Sunday, April 17, 2011

श्रीमहाराज ' नामावतार ' - ९





|| श्रीराम समर्थ ||
   || श्रीसद्गुरु  ब्रह्मचैतन्य महाराज समर्थ ||


          भगवंत आत्मज्ञानी भक्ताचे भजन कोण्या पद्धतीने चालते हे सांगत आहेत.-
मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्त: परस्परं |
                     कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च || गीता अ. १०-९ || 
          माझे परम भक्त निरंतर माझ्या चिंतनात तन्मय राहतात, त्यांचे प्राण मला अर्पिलेले असतात, आणि ते एकमेकाला बोध करीत व माझ्या कथा सांगत त्यातच नेहमी अत्यंत संतुष्ट आणि रममाण असतात.
          माझे भक्त स्वत:ला संपूर्णपणे भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेत निमग्न असतात. त्यांचे चित्त भगवंताच्या चरणकमलापासून कधीच विचलित होत नाही. प्रतिदिन ते भगवंताच्या लीलांचे स्तवन करण्यात रममाण झालेले असतात. त्यांचे चित्त, प्राण सतत भगवंताच्या ठायी विलीन झालेले असतात, आणि ते इतर भक्तांसमवेत भगवत चर्चा करीत आनंद अनुभवतात. 
          श्रीमहाराजांचा दिनक्रम गीतेतील या श्लोकानुरूप भगवंतमय होता. दासबोध, एकनाथी भागवत अशा धर्म ग्रंथांचे वाचन आणि त्यावर निरुपण रोज होत असे. ते, आलेल्या साधक भक्त परिवाराबरोबर दिव्य भगवतकथा सांगत, भगवत चर्चा करत, निरंतर भगवंत चिंतनात, नामस्मरणात मोठ्या आनंदात रममाण होत असत. रात्री भजनात तन्मय होत असत. श्रीमहाराजांचे प्राण भगवंताच्या नामासाठी समर्पित होते.
सन १८९६ ते १९०७ -     
          सन १८७६ नंतर वीस वर्षांनी १८९६ साली पुन्हा दुष्काळ पडला. श्रीमहाराज काशीयात्रेहून परत आल्यानंतर थोड्याच दिवसांनी दुष्काळाने आपले स्वरूप प्रकट केले. पहिल्या दुष्काळामध्ये ज्याप्रमाणे श्रीमहाराजांनी कामे काढून लोकांना खायला घातले. त्याचप्रमाणे यावेळी देखील त्यांनी व्यवस्था केली. जे लोक त्यांच्या शेतामध्ये कामाला येत त्यांना एक वेळचे जेवण मिळे. गावातील म्हाताऱ्याकोताऱ्यांना श्रीमहाराज फुकट धान्य देत. शिवाय मंदिरामध्ये बसून जो कोणी रामनामाचा दहा हजार जप करी त्याला एक वेळ जेवण मिळे. 
          श्रीमहाराज गोंदवल्यास परत आले असून तेथे स्थिर आहेत हे कळल्यावर लांबलांबून लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले. गोंदवले पुन्हा सजीव होऊन गजबजू लागले. श्रीमहाराजांकडे येणाऱ्या लोकात, बहुतेक लोक प्रपंचातल्या अडचणीतून मार्ग शोधण्यासाठी येत असत तर काही थोडे लोक पमार्थ साधण्यासाठी येत. विष्णूबुवा कुंभारे हे त्या थोड्या लोकात होते. त्यांनी एकदा श्रीमहाराजांना अनुग्रह देण्याची विनंती केली तेव्हा श्रीमहाराज म्हणाले ' तुम्हाला पूर्वी अनुग्रह झाला आहे ना ! मागच्या गुरूना जसे तुम्ही विसरला तसेच मला पण विसराल. एखाद्या पतिव्रतेसारखे गुरूशी वागावे लागते. आपला देह त्याला अर्पावा लागतो. एकदा एक गुरु केला म्हणजे दुसरा करू नये. ' यावर त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर श्रीमहाराजांनी त्यांना अनुग्रह दिला. हा अनुग्रह झाल्यावर विष्णूबुवांनी मोठ्या चिकाटीने जप केला. त्यांचे नामाचे प्रेम पाहून श्रीमहाराजांनी त्यांना दिक्षाधिकार दिला. वऱ्हाडात शेंदुर्णी गावी त्यांनी श्रीमहाराजांच्या नावाने मठ बांधला आणि आमरण भगवंताच्या नामाचा प्रसार केला.
