Wednesday, March 30, 2011

श्रीमहाराज ' नामावतार ' - ७


|| श्रीराम समर्थ ||
   || श्रीसद्गुरु  ब्रह्मचैतन्य महाराज समर्थ ||


          भगवंत कर्मयोग आचरण्याचे महत्त्व विशद करीत आहेत -
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादय: |
                            लोकसंग्रहमेवापि  संपश्यन्कर्तुमर्हसि || गीता अ.३/२० ||
          ' जनकादि ज्ञानी पुरुषही ( आसक्तीरहित ) कर्मव्दारांच परमसिद्धीला प्राप्त झाले. यासाठी ( अर्जुना ) लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील कर्म करण्यासच योग्य आहेस.'
          लोकसंग्रह व्हावा यासाठी कर्मयोग आचरला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना सन्मार्गाला लावण्यासाठी ज्ञानी (आत्मज्ञानी ) पुरुषाने लोकसंग्रहार्थ कार्य केले पाहिजे, लोकाभिमुख व्हायला पाहिजे. याच संदर्भात ज्ञानेश्वरांनी खालील ओवीत हाच आशय येक सुंदर दाखला देऊन सांगितला आहे.
                                         मार्गी अंधासरिसा | पुढे देखणाही चाले जैसा |
अज्ञाना प्रकटावा धर्मू तैसा | आचरोनी || ज्ञा. अ. ३/१५६ ||
          ' रस्त्याने आंधळ्याच्या बरोबर पुढे चालणारा डोळस, आंधळ्यास सांभाळून घेऊन, त्याचे बरोबर चालतो, त्याप्रमाणे अज्ञानी मनुष्याला ज्ञान्याने आपण आचरण करून धर्म स्पष्ट करून दाखवावा. '
          तुकामाईंनी श्रीमहाराजांना ज्या गोष्टी करण्याचा उपदेश केला, त्या जास्तीत जास्त लोकांना सन्मार्गाला, परमार्थाला लावण्यासाठीच होत्या हे ध्यानात येईल. श्रीमहाराजांनी सद्गुरूंचा अनुग्रह होताच उभ्या आयुष्यात जे जे केले त्यातून केवळ लोकसंग्रहच झाला नाही तर साधकाला उत्तम दिशादर्शन झाले.
तीर्थाटन आणि स्वगृही आगमन 
          श्रीमहाराज नैमिष्यारण्यातून अयोध्येस आले. तेथे त्यांची रामशास्त्री नावाच्या वेदांती पंडिताशी गाठ पडली. शास्त्रीबुवा सगुण उपासनेला तुच्छ व व्यर्थ मानीत असत. ' रामनामाने भवरोग नाहीसा होतो तेव्हा देहाचा रोग तर खात्रीने बरा होईल. ' हे श्रीमहाराजांचे सांगणे शास्त्रीबुवांनी प्रत्यक्ष अनुभवल्यावर त्यांचा भ्रमनिरास झाला.शास्त्रीबुवांच्या पत्नीची तब्येत अचानक खूपच बिघडल्यावर नामस्मरणाने तिला आराम पडला हे ध्यानी येताच त्यांनी श्रीमहाराजांना दंडवत घातला. त्यांची मुले काशीस रहात होती म्हणून मोठ्या आग्रहाने त्यांनी श्रीमहाराजांना काशीस नेले.
          काशीमध्ये काही दिवस शास्त्रीबुवांच्या घरी राहिल्यावर श्रीमहाराजांनी आपला मुक्काम एका राममंदिरात हलविला. तेथे आईच्या सांगण्यावरून श्रीमहाराजांच्या दर्शनाला सहकुटूंब आलेल्या बंगालमधील निपुत्रिक जमीनदाराच्या पत्नीस रामनामाचा साडेतीन लाख जप करण्यास सांगून आशीर्वाद दिला.
          काशीमध्ये असताना एक चमत्कार घडला. एका तरुण दानशूर व्यापाऱ्याचे नवज्वराने अकाली निधन झाले. भारताच्या सर्व भागातून येणाऱ्या साधू, संत, बैरागी, यात्रेकरूना तो उदार आश्रय देत असे. त्याच्या अंत्ययात्रेसाठी मोठा जनसमुदाय लोटला. त्याची पत्नी सती जाण्यास सिद्ध झाली. श्रीमहाराज शास्त्रीबुवांच्या सांगण्यावरून तेथे आले. श्रीमहाराजांनी त्या पुण्यात्म्याच्या मुखात तीन वेळा ' श्रीराम ' म्हणून गंगाजल घातले तो काय आश्चर्य काही मिनीटातच तो व्यापारी झोपेतून जागा व्हावा तसे सावध होऊन उठून बसला. लोक श्रीमहाराजांचा जयजयकार करू लागले. त्यांच्या दर्शनासाठी एकच गर्दी उसळली हे पाहून श्रीमहाराजांनी एकदम गंगेत उडी मारली आणि ते नाहीसे झाले. 
