Monday, February 28, 2011

श्रीमहाराज ' नामावतार ' - ४




 || श्रीराम समर्थ ||
   || श्रीसद्गुरु  ब्रह्मचैतन्य महाराज समर्थ ||
 
          श्रीभगवंत योगभ्रष्टाच्या गतीविषयी सांगत आहेत :-
' तत्र तं बुद्धिसंयोगम लभते पौर्वदेहीकम ||
                          यतते च ततो भूय: संसिद्धौ कुरुनन्दन || गीता अ. ६/४३ || '
          ' हे कुरुनन्दन ! ( पुण्यवान कुळात जन्म घेणाऱ्या ) त्याला त्या ठिकाणी पूर्व देही ( पूर्व जन्मात ) केलेली साधन-संपत्ती ( सहजच ) प्राप्त होते. मग ( तो ) तिच्या ( बुद्धिसंयोग अर्थात समत्व बुद्धियोगाचे संस्काराच्या ) साह्याने साधन सिद्धीच्या विषयात ( परमात्म प्राप्तीसाठी ) पुन्हा ( विशेषतेने ) प्रयत्न करतो.'
' पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोsपि स: |
   जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते || गीता अ. ६/४४ || '
          ' तो ( श्रीमंतांच्या घरी जन्म घेणारा योगभ्रष्ट पुरुष ) भोगांना परवश होऊन देखील त्या पूर्व जन्मात केलेल्या अभ्यासाच्या ( साधनेच्या ) कारणानेच परमात्म्याकडे आकर्षिला जातो, कारण समत्वबुद्धिरूप योगाचा जिज्ञासू सुद्धा वेदांमध्ये सांगितलेल्या सकाम कर्मांच्या फळांना उल्लंघून जातो. '
         पूर्वजन्मात केलेल्या साधनेचे जे संस्कार बुद्धीत मुरलेले असतात ते सर्व या जन्मात प्राप्त होत असतात ,  
जागृत होत असतात. पूर्वजन्मात केलेल्या अभ्यासामुळे तो या जन्मात परमात्म्याकडे आकर्षिला जातो.याच्या   
पाऊलखुणा या जन्मातील बालपणातच स्पष्टपणे दिसू लागतात.
          श्रीमहाराजांच्या अगदी कोवळ्या शिशुवायातच त्यांच्या अध्यात्मिक वृत्तीचा प्रत्यय वडिलधार्याना येऊ लागला. या संदर्भात श्रीमहाराजांचे आजोबा आणि वडिलांना त्यांच्याविषयी काय वाटत असे हे सांगणाऱ्या 
' श्रीसद्गुरुलीलामृत ' ग्रंथातील खालील ओव्या बोलक्या आहेत.
" यासी बाळ म्हणो नये | बुद्धीने हा वडिल होये | भक्तियुक्त नाम गाये | राम राम म्हणोनी || अ.३ स. २/२१ ||
आमचे घरी कुलदैवत | पंढरीनाथ नेमस्त | परि हा दिसे रामभक्त | पूर्वसंस्कारे || अ.३ स. २/२२ ||
जन्मार्जित तप केले | अथवा रामदूत अवतरले | उपजत ज्ञान कैसे आले | याजपासी || अ.३ स. २/२३ || "
श्रीमहाराजांचे बालपण :-
          श्रीमहाराजांचे बाळपणीचे साजिरे गोजिरे रूप पाहून रावजी-गीताबाई तर हरखून गेलेच पण शेजारीपाजारीही त्या रूपाच्या प्रेमात पडले. रावजिंसारखा संसारात विरक्त वृत्तीचा माणूसही बाळाला एकदातरी पाहिल्याशिवाय, जवळ घेतल्याशिवाय घराबाहेर पाऊल टाकत नसे. पाचव्या महिन्यात बाळ रांगू लागले. खाली वस्तू ठेवायची सोय राहिली नाही. देव्हाऱ्यातले देवही जागेवर राहत नव्हते. खाकेत खवला असे बाळ कोणाच्या न कोणाच्या कडेवर असे.
          श्रीमहाराजांच्या आई, गीताबाईंना काम करतानाही बाळाला कडेवर घेऊनच फिरावे लागे. त्यांची फारच तारांबळ उडत असे. भजन सुरु झाले,की मात्र बाळाला भजनाचे जागी आजोबांच्याजवळ दिल्यावरच तो शांत असे. आजा -आजींनाही बाळाचा विलक्षण लळा लागला. ते बाळाला प्रेमाने ' गणू ' म्हणत असत. श्रीमहाराज जसजसे मोठे होऊ लागले तसतसे त्यांचे खाणे-पिणे, निजणे-उठणे, स्नान करणे, कपडे घालणे इत्यादी गोष्टी आजोबा आणि आजी मोठ्या लाडाने करत असत.