          सन १८९७ सालचा एप्रिल महिना होता. दुष्काळाचे भयानक स्वरूप संपून लोकांना थोडी स्वस्थता लाभत होती. गोंदवले राममंदिर पुन्हा पूर्वीच्या वैभवात आले. श्रीमहाराजांचा भजन, निरुपण हा नित्याचा व्यवहार सुरु झाला. असेच एके दिवशी सकाळी सर्वजण भजनात तल्लीन असताना श्रीमहाराज पुढील अभंग पुन:पुन्हा म्हणत होते. 
 ' त्रेपन्न वर्षे भुमीभार |आता पाहू आपले घर ||
      देहमर्यादा सरली | मागे भक्ति करा भली ||
तुम्हा सांगितल्या खुणा | विसरू देऊ नका मना ||
      दीनदास आनंदला | राम बोलावितो मला || 
          लोकांना महाराज काय म्हणत आहेत हे उमगताच लोक हादरले, घाबरून गेले. तोच श्रीमहाराजांनी अभंग संपवला. भजन संपल्याचे सूचक असे ' जानकीजीवन स्मरण जय जय राम ' केले आणि म्हणाले, ' आज आता मी नैमिष्यारण्यात जाणार. माझ्यामागे तुम्ही सर्वांनी नामस्मरण करीत काळ घालवावा. ' हे ऐकून सर्व उपस्थितांना धक्का बसला. पुरुष, स्त्रिया, व मुले रडू लागली.श्रीमहाराजांच्या पाया पडून न जाण्यासाठी विनवू लागली. श्रीमहाराजांचा निश्चय पक्का होता. श्रीरामाला नमस्कार करून ते बाहेर पडले.सर्व जन समुदाय रडत रडतच त्यांच्या मागे लोटला. श्रीमहाराज टांग्यात जाऊन बसले. त्या वेळचे दृश्य अत्यंत हृदयविदारक होते लोक असहाय आणि दीन होऊन स्फुंदून रडण्यापलीकडे काही करू शकत नव्हते.
          टांगा चालू झाला तोच एकजण हात वर करून टांगा थांबवण्यासाठी  टांग्याच्या मागे धावत येत होता. श्रीमहाराजांनी टांगा थांबविण्यास सांगितले. घाबऱ्या घाबऱ्या कातर आवाजात तो मनुष्य सांगत होता,  'महाराज ! राम, सीताव लक्ष्मण यांच्या डोळ्यातून सारख्या अश्रूधारा वाहत आहेत !' हे ऐकून श्रीमहाराज उद्गारले, ' खरच ? ' टांगा मागे फिरला. टांग्यातून उतरल्यावर श्रीमहाराजांनी पाय धुतले आणि सोवळे नेसून रामापुढे गेले. रामरायाच्या डोळ्यातून गालावर ओघळलेले पाणी मऊ रुमालाने पुसून काढले, तरी अश्रूधारा येतच होत्या हे पाहिल्यावर श्रीमहाराजांचे डोळे पाणावले,' मी इथून निघून चाललो म्हणून का रडतोस ? मी जाऊ नये असे तुझ्या मनात असेल तर मला तरी जाऊन काय करायचे आहे ? हा बघ मी राहिलो. आता तू रडायचा थांब. ' हे त्यांचे शब्द ऐकल्यावर मूर्तीच्या डोळ्यातून पाणी येणे बंद झाले. 