          या  घटनेनंतर श्रीमहाराज काशीहून प्रयागला आले. तेथे काही बैरागी महंताच्या शोधात होते. त्यांनी श्रीमहाराजांना आपला महंत केले. त्या सर्व मंडळींबरोबर श्रीमहाराज मथुरा-वृंदावनला आले. येथे एक वर्षाचा काळ लोटला असेल. काशी येथे असताना ज्या बंगाली जमीनदाराला आशीर्वाद दिला होता त्याला मुलगा झाला. तो जमीनदार श्रीमहाराजांना भेटण्यासाठी उत्सुक होता. त्याने श्रीमहाराजांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी तीर्थक्षेत्री माणसे पाठविली. मथुरेत त्याच्या माणसांना श्रीमहाराज भेटताच त्यांनी जमीनदाराचे कलकत्त्याला येण्यासाठीचे आमंत्रण श्रीमहाराजांना सांगितले. त्या आमंत्रणाचा स्विकार करत श्रीमहाराज सर्व मंडळींसह कलकत्त्यात दाखल झाले. जमीनदाराने श्रीमहाराजांसाठी काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त करताच श्रीमहाराजांनी त्याला हरिहाट करण्यास सांगितले. हरिहाट म्हणजे भगवंत प्राप्तीच्या साधनांचा समारंभपूर्वक केलेला साप्ताह. या सात दिवसांच्या काळात सर्वांसाठी अन्नछत्रही असते. श्रीमहाराजांच्या आज्ञेनुसार जमीनदाराने हरिहाटाचा घाट घातला. यानिमित्त दानधर्म आणि अन्नदानही मोठ्या प्रमाणात झाले. श्रीमहाराजांना अग्रपूजेचा मान  देण्यात आला. त्यांची हत्तीवरून मिरवणूकही काढण्यात आली.
          हरिहाट संपल्यावर खूप लोक श्रीमहाराजांच्या दर्शनास येऊ लागले. श्रीमहाराजांना निजायाला किंवा बसायलाही फुरसत मिळेना. चार-सहा दिवस झाल्यावर जमीनदाराचा निरोप घेऊन श्रीमहाराज एक दिवस रात्री कोणालाही न सांगता कलकत्त्याहून निघाले. सातपुड्यात भ्रमंती करीत नर्मदेच्या काठाकाठाने प्रवास करीत इंदूरमध्ये आले. या काळात श्रीमहाराजांची विलक्षण अवस्था होती. बोलता बोलता, बघता बघता त्यांची समाधी लागत असे. एका डबक्याच्या चिखलामध्ये अशा समाधी अवस्थेत त्यांना एका गवळ्याने पहिले. त्या गवळ्याने श्रीमहाराजांना स्वच्छ पाण्याने धुवून एका मारुती मंदिरात उचलून नेऊन ठेवले.
          गावाबाहेर फिरायला गेलेल्या इंदूरमधील एका श्रीमंत इनामदारास मारुती मंदिरात श्रीमहाराज दिसले. तो कोणी सिद्धपुरुष आहे असे वाटून त्याने त्यांना साष्टांग नमस्कार घातला व आपल्या बागेत रहायला येण्याची विनंती केली. त्याचा भाव पाहून श्रीमहाराज त्याच्या बरोबर बागेमध्ये गेले.
          इनामदारांची पत्नी जिजीबाई मोठी विलक्षण बाई होती. नवऱ्याने बागेमध्ये आणलेल्या श्रीमहाराजांची परीक्षा घेण्याचे ठरविले. त्यांना लालभडक तिखटाचे लाडू खायला घातले. श्रीमहाराजांनी ते सगळे लाडू खाल्ले आणि ' आणखी दे ' असे म्हणताच जिजीबाई ओशाळली. दुसरे दिवशी जळते निखारे परातीत घातले व श्रीमहाराजांपुढे खाण्यासाठी ठेवले. ते निखारेही तितक्याच शांतपणे श्रीमहाराजांनी खाल्ले व ' आणखी दे ' असे म्हणताच जिजीबाईची बोबडी वळली. डोळ्यातून पश्चात्तापाने अश्रूधारा वाहू लागल्या. श्रीमहाराज हे सिद्धपुरुष असल्याची खात्री पटली. शरण येत तिने श्रीमहाराजांचे पाय धरले.श्रीमहाराजांनी तिला रामनाम दिले आणि नामस्मरण करण्यास सांगितले.
