ये होते. शिवाय सध्याच्या काळी बाह्य परिस्थितीमध्ये फरक पडला म्हणून, आणि लोकांच्या श्रद्धेमध्येही फरक पडला म्हणून, वैदिक कर्मे जशी व्हायला हवीत तशी होत नाहीत. म्हणून आपण कर्ममार्गाने जात असता कर्माची पूर्तता होण्यास आज भगवंताच्या नामाची अत्यंत गरज आहे. कर्ममार्ग मनापासून करणाऱ्या माणसामध्ये नुसते कर्म करणे हेच सर्वस्व आहे अशी कर्मठपणाची भावना उत्पन्न होते, आणि माझा आक्षेप त्याबद्दलच आहे. एरवी कर्ममार्गी माणसाच्या शिस्तीबद्दल  व संयमाबद्दल मला आदराच आहे. एक रामनाम घेतले म्हणजे सर्व धर्मबंधने माफ होतात हा समाज खरा नाही. परंतु कर्माने चित्त शुद्ध होत असता नामाने भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत राहते; इतकेच नव्हे तर पूर्ण चित्तशुद्धी  होऊन कर्म गळून गेल्यावर फक्त नामच शिल्लक राहते, आणि आपण भगवंताशी एकरूप झालो की ते त्यामध्ये मुरून जाते. ' 
          ' रामनाम हा नुसता मंत्रच आहे असे नव्हे तर तो सिद्धमंत्र आहे ! तो भगवंतापर्यंत नेतो, नव्हे नव्हे, तो भगवंताला आपल्याकडे खेचून आणतो हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. वाटेल त्याने रामाच्या या सामर्थ्याचे प्रत्यंतर पहावे. रामनाम देहबुद्धी  जाळणारा अग्नी  आहे  '
          ' रामनाम हे ओंकाराचे स्वरूप आहे. ते सर्व कर्मांचा व साधनांचा प्राण आहे. श्रीशंकरापासून तो समर्थांच्यापर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केले. रामनामाचा साडेतीन कोटी जप जो करील त्याला त्याच्या देवतेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. रामनामाचा आधार घेऊन आपण सर्वांनी राम जोडावा. '  
आईची कशीयात्रा -श्रीमहाराज आठदहा वर्षे गोंदवल्यास स्थिर राहिल्यावर त्यांचा लोकसंग्रह फार वाढला, आणि  अनेक क्षेत्रातील लहानमोठी माणसे या ना त्या निमित्ताने त्यांच्याकडे येत असत.लोक त्यांना खूप मान देत. विद्वान मंडळीतही त्यांना आदराचे स्थान होते. या साऱ्याचे ,श्रीमहाराजांच्या आई, गीताबाईंना खूप कौतुक होते. या काळातच श्रीमहाराजांना  दोन मुले झाली; परंतु ती तान्हेपणीच वारली. 
          श्रीमहाराज आपल्या आईची फार मनापासून सेवा करीत. आईने काशीयात्रेला जाण्याची इच्छा व्यक्त करताच श्रीमहाराजांनी काशीयात्रेची तयारी सुरु केली. श्रीमहाराजांची पत्नी, जिला लोक आदराने 'आईसाहेब ' म्हणत, तिला काशीयात्रेला येण्याची इच्छा होती, पण तिची समजूत काढून तिला माहेरी धाडली आणि मोठ्या लव्याजम्यासह यात्रेसाठी प्रस्थान केले. निघण्यापूर्वी श्रीमहाराजांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वांच्या नावाने पाणी सोडले. लोकांनी ज्याला जी वस्तू हाती लागली ती ते घेऊन गेले. घर धुतल्याप्रमाणे स्वच्छ झाले. 
          श्रीमहाराज नाशिकमार्गे प्रयागला गेले. प्रयागमध्ये श्रीमहाराजांनी आईला त्रिवेणी संगमामध्ये स्नान घातले. तीन रात्री तेथे राहून सर्वजण काशीला आले. 
          मसुरियादिन शिवमंगल नावाचा ब्राह्मण श्रीमहाराजांचा पंडा होता. हा फार श्रीमंत व वजनदार मनुष्य होता. तो श्रीमहाराजांना गुरुस्थानी मानीत असे. त्याने मोठ्या आनंदाने आणि दिमाखात श्रीमहाराजांची काशीमध्ये राहण्याची व्यवस्था केली. श्रीमहाराज तेथे जवळजवळ एक महिनाभर राहिले. आईला रोज स्वत: उचलून ते तिला एखाद्या लहान मुलाप्रमाणे सांभाळत गंगास्नानासाठी घेऊन जात. श्रीमहाराजांनी आईच्या हातून पुष्कळ  दानधर्म, अन्नदान करविले. याच काळात काशीमध्ये आत्मानंदसरस्वती नावाच्या विद्वान व साधनी संन्याशाचा परिचय झाला. त्याला रामनामाचे महत्त्व पटवून दिले. स्वामींनी श्रीमहाराजांकडून रानामाची दीक्षा घेतली, आणि श्रीमहाराजांनी त्यांना दीक्षा देण्याचा अधिकार दिला. 