          श्रीमहाराज गोंदवल्यास राहणार हे समजल्यावर दोन तीन तास असलेले उद्विग्नतेचे वातावरण एकदम नाहीसे होऊन जिकडेतिकडे प्रसन्नता भरून गेली. या प्रसंगा संदर्भात श्रीमहाराज म्हणाले, ' चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे. ज्याची भावना खरी शुद्ध आणि नि:संशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते. भावना मात्र शंभर नंबरी शुद्ध पाहिजे, तीत कसलीही भेसळ उपयोगाची नाही. ' 
          इंदूरच्या श्रीमहाराजांच्या भक्त असलेल्या गोदूबाईंच्या मुलाची मुंज होती. गोदूबाईंनी श्रीमहाराजांना पत्र लिहून इंदूरला येण्यास आमंत्रण केले. गोदूबाईंनी मुंज लागेपर्यंत श्रीमहाराजांची वाट बघितली, परंतु श्रीमहाराज  आले नाहीत. मुंजीची पंगत बसली. सर्व पदार्थ वाढून झाले. तूप वाढण्याची वेळ आली तेव्हा गोदूबाईंच्या लक्षात आले की परगावाहून मागवलेले तूप आलेले नाही. त्यांना प्रश्न पडला. श्रीमहाराजांच्या तसबिरीसमोर बसून, डोळ्यात पाणी आणून त्यांनी करुणा भाकली. तिला पूर्वी निरोपाच्या वेळचे शब्द आठवले, ' तू माझी आठवण केलीस की मी तुझ्याजवळ उभा राहीन. नामस्मरण करीत असावे.जेथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो.' तिने श्रीमहाराजांना कळवळून हाक मारताच श्रीमहाराज तसबिरीतून बाहेर आले. श्रीमहाराजांनी पावशेराच्या तुपाच्या भांड्यातून पंगतीत तूप वाढले.तीनशे पान जेऊन उठले पण त्या भांड्यात तितकेच तूप शिल्लक होते. श्रीमहाराज तिला म्हणाले ' गोदे ! तू स्वत:ला रामाची भक्त समजतेस ना ? मग येवढ्या सध्या प्रसंगाला घाबरतेस हे काय ? असो, त्याच्या नामाला विसरू नकोस. भगवंताच्या नामात फार मोठी सत्ता आहे. जो नामामध्ये स्वत:ला विसरला त्याच्या मागे मागे राम फिरला.' ' येतो ' म्हणून सांगून श्रीमहाराज देवघरामध्ये गेले आणि नाहीसे झाले. या प्रसंगाला उद्देशून श्रीब्रह्मानंद आरतीमध्ये म्हणतात -'इद्दल्लीद्दू दुरिन भक्तागे दर्शन कोट्टवने || ' ( एके ठिकाणी राहून अन्य ठिकाणी असलेल्या भक्ताला श्रीमहाराज दर्शन देतात.' )
          श्रीमहाराजांना पहिल्या कुटुंबापासून एक मुलगा व दुसऱ्या कुटुंबापासून दोन मुलगे व एक मुलगी झाली. तीनही मुलगे तान्हेपणीच वारले. मुलगी मात्र तीन वर्षांची होऊन कालवश झाली. श्रीमहाराज तिला ' शांता ' या नावाने हाक मारीत. ती भजनाचे वेळी मंदिरात श्रीमहाराजांच्या जवळ असे. ती गेली तेव्हा श्रीमहाराज बोलले, ' कोणाच्या पोटी कोण जन्म घेतो हे सामान्य माणसांना कळणे शक्य नसते. फक्त सत्पुरुषांना ते कळते. पुष्कळ वेळा चांगले अधिकारी जीव एखाद्या लहानशा वासनेमुळे अडकून पडतात. मग ते अध्यात्मदृष्ट्या चांगल्या कुळामध्ये जन्मास येतात. तेथे त्यांची ती वासना तृप्त व्हायला फारसा वेळ लागत नाही, म्हणून लहानपणीच ते जग सोडून जातात. त्यांच्या मृत्यूचे दु:ख करणे बरोबर नाही. वासनेशी झगडणे हे शुरांशी वैर करण्यासारखे आहे. ती केव्हा आपला घात करील याचा नेम नसतो. त्यासाठी सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा म्हणजे वासनेचे आपोआप तळपट होऊन जाते.' 