          इंदूरयेथील वास्तव्यात श्रीमहाराजांनी अनेकानेक लोकांना नामस्मरण करण्याचा उपदेश केला. इंदूरचे राजेही श्रीमहाराजांचे अनुग्रहीत झाले.श्रीमहाराजांचे नाव सर्वतोमुखी झाले. इनामदार, त्यांची पत्नी जिजीबाई, त्यांची मुलगी ताई, नेमाने श्रीमहाराजांना धारोष्ण दुध देणारा गवळी या साऱ्यांवर श्रीमहाराजांचा विशेष लोभ होता. काहीतरी निमित्त करून ' मला आता जायला हवे ' असे सांगून श्रीमहाराजांनी ' मी पुन्हा लवकरच येईन.' असे आश्वासन देऊन प्रेमाने सर्वांचा निरोप घेतला आणि लगेचच इंदूर सोडले.
          इंदूरहून मजल दरमजल करित वाटेत मोठी तीर्थे पहात श्रीमहाराज गोंदवल्यास आले. नदीकाठच्या मारुती मंदिरात त्यांनी मुक्काम ठोकला. त्यांच्या बरोबर चार बैरागी शिष्यही होते. श्रीमहाराजांची प्रसन्न मुद्रा, बैराग्याचा वेश, तेज:पुंज व मजबूत शरीर पाहून लोकांना ते महात्मा वाटले. गावातले सर्व लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. संध्याकाळचे वेळी गीताबाई व रावजी हेही दर्शनासाठी दर्शनासाठी आले. त्यांना दुरून येताना पाहताच श्रीमहाराजांनी मनोमन साष्टांग नमस्कार घातला. गीताबाई- रावजींनी बैरागी वेशातील श्रीमहाराजांना , आठ वर्षापूर्वी घरातून निघून गेलेल्या मुलाबद्दल  विचारणा केली. गोसाविबुवा म्हणाले ' असा मुलगा मी पहिला आहे. तो सध्या तीर्थयात्रा करित फिरत आहे. तो सुखरूप आहे. तुम्ही नामस्मरण करित रहा म्हणजे एका वर्षाने तो तुम्हाला नक्की भेटेल. ' दुसरे दिवशी भल्या पहाटे गावामधले कोणी उठण्याच्या आधीच श्रीमहाराज गोंदवल्यातून निघून गेले.
          गोंदवल्याहून श्रीमहाराज खातवळला आपल्या सासुरवाडीला गेले. तेथेसुद्धा लोक दर्शनाला येऊ लागले. श्रीमहाराजांच्या सासूबाई मुलीला घेऊन गोसाविबाबांच्या दर्शनाला आले. सासूबाईंनी विचारले ' माझ्या मुलीचा घरधनी केव्हा परत येईल ? ' गोसाविबुवा म्हणाले ' तुम्ही अखंड नामस्मरण करावे. मुलीचा घरधनी सुखरूप आहे. तो लवकरच परत येईल. 'त्या दोघींना दिलासा मिळाला.
          श्रीमहाराज खातवळहून निघून डाम्बेवाडीला गेले. तेथे त्यांची चुलतबहिण भीमाबाई दिलेली होती. तिचे दारी भिक्षेसाठी गेलेअसता तिने श्रीमहाराजांना ओळखले. 'गणू ' म्हणून हंबरडा फोडला आणि ती रडू लागली. तिचे सांत्वन करून, ' तीर्थयात्रा संपवून मी लवकरच येईन ' असे सांगून मागे वळून न पाहता जसे आले तसेच पाहता पाहता निघून गेले.
          श्रीमहाराज तेथून श्री समर्थांच्या दर्शनास सज्जनगडावर गेले. नंतर तेथून रामेश्वरला जाण्यासाठी निघाले. वाटेत तिरुपतीला बालाजीचे दर्शन घेतले. प्रवासात एका मरणासन्न भिकाऱ्याची रामेश्वर दर्शनाची प्रबळ इच्छा पाहून शिष्यांच्या मदतीने त्याला उचलून बरोबर नेले. त्याला देवाच्या पायावर घातले. तेथेच त्याने प्राण सोडला.
          रामेश्वरहून श्रीमहाराज वरदराजाच्या दर्शनासाठी कांचीला गेले. तेथे एका चांदीच्या व्यापाऱ्याची भेट झाली. त्याला मुलबाळ नव्हते. ते नवरा-बायको श्रीवरदराजाचे उपासक होते. व्यापाऱ्याची पत्नी महासाध्वी होती. नेहमी साधनेत मग्न असे. श्रीमहाराजांना भेटल्यावर तिला मुलगा भेटल्याचा आनंद झाला. श्रीमहाराजांना पहिले की, तिच्या अंत:करणात मातृप्रेमाचा उमाळा येई आणि तिच्या स्तनातून दुध वाहू लागे. तीन दिवसानंतर मोठ्या जड अंत:करणाने श्रीमहाराजांनी त्यांचा निरोप घेतला.