          श्रीमहाराज वयाच्या चौथ्या वर्षी धुळाक्षरे काढायला शिकले. आजोबांच्या पाठोपाठ गीतेतील श्लोक म्हणू लागले. त्यावर चिंतन करू लागले.अर्थ समजून घेऊ लागले.पंतांनी गीतेचा एखादा श्लोक म्हणावयास सांगितला की श्रीमहाराज तो पाठ म्हणून दाखवीत. श्रीमहाराज एकपाठी होते. आजोबांच्या बरोबर जप करू लागले.पंतांच्या बरोबर भजनात दंग होऊन नाचू लागले. या साऱ्याची त्यांना गोडी लागली.बाळगणूची शिशुवयातील तल्लख बुद्धी आणि देवाविषयीची, भजनाची आवड पाहून पंताना वाटे की, हे बालक हि जणू अमृतवल्ली आहे आणि ती पांडुरंगाच्या कृपेने आपल्याला लाभली आहे. बाळगणू हा कोणी योगभ्रष्ट सत्पुरुष असावा असे पंताना वाटत असे.
          श्रीमहाराजांची सहाव्या वर्षी मुंज झाली. भटजींकडून संध्या, पुजा, वैश्वदेव, पवमान, रुद्र या सर्व गोष्टी त्यांनी काही महिन्यातच आत्मसात केल्या. जप, ध्यान याविषयी जिज्ञासा निर्माण झाली. अध्यात्मात रुची वाढीला लागली. मुंज झाल्यावर श्रीमहाराजांच्या वृत्तीत विशेष बदल झाला. आजोबांनी सांगितलेल्या भगवंत भक्तांच्या कथाश्रवणाने ते अंतर्मुख होऊ लागले. नदीकाठी एकांतात ध्यानस्थ बसत असत.
          श्रीमहाराजांना वयाच्या सातव्या वर्षी अण्णा खर्शीकर मास्तर चालवत असलेल्या शाळेत घातले. अण्णा मास्तरांच्या जवळ असलेली विद्या श्रीमहाराज पाहता पाहता शिकले. शाळेत शिकण्यासारखे काही शिल्लक नाही हे ध्यानी येताच इतर मुलांना बरोबर घेऊन ओढ्यावर जाऊन खेळ खेळू लागले. गावातील सर्व मुलांचे म्होरके अन लाडके झाले. श्रीमहाराजांचे गोड अन प्रेमळ बोल मुले झेलत असत. पोहणे, घोड्यावर बसणे, सूरपारंब्या अशा सर्वच खेळात ते प्रवीण होते. श्रीमहाराजांच्या बरोबर मुले खेळावयास गेल्याने शाळा बंद पडायची वेळ आली. अण्णा मास्तरांनी श्रीमहाराजांची तक्रार  लिंगोपंतांच्याकडे केली. श्रीमहाराजांची शाळा येथेच संपली. मुलांबरोबर खेळता खेळता मधून मधून श्रीमहाराज ' श्रीराम,श्रीराम ' असे भजनही करत असत. श्रीमहाराजांच्या संगतीत इतर मुलांच्या वृत्तीतही बदल होत होता. शाळेतही मुलांचे श्रीरामाचे भजन सुरु झाले. या साऱ्याला कंटाळून अण्णामास्तरांनी आपला गाशा गुंडाळला आणि गाव कायमचेच सोडले.
          श्रीमहाराजांच्या खोड्या, खेळ, ध्यानधारणा यामुळे आजोबा, गीताबाई धास्तावले. ' आपली 
कुलकर्णीपणाची वृत्ती आणि आपले वतन मी नीट सांभाळेन ' असे वचन श्रीमहाराजांनी आईला दिल्यावरच त्या माऊलीला हायसे वाटले. तथापि श्रीमहाराज आणि त्यांच्या मित्रांच्या खोड्या, खेळ चालूच राहिले.