          भाऊसाहेब केतकर म्हसवडला असताना श्रीमहाराजांचा परिचय झाला होता. त्याला आता पंचवीस वर्षांचा काळ लोटला. या काळात ते श्रीमहाराजांच्या संपर्कात नव्हते. श्रीमहाराज गदगला गेले असता तिथे भाऊसाहेब भेटले. भाऊसाहेब जुनी ओळख विसरले होते. पण श्रीमहाराजांनी पूर्वी त्यांच्याबरोबर म्हसवडला गेल्याची आठवण सांगितली आणि विचारले ' तुम्ही रोज गीता वाचता का ? ' भाऊसाहेबांना सर्व आठवले आणि खूप आनंद झाला. वयाच्या पन्नासाव्या वर्षी झालेल्या या पुनर्भेटीला उद्देशून भाऊसाहेब सांगतात, ' अहो, काय सांगू तुम्हाला ! हरवलेली आई भेटल्यावर मुलाला जसे होते तसे मला झाले. आमचे नवराबायकोचे एकदम ठरले की आता श्रीमहाराजांच्याकडे जाऊन रहायचे, श्रीमहाराज सांगतील तसे वागायचे. त्यामुळे पेन्शन घेतल्यावर काय करावे ही अडचण मुळी राहिलीच नाही.' 
          कुच्ची या गावी कृष्णाजीपंत भागवत नावाचे हुशार व चिकित्सक गृहस्थ रहात होते. कलीयुगात खरे वैराग्य आढळणार नाही आणि वैराग्या अभावी कोणीही साधू बनणे शक्य नसल्यामुळे या काळात खरा भगवद्भक्त आढळणार नाही. जिकडेतिकडे भोंदूपणा, धूर्तपणा, स्वार्थ, आणि पैशाचा लोभ दृष्टीस पडेल, असे त्यांचे मत होते. श्रीमहाराजांना भेटल्यावर त्यांचे मतपरिवर्तन झाले. त्यांची डोकेदुखीची जुनी व्यथा गेली. त्यांना श्रीमहाराज हे प्रत्यक्ष मारुती आहेत असा साक्षात्कार झाला. तेव्हा श्रीमहाराज त्यांना म्हणाले, ' पंत, तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्वकाळ माझ्या संगतीचा लाभ घडेल. ज्याच्या मुखी नाम आहे, त्याच्या हृदयामध्ये माझी वसति राहे.' 
          पुण्यात श्रीमहाराजांची पुष्कळ मंडळी असल्यामुळे ते बऱ्याच वेळा पुण्यात येत.श्रीमहाराजांचा व लोकमान्य टिळकांचा निकट परिचय होता. श्रीमहाराज पुण्यास आले म्हणजे लोकमान्य एक रुपया व नारळ घेऊन न चुकता त्यांना भेटण्यास येत. त्यांचे बोलणे बहुधा एकांतात होत असे. श्रीमहाराज, लोकमान्य आपल्याला का आवडतात हे सांगताना म्हणत, ' अत्यंत नीतिमान, अत्यंत निर्भय, अत्यंत नि:स्वार्थी आणि भगवंतावर निष्ठा - या गुणांमुळे ते मला फार प्रिय आहेत. ' 
          मोरगिरीला श्रीमहाराजांचे एक राममंदिर आहे. तेथे वामनराव पेंढारकर या नावाचे एक चांगले उपासक होते. लग्न झाल्यानंतर बावीस वर्षांनी त्यांना मुलगा झाला. जरा मोठा झाल्यावर तो सारखा आजारी पडू लागला. शेवटचा उपाय म्हणून वामनराव सहकुटुंब गोंदवल्यास आले. मुलाला त्यांनी श्रीमहाराजांच्या पायावर घातले. त्यावेळी श्रीमहाराज म्हणाले, ' वामनराव, हा मुलगा रामाने आपल्याला दिला. ती त्याची ठेव आहे. तिचे काय करायचे हे आपण रामावर सोपवू. ' मुलगा जगला नाही. पण श्रीमहाराजांच्या सहवासात राहिल्याने त्या उभयतांनी तो काळाचा प्रहार  मोठ्या धीरोदात्तपणे झेलला. एखाद्या सत्पुरूषाप्रमाणे मुलाचे आईबाप शांत राहिले. रडणे, ओरडणे असे काही न करता मुलाची उत्तरक्रिया श्रीमहाराजांनी सांगितल्यानुसार केली. श्रीमहाराज म्हणाले, ' सत्संगतीने मनुष्याच्या वृत्तीत कसा पालट होतो हे या नवराबायकोच्या वागण्यावरून चांगले कळेल. सत्संगती आणि भगवंताचे नाम, यानेच होतो आराम. '     