स्वगृही आगमन - 
           श्रीमहाराज नंतर येहळेगावला जाऊन तुकामाईंचे दर्शन घेऊन बरोबर एक वर्षाने पुन्हा गोंदवल्यास परत आले. ' जय जय रघुवीर समर्थ ' असे म्हणत आपल्या घरासमोर आले.आईने प्रथम त्यांना ओळखले नाही. पण दोघांची दृष्टादृष्ट होताच श्रीमहाराज आईकडे पाहून हसले, त्याबरोबर तिने एकदम त्यांना ओळखले आणि कडकडून मिठी मारली. डोळ्यातून आनंदाश्रूंचा पूर वहात होता. श्रीमहाराजांचेही डोळे पाणावले. इतक्यात रावजी तेथे आले. श्रीमहाराजांनी वडिलांना साष्टांग नमस्कार घातला. घरातील सर्व मंडळी जमा झाली. जिकडे तिकडे आनंदाचे वातावरण पसरले. बरोबर नऊ वर्षांनी श्रीमहाराज घरी परत आले होते. बालपणीचे मित्र भेटावयास येत होते.
          श्रीमहाराजांचा वेश अजून तसाच म्हणजे कौपीन, विभूती, जटा, दाढी, हातात माळ व कुबडी आणि पायी  खडावा असा होतो. ' पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे. ' अशी वार्ता सर्वत्र पसरली आणि आजूबाजूच्या गावातील शेकडो लोक श्रीमहाराजांच्या दर्शनास येऊ लागले. नामस्मरणाचे महत्त्व सांगून रामनामाचा जप करण्याचा उपदेश श्रीमहाराज सर्वांना करीत असत.
          गृहस्थाश्रम विधीसाठी श्रीमहाराजांनी जटाभार उतरविला. यानिमित्त विपुल अन्नदान श्रीमहाराजांच्या घरी झाले. श्रीमहाराज पत्नीस आणण्यासाठी सासऱ्यांच्या बरोबर खातावळला गेले. चार दिवस राहून श्रीमहाराज पत्नीस घेऊन गोंदवल्यास परत आले. 
          श्रीमहाराजांची पत्नी सरस्वती मोठी सुलक्षणी, नकाडोळ्यांनी सुरेख आणि चतुर स्त्री होती. श्रीमहाराजांच्या सारखा पती आपल्याला मोठ्या भाग्याने मिळाला याबद्दल तिला धन्यता वाटे. भगवदभजन, नामस्मरण व अन्नदान या तीन गोष्टींनी आपल्या घराला मंदिराची शोभा यावी हा जो श्रीमहाराजांचा हेतू तो आपल्याकडून पार पडावा हि तिची मनापासून इच्छा असे. श्रीमहाराजांचेही तिच्यावर अत्यंत प्रेम होते. श्रीमहाराजांच्या आई, गीताबाईंना श्रीमहाराजांचा प्रपंच पाहून खूप समाधान वाटत असे. श्रीमहाराजांनी घराची कुलकर्णीपणाची वृत्ती सांभाळण्याचे आश्वासन आईला देताच तिला फार आनंद झाला.
          रावजींकडून सर्व दप्तर श्रीमहाराजांनी स्वत:कडे घेतले. त्याकाळी कुलकर्णीपणाला गावाच्या दृष्टीने फार महत्त्व असे. कुलकर्णीपणाची सर्व कामे श्रीमहाराज अप्रतिमपणे करू लागले.
         दप्तर सांभाळण्यास लागून जेमतेम चार महिने झाले असतील तोच एके दिवशी आईला ' आपण या कामाला कंटाळलो ' असे सांगून बदली दुसरा मनुष्य देऊन कुलकर्णीपणाच्या व्यापातून आपण मोकळे झाले. श्रीमहाराजांचे वय या सुमारास २८-२९ च्या आसपास होते. ते गोंदवल्यास सतत रहात नसत. गोंदवले भोवतालच्या लहान मोठ्या गावाला या ना त्या निमित्ताने जात असत. तेथील लोकांना भगवंताच्या नामाकडे वळवण्याच्या प्रयत्नात ते असत. या सुमारास भाऊसाहेब केतकरांचा परिचय झाला. भाऊसाहेब केतकर सरकारी नोकरीत होते. प्रथम भेटीतच श्रीमहाराजांनी त्यांना आपलेसे केले.