          श्रीमहाराज आता नऊ वर्षांचे झाले होते. शाळेत जाणेही बंद झाले होते. श्रीमहाराजांना गुंतवून ठेवण्यासाठी त्यांना रानात गुरे चरायला धाडण्यात आले. गुराख्यांच्या पोरांबरोबर, गोपालांबरोबर रानातही खेळ सुरु झाले. या खेळाचे स्वरूप जरा भिन्न होते. चार दगड मांडत. राम, लक्ष्मण, सीता असे तीन दगड मांडून त्यासमोर एक दगड ठेवत, तो म्हणजे मारुती. त्यांच्याभोवती गोपाळांसह श्रीमहाराज फेर धरून भजन म्हणत नाचू लागत. इकडे गुरांच्याकडे कोणाचे लक्ष नसल्याने ती आजुबाजूच्या शेतात शिरून नासधूस करू लागली. याही तक्रारी पंतांच्याकडे गेल्या. गीताबाईही या रोजच्या कटकटीना कंटाळल्या. श्रीमहाराजांचे रानात जाणेही बंद झाले.
          याच काळात लक्षात यावा असा श्रीमहाराजांच्या वृत्तीमध्ये बदल घडत गेला. नदीकाठी, एकांतात ते तासनतास ध्यानस्थ बसू लागले. अंतरात श्रीरामाचे अनुसंधान चालू असे. गावातल्या मारुतीमंदिरात येणाऱ्या साधू, बैरागी, गोसावी, यात्रेकरूना श्रीमहाराज भेटत असत. भगवंताविषयी अनेक प्रश्न विचारीत असत. श्रीमहाराजांचे त्यांच्या उत्तरांनी क्वचितच समाधान होत असे. श्रीमहाराजांना, भगवंताविषयीची तीव्र जिज्ञासा आणि दर्शनाची तळमळ लागली. ' सद्गुरुंवाचून भगवंताचे दर्शन होत नाही आणि त्यासाठीच मी गावोगाव गुरूंच्या शोधार्थ फिरत आहे ' हे एका वृद्ध रामदासींचे उद्गार ऐकल्यापासून सद्गुरूंना शोधण्यासाठी आपल्याला घराबाहेर पडले पाहिजे असा विचार श्रीमहाराज करू लागले.
          आपल्या दोन खास बालमित्रांपैकी, एक श्रीमहाराजांचा चुलतभाऊ दामोदर आणि दुसरा वामन म्हासुर्णेकर यांना श्रीमहाराजांचा गुरुशोधार्थ पळून जाण्याचा विचार पसंत पडला. घरात वडीलमंडळीना न सांगता श्रीमहाराज त्या दोघांबरोबर घराबाहेर पडले. मजल दरमजल करीत कोल्हापूरला आले. तेथे अंबाबाईचे दर्शन घेतल्यावर एका धर्मशाळेत राहिले. कोवळे वय, तेज:पुंज, गोरेगोमटे असे श्रीमहाराजांचे रूप पाहून लोक त्या बालब्रह्मचारींच्या दर्शनाला येऊ लागले. त्यांच्यासमोर फळे, फराळ ठेऊ लागले.मात्र श्रीमहाराजांचा चुलतभाऊ दामोदर एक-दोन दिवसातच कंटाळला. घरच्यांची आठवण आल्याने ' घरी जातो ' असे सांगून गोंदवल्यास परत गेला.
          इकडे गोंदवल्यास, मुले घरातून गायब झाल्याचे लक्षात येताच,मुलांची शोधाशोध सुरु झाली. गीताबाई हवालदिल झाल्या.त्यांना अन्न गोड लागेना. लिंगोपंतांनी मुलांच्या शोधासाठी चारी दिशांना माणसे पाठवली. आठ-दहा दिवस झाले तरी मुलांचा पत्ता लागेना. बाराव्या दिवशी दामू अचानक घरी आला. त्याच्याकडून मुलांचा ठावठिकाणा, ख्यालीखुशाली समजली. रावजी लगेचच श्रीमहाराजांना आणण्यासाठी कोल्हापूरला निघाले.
          कोल्हापुरात श्रीमहाराज व वामन यांची चांगली व्यवस्था लागली खरी पण एक-दोन दिवसातच वामनही कंटाळला आणि श्रीमहाराजांना सांगून तो गोंदवल्यास जाण्यास निघाला. वाटेतच कोल्हापूरच्या वेशीवरच त्याला श्रीमहाराजांचे वडील रावजी भेटले. दोन-तीन दिवसांच्या शोधानंतर श्रीमहाराजांचा ठावठिकाणा सापडला.श्रीमहाराज कोल्हापूर येथील श्रीसिद्धेश्वर नावाच्या राजगुरूंच्या घरी होते. राजगुरुंची अनुज्ञा घेऊन रावजी श्रीमहाराजांसह गोंदवल्यास परतले. श्रीमहाराज दृष्टीला पडताच गीताबाईंचा जीव भांड्यात पडला. बाळगणूला  त्यांनी पोटाशी धरले.