          एकदा रात्री साडेअकराच्या सुमारास भजन आरती आटोपून श्रीमहाराज नागप्पा नावाच्या इसमाबरोबर कंदील, छत्री घेऊन बाहेर पडले. एका पडक्या घराच्या आसऱ्याने झोपलेल्या दोन वाटसरुना जागे करून मंदिरात  चलण्यास सांगितले. पाऊस पडत असल्याने ही भिंत केव्हाही कोसळेल असा इशारा दिला. त्यापैकी एक मुकाट्याने उठला व मंदिरात जाऊन निजला. दुसरा तेथेच पडून राहिला. रात्री पावसाचा जोर वाढला. भिंत  कोसळली व तो वाटसरू तिच्याखाली चिरडून मरण पावला. दुसऱ्या दिवशी श्रीमहाराजांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा ते बोलले, ' अरेरे !  मी त्याला काल रात्री सूचना देऊन आलो, पण त्याने ऐकले नाही . माणसांचे असेच घडते. सत्पुरुषाजवळ राहून जर मनुष्य आज्ञापालन शिकला नाही तर तो काहीच शिकला नाही. जो आज्ञापालन करील त्याला भोग भोगावे लागतील हे खरे, परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था होईल. प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे. भोग येण्याचा समय झाला म्हणजे प्रथम बुद्धीवर परिणाम करतो. तेथे आपण सावध राहून सत्पुरुषांच्या सांगण्याप्रमाणे वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावल्यावाचून राहणार नाही.' 
          गोंदवल्यास श्रीमहाराजांच्याकडे वामनराव या नावाचे एक वारकरी येऊन राहिले होते. श्रीमहाराजांचे कपडे वामनराव सांभाळीत. त्यांना ज्ञानेश्वरी वाचण्याचा व समजून घेण्याचा फार नाद असल्यामुळे लोक त्यांना ' वामनराव ज्ञानेश्वरी ' असे म्हणत. वामनराव मोठा साधक वृत्तीचा मनुष्य होता. त्याला कामक्रोधादी विकारांविषयी श्रीमहाराज सांगत होते, ' विकार हे काही मुळात टाकाऊ नाहीत. ते भगवंताने दिलेले आहेत म्हणून त्यांना जीवनात योग्य स्थान असेलच असेल; किंबहुना व्यवहारामध्ये विकारांची जरूर आहे. विकारांवर  आपण सत्ता गाजवून वापरायला शिकले पाहिजे, विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नये. विकारांना आपण वापरावे, विकारांनी आपल्याला वापरू नये.' 
          ' परमार्थ साधण्यासाठी विकार नाहीसे करायचे नसतात, पण ते पूर्ण ताब्यात मात्र ठेवावे लागतात. क्रोधाने साधकाची फार मोठी हानी होते.' 
          एकदा, ' रामाजवळ काय मागाल? ' असा प्रश्न करून श्रीमहाराज बोलले ' मी माझी जाणीव, मीपणाची जाणीव, नाहीशी कर असे मी मागेन. मीपणाची जाणीव परमार्थात फार घात करते. ती नाहीशी झाल्याशिवाय परमार्थात प्रगती होणार नाही.' 