          श्रीमहाराज पत्नीसह पुन्हा गुरुभेटीला निघाले. ते येहळेगावला पोचले त्यावेळी श्रीतुकामाई घरीच होते. उभयतांनी श्रीतुकामाईना वाकून नमस्कार केला. त्या दोघांना पाहून श्रीतुकामाईंना खूप आनंद झाला. त्यांनी त्या दोघांना आठ दिवस ठेऊन घेतले. निघायचे वेळी सरस्वती पाया पडायला आली त्यावेळी श्रीतुकामाईंनी तिला सहज विचारले, ' माय, तुला काय पाहिजे ? ' ती म्हणाली ' यांच्यासारखा मला मुलगा व्हावा एवढीच माझी इच्छा आहे.' हे तिचे मागणे ऐकून गुरु व शिष्य दोघेही हसले.पण श्रीतुकामाई ' तथास्तु ' असे बोलले. आणि निरोप दिला. श्रीमहाराजांना स्वत:साठी काही मागणे तेही एका अशाश्वत गोष्टीचे मागणे हे मुळीच रुचले नाही. 'त्यांच्या कृपेने मुलगा होईल पण तो अल्पायुषी होईल ! ' असे त्यांनी पत्नीस सांगताच तिला आपली चूक उमगली. तिला पश्चात्ताप  झाला हे पाहून तिला योगदीक्षा देण्याचे ठरवले आणि तिला घेऊन नाशिकला गेले.
          नाशिकला आल्यावर श्रीमहाराजांनी पत्नीस जोगीण बनविली. तिला योगदीक्षा दिली. त्यांनी तिला सिद्धासन घालण्यास शिकविले. तिला काही योगमुद्रा सांगितल्या. श्वासाबरोबर नाम घ्यायला शिकविले. मानसपूजा शिकवून तिची धारणा दृढ केली. सहा महिन्यात भगवंताचे ध्यान लावता येण्यापर्यंत तिची तयारी झाली. नाशिकमधील हा काळ दोघांनी फार आनंदात, नामस्मरणात घालविला. सरस्वतीची वृत्ती नामस्मरणात तल्लीन होऊ लागली हे पाहिल्यावर तिची समजूत घालून तिला घरी परत पाठविले व स्वत: श्रीमहाराज उत्तरेकडे निघून गेले.
          श्रीमहाराजांची पत्नी गोंदवल्यास परत आल्यावर आपला ध्यानधारणेचा अभ्यास तिने पूर्ववत चालू ठेवला. नामस्मरण तर सारखे चालू असे. आपल्या मानसपूजेमध्ये ती श्रीमहाराजांची पूजा करित असे.
          इकडे श्रीमहाराज नाशिकहून इंदूर, काशी , अयोध्या असा प्रवास करत नैमिष्यारण्यात गेले. तेथे काही काळ ध्यानधारणा करून जवळपास दहा महिन्यांनी गोंदवल्यास परत आले.  
          सन १८७६-७७ साली फार मोठा दुष्काळ पडला होता. सरकारचे प्रयत्न अपुरे पडत होते. श्रीमहाराज या काळात गोंदवल्यास होते.श्रीमहाराजांनी आपल्या शेतात दुष्काळी कामे सुरु केली. काम करणाऱ्याला रोज एक भाकरी आणि वाडगाभर आमटी मिळायची. श्रीमहाराजांनी आपली धान्याची कोठारे उघडी केली.रोज दीडहजार माणसे अन्न घेऊन जात. भुकेने व्याकूळ झालेले जीव पाहून श्रीमहाराजांना खूप दु:ख होत असे.
          भारतवर्षात इंग्रजांच्या विरुद्ध क्रांतीचा प्रयत्न करणाऱ्या पुरुषांमध्ये वासूदेव बळवंत फडके यांचे नाव अग्रगण्य आहे. दुष्काळात गरिबांच्यासाठी सर्वस्व त्याग करण्यास सिद्ध झालेल्या श्रीमहाराजांना बघून वासूदेव बळवंताना फार आनंद झाला. क्रांतीला मदत व आशीर्वाद घेण्यासाठी श्रीमहाराजांना भेटण्यासाठी वासूदेव बळवंत गोंदवल्यास आले. श्रीमहाराजांनी काळ अनुकूल नसल्याने त्यांना बंडापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची समजूत न पटल्याने ते तडक पुण्याला निघून गेले.
          याच सुमारास सरस्वतीला दिवस राहिले. नऊ महिने पूर्ण होऊन ती बाळंत होऊन तिला मुलगा झाला. तो  हुबेहूब श्रीमहाराजांसारखा दिसे. मुलगा अल्पायुषी ठरला. एक वर्षाच्या आतच मुलगा मरण पावला.नंतर थोड्याच दिवसांनी सरस्वतीला ताप येऊ लागला. तापाचा जोर विशेष नव्हता पण तो हटत नव्हता. तिचा अन्तकाल समीप आल्याचे श्रीमहाराजांनी ओळखले व तिला त्याची कल्पना दिली. नामस्मरण करता करता तिने सिद्धासनात रामनाम घेत शांतपणे प्राण सोडला. 