          गोंदवलेस परत आल्यावर श्रीमहाराजांवर  सर्वांची नजर होती. पण श्रीमहाराज बेचैन, अस्वस्थ होते. श्रीमहाराज रामनामस्मरण आणि ध्यानात जास्तीत जास्त वेळ घालवत असत.मौनात राहणे पसंत करीत. बालवयात आलेली ही विरक्त वृत्ती वडीलमंडळींच्या लक्षात आली. ' श्रीमहाराजांचे लग्न केल्यास ते संसारात रमतील '  हा पंतांचा सल्ला रावजी-गीताबाईंना मान्य झाला. लग्नासाठी मुली सांगून येत होत्या. वधू संशोधन सुरु झाले.
          श्रीमहाराजांना दहावे वर्ष संपून अकरावे वर्ष लागले होते. खातवळ गावचे कुलकर्णी संभाजी मल्हार गोडसे  यांच्या मुलीशी श्रीमहाराजांचा विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. श्रीमहाराजांचा विवाह हा लिंगोपंतांच्या हातचे शेवटचे कार्य ठरले. पंतांची तब्बेत वयोमानामुळे क्षीण झालेली होती. आपला शेवट जवळ आला हे त्यांनी ओळखले. पंतांच्या पत्नी राधाबाई तापाचे निमित्त होऊन वारल्या आणि पुढे चार महिन्यानंतर पंतही स्वर्गवासी झाले.
          श्रीमहाराज, आपले आजोबा लिंगोपंत यांच्या छत्रछायेत वाढले.पंतांच्या वागण्याचा श्रीमहाराजांवर  प्रभाव होता. अन्नदान, लोकसंग्रह, सर्वांशी प्रेमाची,आपुलकीची वागणूक आणि भगवन्नामस्मरण, भजन हे संस्कार श्रीमहाराजांवर  सहजपणे झाले. या साऱ्या संस्कारांना पूर्वजन्मातील संस्कारांची जोड मिळाली असावी  आणि म्हणूनच भगवंताच्या अनुसंधानातच श्रीमहाराजांचे उत्तर आयुष्य घडत गेले.
          श्रीमहाराजांवर लग्नाचा अपेक्षित परिणाम झाला नाही. ते अधिकच विरक्त झाले. वडील रावजीही वैराग्य वृत्तीने जपतपात मग्न असल्याने श्रीमहाराजांना ध्यानधारणा करण्यास जणू   प्रोत्साहनच मिळाले.
ध्यानीमनी सद्गुरूंच्या शोधाची तळमळ लागलेली होती. एकेदिवशी आईला सूचना देऊन श्रीमहाराज एकटेच गुरुशोधार्थ पुन्हा बाहेर पडले. पूर्वसूचना असल्याने आईबापांनी शोधाशोध केली नाही. बारा वर्षांचे कोवळे वय आणि बरोबर संगीसाथी कोणी नाही असे असतानाही श्रीमहाराजांचा अध्यात्मिक कल ध्यानी घेऊन पंढरीनाथावर भार टाकून रावजी-गीताबाई स्वस्थ राहिले. 
प्रार्थना : 
गुरुराया, रामराया,  मारुतीराया, सद्गुरुराया मुखी अखंड रामनाम राहो, सद्गुरूंचे निरंतर स्मरण राहो, शेवटचा   श्वासही मुखी  रामनाम आणि सद्गुरूंच्या स्मरणात जावो ही श्रीमहाराजांच्या चरणी नम्र प्रार्थना.
|| श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सत्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय.||

|| जय जय रघुवीर समर्थ ||                        
    
 

   
        

Thursday, February 10, 2011

श्रीमहाराज ' नामावतार ' - 3


|| श्रीराम समर्थ ||
|| श्रीसद्गुरु  ब्रह्मचैतन्य महाराज समर्थ ||

                योगप्राप्तीसाठी साधना करणाऱ्या साधकाचा योगाभ्यास पूर्णत्वास जाण्यापूर्वीच त्याला मृत्यू आल्यास अथवा असा साधक योगभ्रष्ट झाल्यास त्याचे ( अंतकाळी ज्याचे मन परमात्मप्राप्तीच्या साधनेपासून विचलीत झाले आहे अशा मनुष्याचे )  काय होते ? तो कोणत्या गतीप्रत पोचतो ? अशी अर्जुनाची आशंका आहे.