           उत्सवासंदर्भात श्रीमहाराज सांगतात ' कोणत्याही देवाच्या उत्सवाचा मुख्य हेतू हा की, आपल्याला त्याचे स्मरण  अधिकाधिक व्हावे. भगवंताचे स्मरण हे भगवंताच्या प्राप्तीसाठीच करायचे असते. परंतु भगवंताचे नाम सर्व प्रकारच्या दुरितांचा पण नाश करते.' 
          ' पण नाम घेऊन प्रापंचिक सुख मागणे म्हणजे कामधेनू मिळत असता ती टाकून गाढव मागण्यासारखे आहे. नामाने प्रत्यक्ष भगवंत घरी येत असता पैसा, लौकिक किंवा संतती जर आपण मागितली तर ते दु:खाला कारण होते.' 
          ' स्वत:ला विसरणे म्हणजेच समाधी समजावी. नाम घेताना स्वत:चा विसर पडणे हि सर्वोत्कृष्ट समाधी होय. नामात  स्वत:ला विसरायला शिकावे.' 
         अण्णासाहेब कुबेर एकदा ' मला काहीतरी नियम सांगा ' असे म्हणून श्रीमहाराजांच्या मागे लागले. तेव्हा श्रीमहाराज म्हणाले की, ' नेहमी भगवंताचे नाम घेणे हाच सर्वोत्तम नियम आहे. मग आणखी निराळा नियम कशाला हवा? ' पण अण्णासाहेब म्हणायचे की  'जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आम्ही नियम पाळतो, मग परमार्थामध्ये का नको? ' त्यावर श्रीमहाराज म्हणाले ' प्रपंचातले नियम देहबुद्धीचे असतात, ते पाळणे सोपे असते. भगवंताचा नियम त्याच्या कृपेनेच पाळला जातो. मी नियम पाळीन असा अहंकार परमार्थात चालत नाही.' 
          श्रीमहाराजांनी सांगितलेला, रोज जेवणापूर्वी तीन वेळा 'श्रीराम ' म्हणण्याचा नियम अण्णासाहेब कुबेरांना पाळता आला नाही तेव्हा ते खजील झाले. श्रीमहाराजांना ' माझ्यावर कृपा करा ' अशी विनवणी करू लागले तेव्हा श्रीमहाराज म्हणाले, ' देहबुद्धीचे प्रापंचिक नियम आपल्या निश्चयाच्या जोरावर पाळता येतात; परंतु भगवंताचा नियम पाळायला आपल्या निश्चयाबरोबरच त्याच्या कृपेची जोड लागते. शिवाय, ज्या अर्थाने प्रापंचिक नियम अंगवळणी पडतो त्या अर्थाने भगवंताचा नियम अंगवळणी पडू नये. त्या नियमाच्या आचरणात नित्य नवे प्रेम आणि जिवंतपणा असावा. भगवंताच्या नियमाचे पालन जितके जास्त घडेल तितकी  त्याच्या अस्तित्वाची जाणीव वाढत जाणे जरूर आहे. म्हणून तो पळताना त्याच्या कृपेची याचना मनापासून करावी. तेथे मीपणाचे वारे नसावे.त्याचे नाम घ्यावे म्हणजे तो कृपा करतो. तसे केल्यावाचून  त्याला गत्यंतर उरत नाही.' 
श्रीमहाराज पुन्हा काशीयात्रेला निघाले.- 
       सन १८९७ साली श्रीमहाराज नैमिष्यारण्यात जाण्यास निघाले होते, त्यावेळी रामरायाच्या डोळ्यातून अश्रूपात झाल्यामुळे त्यांचे जाणे रहित झाले. त्यानंतर आठ वर्षे गेली. सन १९०५ साली ते पुन्हा काशीयात्रेस निघाले. निघण्याच्या वेळी श्रीमहाराज श्रीरामाच्या दर्शनासाठी आले. त्यांनी मोठ्या प्रेमाने रामरायाचा निरोप घेतला. बरोबर शंभर माणसे निघाली. इतकी सर्व मंडळी बरोबर घेऊन श्रीमहाराज प्रयागला गेले. 