          काशीमध्ये एक महिनाभर राहून श्रीमहाराज आईला घेऊन गयेला गेले. तेथे पिंडदान करून सर्व मंडळी अयोध्येला गेली. जवळपास पन्नास दिवस चाललेली तीर्थयात्रेची दगदग गीताबाईंना सोसवली नाही. अयोध्येत त्यांना थकवा जाणवू लागला. अशक्तपणा वाटू लागला. औषध घेण्यास त्यांनी संमती दिली नाही. अन्नही घेणे बंद झाले. अंथरुणावर पडल्या पडल्या त्यांचे नामस्मरण सारखे चालू असे. श्रीमहाराज सारखे आईजवळ राहून सेवा करीत होते. आईची शरयू नदीत स्नान करण्याची आणि दानधर्माची इच्छा श्रीमहाराजांनी पूर्ण केली. अंतकाळ जवळ आल्याचे गीताबाईंनी ओळखले. गीताबाईंनी अगदी शांतपणे श्रीमहाराजांच्या मांडीवर ' राम  राम ' म्हणत देह ठेवला. श्रीमहाराज एवढे धैर्याचे पर्वत खरे, पण आईचा शेवटचा श्वास संपल्यावर ' आई ! तू गेलीस ना ! ' असे शब्द त्यांच्या तोंडातून निघून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. वयाच्या बाराव्या वर्षी सर्वसंगपरित्याग करणाऱ्या श्रीमहाराजांना जगामध्ये रामरायाच्या खालोखाल आपल्या आईचे प्रेम होते.या प्रसंगी सहजस्फूर्तीने श्रीमहाराजांच्या मुखातून जे अभंग बाहेर पडले ते हृदयस्पर्शी आणि आईच्या प्रेमाने ओथंबलेले होते. ' दया करी राम-सीता | सांभाळावी माझी माता  || ....................................' 
          दहाव्या दिवसापासून त्यांनी आईची उत्तरक्रिया करण्यास प्रारंभ केला. तेराव्या दिवसापर्यंत असंख्य गरिबांना अन्नदान, दानधर्म, शंभर गायींचे दान, प्रत्येक भिकाऱ्याला घोंगडी दान असा अमाप खर्च श्रीमहाराजांनी आईच्या नावे केला. 
          आईचे सर्व उत्तरकार्य आटोपून श्रीमहाराज सर्व मंडळीना घेऊन इंदूरला आले. भय्यासाहेब मोडकांच्या घरी त्यांचा मुक्काम होता. श्रीमहाराज पुन्हा इंदूरला आले आहेत हे कळल्याबरोबर पूर्वीचे ऋणानुबंधी असे हजारो लोक त्यांच्या दर्शनास येऊन गेले. 
          श्रीमहाराज इंदूरमध्ये असताना दुष्काळ पडला. श्रीमहाराजांनी या काळात गरिबांना अन्नदान केले. श्रीमहाराज नैमिष्यारण्यात जाण्यास निघणार होते म्हणून त्यांनी इंदूरच्या सर्व लोकांना गावजेवण दिले. बरोबरच्या काही लोकांना श्रीमहाराजांनी आपापल्या घरी परत पाठविले. यानंतर भय्यासाहेब मोडक यांना बरोबर घेऊन श्रीमहाराज नैमिष्यारण्यात गेले. तेथून श्रीमहाराज उज्जैनच्या जंगलात शिरले. तेथे एका गुहेत श्रीमहाराजांनी  एका महायोग्याचे दर्शन भय्यासाहेब मोडक यांना घडविले. 
          श्रीमहाराज नंतर परत इंदूरला गेले आणि तेथून हर्द्याला आले. तेथे काशिनाथभय्या सावकार यांनी बांधलेल्या मंदिरात श्रीमहाराजांच्या हस्ते रामाची स्थापना झाली. हार्द्यास एक महिनाभर राहून बरोबरच्या मंडळींसह श्रीमहाराज नाशिकला आले. नाशिक येथे आईच्या नावाने श्रीमहाराजांनी गंगेवरच्या भिकाऱ्यांना एक दिवस धन्य वाटले. 
गोंदवल्यास पुनरागमन -
          गोंदवले सोडून श्रीमहाराजांना वर्ष होऊन गेले होते. म्हणून नाशिकहून सरळ घरी येण्याचे ठरले. गोंदवल्याहून निघताना बरोबर आई आणि शंभर माणसे होती. गोंदवल्यास परत येताना बाकीची सर्व मंडळी होती परंतु आई मात्र नव्हती !
|| जय जय रघुवीर समर्थ ||                                 
,