          सरस्वती वारल्यावर श्रीमहाराज प्रवासाला निघून गेले. जिजीबाई फार आजारी आहे असे समजल्यावरून ते इंदूरला गेले. याच सुमारास रावजींचे देहावसान झाले. वडिलांच्या दहाव्यासाठी श्रीमहाराज अचानक गोंदवल्यास आले. ज्येष्ठ पुत्र या नात्याने श्रीमहाराजांनी उत्तरक्रिया विधी केले.
          तीन-चार महिने झाल्यावर त्या काळच्या रिवाजाप्रमाणे श्रीमहाराजांना मुली सांगून येऊ लागल्या. या वेळी श्रीमहाराजांचे वय ३०-३२ असावे. आईच्या आग्रहाखातर श्रीमहाराजांनी पुन्हा लग्न करण्याचे मान्य केले. गोंदवल्यापासून काही दूर अंतरावर असलेल्या आटपाडी गावच्या सखाराम देशपांडे यांच्या जन्मांध मुलीशी श्रीमहाराजांनी दुसरा विवाह केला. दुसऱ्या पत्नीचे नावही सरस्वती असे ठेवले. लग्न झाल्यावर श्रीमहाराज चार-सहा महिने गोंदवल्यास राहिले. याच काळात श्रीमहाराजांच्या धाकट्या भावाचे निधन झाले. पाठोपाठ काही दिवसातच श्रीमहाराजांची धाकटी बहिण मुक्ताबाई वारली. अशा रीतीने थोड्या काळामध्ये घरातील चार माणसे मृत्युमुखी पडली. गीताबाईंना अतोनात दु:ख झाले.
          श्रीमहाराजांच्या वडिलोपार्जित पुष्कळ जमिनी होत्या. भाऊबंदानी जमिनी संबंधात तंटे उपस्थित केले. भांडणे उकरून काढली. श्रीमहाराजांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.या साऱ्याचा श्रीमहाराजांवर काहीही परिणाम झाला नाही.
          पंढरपूरच्या भडगावकर वैद्यांकडे श्रीमहाराजांचे जाणेयेणे विशेषत्वे असे. भडगावकर मंडळींच्यापैकी अप्पासाहेब यांनी तर श्रीमहाराजांना सर्वस्व अर्पण केले. 
         अलिबागच्या सदूभाऊ लेलेंचीही श्रीमहाराजांच्यावर आत्यंतिक श्रद्धा होती. सदूभाऊंनी श्रीमहाराज त्यांचे घरी मुक्कामास असताना त्यांना सोन्याच्या पत्र्याने मढवलेला एक तुंबा भेट दिला. श्रीमहाराजांनी तो हातात घेतला आणि त्यांच्या समोरच आपटून फोडून टाकला व तडक तेथून निघून गेले.
          अलिबागहून श्रीमहाराज उत्तरेकडे जाण्यास निघाले. वाटेमध्ये अबूच्या जंगलातून जात असता भिल्ल लोकांच्या टोळीने त्यांना घेरले. त्यांची प्रसन्न आणि तेजस्वी मुद्रा आणि धीरगंभीर वृत्ती पाहून त्यांना शरण गेले. श्रीमहाराजांनी त्या सर्वांना अनुग्रह दिला. नामस्मरणाची दीक्षा दिली.चोऱ्या करण्यापासून परावृत्त केले.
          नर्मदेच्या किनाऱ्याने पुढे जात असता महेश्वर नावाच्या गावी दोन मांत्रिकांची गाठ पडली. श्रीमहाराजांना  काहीतरी मंत्रसिद्धी अवगत आहे असा त्यांचा समज झाला. श्रीमहाराजांनी मंत्रसिद्धी त्या दोघांना शिकवावी अशी गळ घातली.श्रीमहाराजांनी त्यांना आपल्याजवळ रामनामाखेरीज कसलाही  मंत्रतंत्र अवगत नसल्याचे सांगूनही त्या दोघांची समजूत पटली नाही. त्यांनी श्रीमहाराजांना नागपाश बंधनात टाकले. त्यातून मुक्त करावे यासाठी श्रीमहाराजांनी त्यांची  समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. अखेरीस श्रीमहाराजांनी डोंगराच्या कड्यावरून खाली उडी घेताच नाग छिन्नविच्छिन्न होऊन मरून पडले, आणि श्रीमहाराज मोकळे झाले. त्या दोघा मांत्रिकांना पश्चात्ताप झाला. ते शरण येऊन श्रीमहाराजांच्या पाया पडले. श्रीमहाराजांनी त्यांना क्षमा केली व रामनामाची दीक्षा दिली. मंत्रतंत्राच्या आहारी न जाण्याचा उपदेश केला. त्यांच्यापैकी एक तेथेच थांबला तर दुसरा, ज्याचे नाव सच्चिदानंद होते, तो श्रीमहाराजांच्या बरोबर पुढील प्रवासास निघाला.