          प्रयागला सर्वांसह श्रीमहाराज एका मोठ्या धर्मशाळेत उतरले. सर्व मंडळीनी तीर्थकृत्ये केली. वेणीदान हा विधी त्रिवेणी  संगमावर करावयाचा असतो. त्यासाठी नावेने संगमावर जावे लागते. वीस बावीस जोडप्यांसह श्रीमहाराज गंगेच्या किनाऱ्यावर आले. सर्व मंडळींसह श्रीमहाराज स्वत: नावेमध्ये बसले. बरोबर आलेले इतर यात्रेकरू तीरावरच थांबले. नावेत सर्व मंडळी अत्यंत आनंदात होती. नाव नीटपणे किनाऱ्यापासून साधारण पन्नास यार्ड गेली असेल इतक्यात तिच्या बुडाला भोक पडून नदीचे पाणी जोराने आत शिरू लागले. नावाड्याने पाणी आत येऊ न देण्याची खटपट सुरु केली. नावाडी पाणी काढण्याचा प्रयत्न करीत होता पण व्यर्थ. कारण पाण्याचा जोर इतका विलक्षण होता की नावेने आपली दिशा सोडली व ती नदीच्या धरेला लागून वहात चालली. नावेतील सर्व मंडळी घाबरली. सर्वत्र हाहा:कार उडाला. काही देवाचा धावा करू लागली, रडू, ओरडू लागली. किनाऱ्यावरच्या लोकांना मदतीसाठी हाक मारू लागली. मात्र श्रीमहाराज शांत होते. आपल्या मंडळींची भीतीने अशी स्थिती झालेली पाहून श्रीमहाराज मोठ्याने म्हणाले, ' बाळांनो ! घाबरू नका. राम आपला पाठीराखा आहे. आपण त्याचे नाव मोठ्याने घेऊन त्याचा धावा करू या. ' असे बोलून ज्या भोकातून पाणी आत येत होते त्याच्यावर आपली कफनी ठेवून श्रीमहाराजांनी आपल्या पायाने ती दाबून धरली आणि ' जय जय श्रीराम, जय जय श्रीराम ' असा घोष करून टाळ्या वाजविण्यास आरंभ केला. तीरावरच्या मंडळीतही घबराट पसरली. तीरावरच्या लोकांनी आरडाओरडा करताच सरकारी नावा  सुटून या नावेच्या दिशेने चालू लागल्या. किनाऱ्यावर श्रीमहाराजांबरोबर आलेली मंडळी एकच आकांत करू लागली. सरकारी नावा  बुडणाऱ्या नावेच्या जवळ येताच श्रीमहाराजांनी एका मोठ्या नावेत एक पाय व बुडणाऱ्या नावेत दुसरा पाय ठेऊन कमरेवर हात देऊन उभे राहिले  व इतर मंडळींना म्हणाले, ' त्या नावेत चला सगळे. एकेकजण हळूहळू जा. ' सर्व माणसे लगबगीने नव्या नावेमध्ये बसली. सगळेजण नव्या नावेत आलेत याची खात्री झाल्यावर फुटक्या नावेवरचा आपला पाय श्रीमहाराजांनी उचलला. पाय उचलताच फुटकी नाव गंगेच्या पोटात नाहीशी झाली. सर्व सुखरूप तीरावर आले. पुढे नंतर वेणीदानाचा समारंभ पार पडला. 
          प्रयागला बरेच दिवस राहून मग सर्व मंडळींना घेऊन श्रीमहाराज काशीला गेले. श्रीमहाराज काशीला आले आहेत हे समजल्याबरोबर शेकडो स्त्रीपुरुष श्रीमहाराजांच्या दर्शनास येऊ लागले. 
          काशीत मुक्काम असताना श्रीमहाराजांचा ठरलेला असा कार्यक्रम नसे. सामान्यत: रोज सकाळी कोणीतरी दर्शनासाठी येई. त्यावेळी चर्चेमध्ये भगवंताच्या भक्तीबद्दल अनेक रीतीने विवेचन होई. बारा वाजण्याच्या सुमारास सर्वजण गंगेवर स्नानासाठी जात. स्नान करीत असताना श्रीमहाराज पोहत असत. त्यांना उत्तम पोहता येत असे. स्नान आटोपल्यावर ते विश्वेश्वराच्या दर्शनास जात. नंतर घरी परत आल्यावर  भोजन होई व संध्याकाळी पुन्हा गंगादर्शन व देवदर्शन बहुतेक होई. रात्री भजन व आरती होऊन नंतर मंडळी झोपी जात. 