 योगभ्रष्टाच्या संदर्भातील शंकेचे निरसन करताना भगवंत सांगतात :-
श्रीभगवानुवाच 
पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते |
                  न हि कल्याणकृत्कश्चीद्दुर्गतिं तात गच्छति ||गीता अ. ६/४० ||
' हे पृथानंदन ! त्याचा ( शुभ कार्यात युक्त असलेल्याचा ) विनाश या लोकी होत नाही ( आणि ) परलोकीही होत नाही, कारण हे वत्सा ( तात ) ! कल्याणकारी कर्म करणारा कोणताही मनुष्य दुर्गतीला जात नाही.'

          या श्लोकात भगवंतांनी सर्व साधकांना एक निश्चित आश्वासन दिले आहे की, जो कल्याणकारी काम करणारा आहे अर्थात कोणत्याही साधनाने का होईना, शुद्ध अंत:करणातून परमात्मप्राप्तीची इच्छा ठेवतो, अशा कोण्याही साधकाची दुर्गती होत नाही.
प्राप्य पुण्यकृतां लोकानुशित्वा शाश्वती: समा: |
 शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोsभिजायते || गीता अ. ६/४१ ||
          तो योगभ्रष्ट, पुण्य कर्म करणाऱ्यांच्या लोकांना प्राप्त होऊन ( आणि तेथे ) पुष्कळ वर्षांपर्यंत राहून ( मग येथे ) शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंत पुरुषांच्या घरी जन्म घेतो.
अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम |
                         एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीद्दृशम || गीता अ. ६/४२ ||
          अथवा ( वैराग्यवान योगभ्रष्ट ) ज्ञानवान योग्यांच्या कुळातच जन्म घेतो. अशा प्रकारचा जो हा जन्म आहे, ( तो ) नि:संशय फारच दुर्लभ आहे.
          श्रीमहाराजांचा जन्मही पुण्यवान परंपरा लाभलेल्या भगवत्प्रेमी परमपवित्र ब्राह्मणवंशी झाला. श्रीमहाराजांनी भगवन्नामस्मरणात उभे आयुष्य वेचले.केवळ मोक्षप्राप्ती हे आत्मकेंद्रित संकुचित ध्येय न ठेवता इतरांनाही त्यांचा उद्धार व्हावा यासाठी भगवन्नामाची दीक्षा दिली. असा जन्म केवळ दुर्लभच नव्हे तर अगम्य, अमोघ आहे.
          ' श्रीसद्गुरुलीलामृत ' ग्रंथात ग्रंथकाराने खालील श्लोक श्रीमहाराजांच्या पूर्वजन्मासंदर्भात नेमकेपणाने सांगितला आहे.
' पूर्वजन्मी हा साधू | असेल कोणी प्रसिद्धु |
वासनाशेषे जन्मसंबंधु |घडला असेल || अ.३/स.२/६३ ||
          आज श्रीमहाराजांच्या जन्मोत्सवाच्या मंगलदिनी श्रीमहाराजांच्या अमृतमयी अगाध चरित्राचे स्मरण आणि चिंतनास प्रारंभ होत आहे. 
 श्रीमहाराजांचा जन्म :-   
           श्रीमहाराजांचा जन्म माणगंगातिरी वसलेल्या सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडीपासून चार कोसांवर असलेल्या गोंदवले ( बु.) या गावी झाला. श्रीमहाराजांचा जन्म वसिष्ठ गोत्री शुक्ल यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण कुळात ' घुगरदरे ' कुटुंबात झाला. कुलकर्णीपणाची वृत्ती या कुटुंबाने जशी स्विकारली होती तशीच आजापणजापासून चालत आलेली पंढरीची वारी दर शुद्ध एकादशीला नित्यनेमाने घडत होती. पंढरीनाथ  हे या कुटुंबाचे कुलदैवत होते. 
          श्रीमहाराजांचे आजोबा लिंगोपंत भक्तिपंथाचे जसे वारकरी होते तसेच कुलकर्णी वृत्ती उत्तमपणे सांभाळणारे सात्विक कर्तबगार गृहस्थ होते. न्यायदानाचे खटले पंत मोठया कुशलतेने आणि नीतिन्यायाने करीत असत हे सरकारला कळल्यावर सरकारने त्यांना काही जमिनी इनाम दिल्या होत्या. गोंदवले परिसरात ते सर्व लोकांना प्रिय होते. लोक त्यांना आदराने ' लिंगोपंत इनामदार ' असे म्हणत असत.