          श्रीमहाराज उज्जैनला आले. पूर्व परिचित सर्व मंडळी जमा झाली. छान सत्संग घडला. नामस्मरण, भजन, कीर्तन, वेदांतश्रवण व अन्नदान यांचा धडाका सुरु झाला. याच मुक्कामात एका मोठ्या सरकारी अधिकाऱ्याने श्रीमहाराजांना जेवणाचे निमंत्रण दिले. हेतू श्रीमहाराजांची परीक्षा घेण्याचा होता. घडले असे कि त्याच सुमारास त्यांचा मुलगा विषमाने आजारी पडला. श्रीमहाराज जेवायला आले त्या दिवशीच त्या मुलाचे प्राणोत्क्रमण झाले. रावसाहेबांच्या पत्नीने भर पंक्तीत त्याचे प्रेत आणलेले पाहून सर्वच चक्रावले. श्रीमहाराज शांत होते. त्यांनी मुलाला आपल्या मांडीवर घेतले. मुलाच्या आईला मुलास मात्रा चाटविण्याची आज्ञा केली. श्रीमहाराजांनी मुलास हाक मारण्यास सुरुवात केली. तिसरी हाक ऐकताच मुलाने डोळे उघडले आणि थोडी हालचाल केली. सर्वजण अचंबित झाले. रावसाहेबांनी श्रीमहाराजांच्या पायावर लोळण घेतली. त्यानाही रामनाम दिले. श्रीमहाराज सांगत, रावसाहेब पुढे फार योग्यतेला पोचले.
          श्रीमहाराज उज्जैनमध्ये आहेत हे कळताच जिजीबाई तेथे आली. मोठ्या हट्टाने आणि आग्रहाने त्यांना इंदूरला घेऊन गेली. तेथे पूर्वीचा गवळी त्यांना भेटला. त्याचा अंतकाळ श्रीमहाराजांनी साधला. श्रीमहाराजांच्या मांडीवरच त्याने प्राण सोडला.
          जिजीबाईची मुलगी ताई मुळातच अशक्त होती. लग्नानंतरही ती फारशी सुधारली नाही. त्यात तिला दिवस गेले. डॉक्टरांनी रक्तक्षयाचा संशय व्यक्त केला. श्रीमहाराजांवर अपार श्रद्धा, अखंड नामस्मरण आणि श्रीमहाराजांच्या कृपेने ती सुखरूप बाळंत झाली.
          जिजीबाईच्या भावाच्या ओळखीने एक प्रोफेसर श्रीमहाराजांच्याकडे येऊ लागला. तो बुद्धिमान असला तरी अश्रद्ध होता, परंतु तितकाच प्रामाणिक होता.सुरुवाती सुरुवातीला तो श्रीमहाराजांशी वाद घालत असे. पण श्रीमहाराजांना जवळून समजून घेतल्यावर त्याचा भ्रम दूर झाला. त्यालाही श्रीमहाराजांनी रामनामाची दीक्षा दिली. ' श्रीरामरायाशी त्याचे संभाषण होत असे इतकी त्याची तयारी झाली.' असे श्रीमहाराजांनी स्वत:च एकदा सांगितले. 
          जिजीबाईंच्या कुटुंबाशी घनिष्ठ संबंध असलेले मोडक नावाचे श्रीमंत गृहस्थही श्रीमहाराजांचे अनुग्रहीत होते. त्यांचा मुलगा हरी ज्याला सर्वजण भैय्यासाहेब म्हणत असत. त्याचे श्रीमहाराजांवर विलक्षण प्रेम होते. तो चोवीसतास श्रीमहाराजांच्या बरोबर राहू लागला. भय्यासाहेब मोडकांच्या ओळखीने त्यावेळचे इंदूरचे दिवाण रावसाहेब पळशीकर यांचे श्रीमहाराजांकडे येणेजाणे सुरु झाले. त्यांच्या सांगण्यावरून इंदूरचे राजे तुकोजीराव होळकरही श्रीमहाराजांना भेटले. त्यांच्यावरही श्रीमहाराजांची कृपा झाली. त्यानाही श्रीमहाराजांनी नामस्मरणात राहण्याचा उपदेश केला.
          इंदूरच्या याच मुक्कामात श्रीआनंदसागर व श्रीब्रह्मानंद या दोघांची श्रीमहाराजांशी गाठ पडली. हा मुक्काम जरा जास्तच लांबला. श्रीमहाराज जेथे रहात तेथे भजन, नामस्मरण आणि अन्नदान धडाक्याने सुरु होई. अनेक प्रकारचे, अनेक प्रांतीचे लोक श्रीमहाराजांकडे येऊन समाधान पावत व परत जाताना 'नाम ' घेऊन जात.