          काशीमध्ये श्रीमहाराजांच्या प्रेमातला एक मोठा वेदांती पंडित होता. त्याला वादाची भारी हौस होती. वादाचा फोलपणा सांगताना एकदा श्रीमहाराज त्याला म्हणाले, ' नामाने जे काम होते ते जगामध्ये कोणालाही-प्रत्यक्ष भगवंताला देखील करता येत नाही. इत:पर वादाच्या ऐवजी नामाची हौस बाळगावी. विद्वत्तेचा उपयोग  नामाची निष्ठा वाढविण्याकडे करावा, आधी नाम घ्यावे आणि मग वाटले तर विद्वत्ता मिळवावी. पण ज्याला नामाची चटक लागली तो इतर भानगडीमध्ये पडतोच कशाला? '
          काशीला बरेच दिवस काढून श्रीमहाराज अयोध्येला गेले. अयोध्येला असतानाच श्रीमहाराज नैमिष्यारण्यात जाऊन आले व नंतर सर्व मंडळींना घेऊन इंदूरला गेले. पूर्वीची सर्व मंडळी दर्शनास येऊ लागली. श्रीमहाराज इंदूरहून हरद्यास आले. येथे त्यांचा दीड दोन वर्षे मुक्काम झाला. हा सर्व काळ फारच 
आनंदात  गेला; आणि त्या प्रांतातील पुष्कळ लोक भगवंताच्या नामाला लागले. हर्दा येथेच श्री.न.चिं.केळकर हे श्रीमहाराजांना भेटले. त्यांचे वडील व मोठे बंधू हे श्रीमहाराजांचे अनुग्रहित होते. 
          शंकासमाधानाबद्दल श्रीमहाराज सांगतात, ' शंका हि फार चिवट आहे. ती मरता मरत नाही. शिवाय काही शंका आचरणाने आणि अनुभवानेच नाहीशा होतात. म्हणून मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते आणि सर्व शंका विरून जातात.' 
          हरद्यास असतानाच श्रीमहाराज पुन्हा एकदा अयोध्यामार्गे नैमिष्यारण्यात जाऊन आले. 
          ' मला देव दाखवा ' असा हट्ट करून उपोषणास बसलेल्या एका साधकाला श्रीमहाराज सांगतात ' भगवंत हा हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही. तो एका प्रेमानेच वश होतो. प्रेमामध्ये  हट्ट आणि कष्ट झाले तर ते शोभतात आणि हिताचे होतात. आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेव्हढे बघतो. परमार्थ आपोआप वाढावा , त्याला ताण देऊन वाढवू नये.' 
          हरद्यास असतानाच वडिलांची श्राद्धतिथी आल्याने श्रीमहाराजांनी तेथेच श्राद्धविधी केले. 
          श्रीमहाराज पुन्हा ऑक्टोबर १९०६ मध्ये नैमिष्यारण्यात गेले. ' तुमच्या अंतकाळी मी हजार राहीन ' असे वचन श्रीमहाराजांनी नानासाहेब पेशवे यांना दिलेले होते. ते वचन पूर्ण करण्यासाठी श्रीमहाराज नैमिष्यारण्यात आलेले होते. नानासाहेब त्यावेळी खूपच आजारी होते. दोघांची दृष्टादृष्ट होताच दोघांच्याही डोळ्यातून पाणी वाहू  लागले. त्यानंतर नवव्या दिवशी नानासाहेब पेशव्यांनी देह ठेवला. श्रीमहाराजांनी स्वत: त्यांच्या चितेला अग्नी  दिला. 

|| जय जय रघुवीर समर्थ || 
                         


     
                  

No comments:

Post a Comment