          लिंगोपंतांच्या पत्नी राधाबाई एक सगुणखाणी, पतिव्रताशिरोमणी, गृह्काजदक्ष गृहिणी होत्या. त्यांचा प्रपंच एक आदर्श संसार होता.
          प्रात:समयी पांडुरंगाचे नामस्मरण आणि भगवद्गीतेच्या एका अध्यायाचे प्रतिदिनी पठण केल्यावरच लिंगोपंतांचा दिवस सुरु होत असे. दिवस मावळल्यावर हरिपाठ म्हणून झाल्यावर फराळानंतर पंत गावकऱ्यानसमवेत भजनात दंग होऊन जात. पंढरीनाथाचा गजर करताना देहभान विसरून ते नाचू लागत. दर शुद्ध एकादशीची पंढरीची वारी ते नेमाने करीत असत.
          वयपरत्वे थकल्याने पंतांना वारी करणे शक्य होईना याची त्यांच्या मनाला रुखरुख लागली. याच विचारात असताना एके रात्री पंढरीनाथ पंतांच्या स्वप्नात आले. आणि मळ्यातील एका जागेचा निर्देश केला. दुसऱ्या दिवशी मळ्यात त्या जागेवर खणल्यावर तेथे विठ्ठल-रखुमाईच्या सुंदर मूर्ती आढळल्या. घराजवळ योग्य जागा पाहून एका शुभ मुहूर्तावर पंतांनी देवाची प्रतिष्ठापना केली. 

           लिंगोपंत-राधाबाई या भगवतपरायण दांपत्याला शोभेल असा एक मुलगा त्यांना झाला. त्याचे नाव ' रावजी ' असे ठेवले.रावजींच्या वयाच्या बाराव्या वर्षी पंतांनी त्यांचे लग्न सातारा जिल्ह्यातील कलेढोण येथील नारायणराव वाघमारे इनामदार यांच्या मुलीशी लाऊन दिले. रावजींच्या पत्नीचे नाव गीताबाई असे ठेवले. कुलकर्णीपणाची विद्या-वृत्ती-व्यवहार पंतांनी रावजीना शिकविला, पण त्यांचे मन त्यात रमत नसे. रावजी एकांतात बसून देवाची पुजाअर्चा, नामस्मरण व ध्यानधारणेत आपला काळ व्यतीत करत असत. रावजी गंभीर, अबोल व एकांतप्रिय होते. प्रापंचिक बाबीत ते उदासीन होते. पंतांनी वाढविलेला प्रपंचाचा
व्याप,कुलकर्णीपणाची वृत्ती याकडे रावजींचे दुर्लक्ष झाले. परिणामी प्रापंचिक ऐश्वर्यास दृष्ट लागली. रावजी सरळ मनाचे, साधे, वैराग्यावृत्तीचे गृहस्थ होते. अंतर्यामी ते अती विरक्त व नेहमी एकांतात पंढरीनाथाच्या नामस्मरणात गुंतलेले असत. 
          रावजींच्या पत्नी सौ. गीताबाई यांचे वय लग्नात ७-८ वर्षांचे होते. पण लग्नानंतर ५-६ वर्षातच प्रपंचाची जबाबदारी त्यांचेवर पडली. आपल्या प्रेमळ आणि कष्टाळू वृत्तीने गीताबाईंनी सासुसासऱ्यांची मर्जी संपादन केली. पाहुणेमंडळींचा पाहुणचार, नोकरचाकरांवर लक्ष,गुराढोरांची काळजी या सर्व गोष्टी गीताबाई जातीने करत असत. रावजींचे प्रपंचात फारसे लक्ष नसल्यामुळे तसेच पंतांचे वय झालेले असल्याने आर्थिक व्यवहारही गीताबाईंना पाहावे लागत. सासू राधाबाईंप्रमाणे गीताबाई परोपकारी, उदार, अडल्या-नडलेल्यांना मदत करणाऱ्या, मदतीला धाऊन जाणाऱ्या होत्या. गावातल्या लोकांचीही त्यांच्यावर श्रद्धा होती. गीताबाईंच्या माहेरी रामाची उपासना होत असे.समर्थांवर त्या मंडळींची निष्ठा होती. गीताबाईही नित्य नेमाने रामनामाचा जप करीत. दासबोधाचे पारायण करीत. श्रीसमर्थ रामदास हे त्यांचे श्रद्धास्थान होते. त्यांच्यासाठी कोणी काही करण्याची इच्छा व्यक्त केली की, त्याचेकडून गीताबाई रामनामाचा जप करण्याचे आश्वासन घेत असत. गीताबाई कर्तव्यतत्पर, प्रेमळ, कष्टाळू, भगवतप्रेमी अशा सत्वशील होत्या. 
          रावजी प्रपंचात असूनही वैराग्य वृत्तीने स्नानसंध्या,गायत्रीजप आणि नामस्मरणात आपला काळ व्यतीत करत होते.तर सौ. गीताबाई प्रपंच नेटकेपणाने सांभाळत होत्या; पण त्याबरोबरच रामनामजप, दासबोधाचे वाचन, परोपकार यात व्यस्त होत्या. अशा अत्यंत शुद्ध सात्विक आचरण असणाऱ्या, परमार्थात विशेष रुची असणाऱ्या रावजी-गीताबाई या भगवतपरायण परमपवित्र दांपत्याच्या घरात श्रीमहाराजांचा जन्म झाला. 

          गोंदवलेपासून जवळच असणाऱ्या गावी संभाजी नावाचे एक सत्पुरुष होते.त्यांचे मौन व्रत असे. रावजी आणि गीताबाई त्यांच्या दर्शनाला गेले असता या सत्पुरुषाने प्रसादस्वरूप एक नारळ त्या दोघांना दिला आणि आशीर्वाद देत म्हणाले " परमात्मा तुमचे कल्याण करील, तुम्ही दोघे त्याचे नामस्मरण करा ! "
          काही काळ गेल्यानंतर गीताबाईंना दिवस गेले. त्यानंतर त्यांच्या वृत्तीमध्ये सहज लक्षात येईल असा बदल होत होता. डोहाळे लागले तेचमुळी अखंड नामजपात राहण्याचे. ' श्रीराम, श्रीराम ' असे म्हणतच दिवस पुढे सरकत होते, ' दासबोधाचे श्रवण करावे ' ही सुनबाईंची इच्छा पंतांनी म्हासुर्णेकरशास्त्रींच्या विठ्ठल मंदिरातील दासबोधाच्या परायण, प्रवचनाने पूर्ण केली. गीताबाई समर्थांच्या दर्शनालाही जाऊन आल्या. त्यांची वृत्ती नेहमी उल्हसित, आनंदी, प्रसन्न राहू लागली. चेहऱ्यावर एक आगळेच तेज प्रकटले. रामनामाचा अखंड जप आणि मारुतीरायांचे ध्यान यात गीताबाई सदैव रत असत. बाळंतपण गोंदवल्यासच करावयाचे ठरल्यावर गीताबाईंच्या वडिलांस व मातुश्रीस पाचारण केले. आठवा महिना सरताना एके दिवशी सायंकाळी एक तेजस्वी बैरागी पंतांच्याकडे रात्रीच्या मुक्कामास आला. गीताबाईंनी त्यांना  नमस्कार केला तेव्हा त्यांच्याकडे पाहून त्या साधूच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो उद्गारला " मेरे लाला ! तू यहा है ! तेरे दर्शनसे माई धन्य हुआ हुं ! "
          याच सुमारास रावजींच्या स्वप्नात पंढरीनाथ प्रकटले. आशीर्वाद दिला " तुम्हाला पुत्ररत्न होईल. तो महावैष्णव भगवद्भक्त, सिद्ध पुरुष असेल. त्याची दिगंत कीर्ती होईल." हा दृष्टांत रावजीनी पत्नीस निवेदन केला. उभयतांना खूप आनंद झाला. 
          गीताबाईंचे दिवस भरले. माघ महिन्यातील शुद्ध एकादशी आली. दर एकादशीला होते त्या प्रमाणे पांडुरंगाची षोडशोपचारे पुजा झाली. तीर्थ सर्वांना देण्यात आले. सर्वांचा फराळ झाला. गीताबाईंच्या सांगण्यावरून तिन्हीसांज टळल्यावर सुईण बोलावून आणली. बाहेर एकादशीचे भजन सुरु झाले. गीताबाईंनी तीर्थ घेतले. थोडा फलाहार केला अन अंथरुणाला अंग टेकले. बाहेर तालासुरात मंडळी भजनात दंग होती.भजनाचा गजर चालू होता. गीताबाईंचा रामनामाचा जप सुरु होता. उशापायथ्याशी सासुबाई आणि मातुश्री चिंतित होत्या. गीताबाई मोठया धीराच्या ! रामनामाचा जप करा असे इतरांना सांगत, प्रसुती वेदना सहन करत रामनाम घेत होत्या. पहाट केव्हा झाली याचे भान कोणालाच नव्हते. भजन संपून पांडुरंगाची आरती सुरु झाली.सूर्योदयाचा सुमार असेल.जन्म समय झाला.गीताबाई प्रसूत झाल्या. पूर्वपुण्ये सुपुत्र लाभला.श्रीमहाराजांचा जन्म झाला. सिद्ध पुरुष चैतन्यसूर्य भूतलावर अवतरताच सूर्यनारायणही लगबगीने आपल्या किरणस्पर्शाने श्रीमहाराजांचे दर्शन घेता झाला. मुलगा झाल्याची वार्ता बाहेर येताच भजनीमंडळीत आनंद पसरला. पंतांच्या आनंदाला पारावार उरला नाही. रावजींनाही स्वप्नातील दृष्टांत स्मरून सिद्धपुरुष घरी आल्याने; धन्यता वाटली. पांडुरंगावर फुले उधळण्यात आली. माघ शुद्ध द्वादशीला बुधवारी शके १७७६ या शुभदिनी शुभमुहूर्तावर श्रीमहाराजांचा जन्म झाला. 
          पंतांना नातू झाला, ही वार्ता गावभर पसरली. गावात घरोघरी साखर वाटण्यात आली. बाळाला पहायला गाव लोटला. पंतांनी ज्योतिषाकडून बाळाची कुंडली मांडली. वैदिक ब्राह्मणवृन्दाकडून वेदोक्त मंत्रांनी बाळासाठी आशीर्वाद घेतले. पंतांना जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटले. श्रीमहाराजांचा जन्म हा पंतांसाठी वृद्धापकाळात लाभलेला एक अपूर्व असा आनंदाचा परमोच्च क्षण होता.
          श्रीमहाराजांचे बारसे मोठया थाटात झाले.अपूर्व सोहळा झाला. आनंदाचा सुकाळ जाहला. वेदमुर्तींचा आदरसत्कार यथायोग्य दक्षिणा देऊन केला. खणानारळांनी सुवासिनींच्या ओटया भरल्या. सुपुत्र झाल्याची आनंदवार्ता सर्वांना कळवल्याने मोठा स्नेहसमुदाय जमला होता. बारशाचा मोठा समारंभ केला. बाळाला वाळे, बिंदल्या आदी भूषणे घालण्यात आली. सुवासिनी पाळण्याखालून बाळाला देताना ' कोणी गोविंद घ्याहो, कोणी गोपाळ घ्याहो ' म्हणत होत्या. सुंठवडा वाटला, घुगऱ्या, पेढे, साखर वाटण्यात आली. गणेश नामाचा गजर झाला. सर्व संमतीने बाळाचे नाव ' गणपती ' असे ठेवण्यात आले. बाळाला पाळण्यात ठेवण्यात आले. बाळ गणपतीच्या दर्शनाने उपस्थित सर्वांच्या चित्तात आनंद मावेना.
          श्रीमहाराज जन्मल्यापासूनच गुटगुटीत, गोंडस, गौरकाय होते. त्यांच्या गोरेपणात पिवळसर झांक होती. सुरेख नाक, तेज:पुंज डोळे, भव्य कपाळ, प्रसन्न मुद्रा आणि काळेकेसांचे जावळ अशा या सुबक, सुंदर मूर्तीचे वर्णन शब्दात कसे करावे बरे ? साक्षात रामरायाच बालरूपात प्रकट झाले होते. निर्गुणरूप, सगुणब्रह्म स्वरुपात अवतरले होते. धन्य ते माता-पिता ! धन्य ते गोंदवले ग्रामवासी !
प्रार्थना : 
गुरुराया, रामराया,  मारुतीराया, सद्गुरुराया मुखी अखंड रामनाम राहो, सद्गुरूंचे निरंतर स्मरण राहो, शेवटचा   श्वासही मुखी  रामनाम आणि सद्गुरूंच्या स्मरणात जावो ही श्रीमहाराजांच्या चरणी नम्र प्रार्थना.
|| श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सत्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय ||

|| जय जय रघुवीर समर्थ ||