          श्रीमहाराजांनी इंदूरहून आपल्या गुरूंच्या दर्शनासाठी येहळेगावला जायचा विचार बोलून दाखवताच जिजीबाई आणि भय्यासाहेब मोडक यांनी सद्गुरूंच्या भेटीसाठी बरोबर घेऊन जाण्याची विनंती केली. श्रीमहाराजांनी दोघानाही बरोबर घेतले आणि सर्व मंडळींनी इंदूर सोडले. जवळ जवळ एक महिन्याने ते येहळेगावला पोहोचले. श्रीतुकामाईंना पाहिल्यावर श्रीमहाराज, जिजीबाई व भय्यासाहेब मोडक या सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. श्रीतुकामाईंचे आशीर्वाद घेऊन श्रीमहाराज सर्व मंडळींसह गोंदवल्यास आले.

|| जय जय रघुवीर समर्थ ||          
                   
  
                                                

    

Monday, March 21, 2011

श्रीमहाराज ' नामावतार ' - ६


|| श्रीराम समर्थ ||
   || श्रीसद्गुरु  ब्रह्मचैतन्य महाराज समर्थ ||
          
          भगवंत अर्जुनाला आत्मज्ञान कसे प्राप्त करावे हे सांगत आहेत-
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया |
                   उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन: || गीता अ. ४/३४ ||
          ' सद्गुरुना साष्टांग नमस्कार करून त्यांची सेवा सुश्रूषा करून, निष्कपट भावाने (सरळतेने ) प्रश्न विचारून ते ज्ञान ( आत्मज्ञान-स्वरूपज्ञान-परमेश्वर स्वरूपाचे ज्ञान ) समजून घे. ते तत्त्व ( परमात्मतत्त्व ) जाणणारे ज्ञानी महापुरुष तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील.'
          श्रीमहाराज गुरुशोधार्थ वयाच्या बाराव्या वर्षी घरातून बाहेर पडले. दोन-अडीच वर्षे भ्रमंती चालू होती. अनेक अधिकारी संत-साधू-सत्पुरुष-महात्म्यांचे दर्शन झाले, त्यांची सेवा घडली. त्यांच्याकडे असलेले ज्ञान, योगविद्या, मंत्र-तंत्र त्यांनी श्रीमहाराजांना मोठ्या आनंदाने दिले पण ' तुझा गुरु होण्याचा अधिकार आम्हाला नाही. तुला लवकरच गुरु भेटतील ' असे सांगून पुढे पाठवले. आणि अचानक एके दिवशी श्रीसमर्थांच्या परंपरेतील सत्पुरुष श्रीरामकृष्ण प्रकट झाले आणि त्यांनी श्रीमहाराजांना नाथपरंपरेतील विठ्ठलोपासक श्रीतुकारामचैतन्यांकडे जायला सांगितले.
सद्गुरू श्रीतुकारामचैतन्य भेट :-
          श्रीमहाराज पैठण, औरंगाबाद, जालना, नांदेड असा प्रवास करत येहळेगावला पोहचले. तुकामाईंची चौकशी करणारा तो पंधरावर्षांचा बालब्रह्मचारी पाहून लोकांना कुतूहल आणि आश्चर्य वाटले. लोकांनी तुकामाईंच्या विषयी जी माहिती सांगितली त्यावरून श्रीमहाराजांनी मनोमनी जाणले की, तुकामाई हे अध्यात्मातील एका उच्चतम अवस्थेला पोचलेले सत्पुरुष आहेत. डोक्याला टोपडं, हातात बांगड्या, मुलांबरोबर किंवा कुत्र्याच्या पिलांबरोबर खेळणारे, अंगात धड वस्त्र नाही, शरीर चिखलाने माखलेले,आडरानात, शेतात, ओढ्याच्या काठी फिरणारे, हातात चिलीम असे बाह्यांगी वेड्याप्रमाणे वाटणारे आणि तुसडेपणाने वागून शिव्या देणारे असे हे ध्यान शोधावे तरी कोठे ? '  वेडा तुक्या  ' म्हणून जरी त्यांची ओळख असली तरी लोक त्यांच्याविषयी आदरयुक्त प्रेमभावाने बोलत होते, हे श्रीमहाराजांनी तत्काळ ओळखले. सबंधगाव, आडरान, ओढाकाठ, भोवतालची शेते अशा सर्व ठिकाणी शोधशोध शोधले परंतु तुकामाईंचा काही पत्ता लागेना. श्रीमहाराज दमून भागून तुकामाईंच्या घराच्या भिंतीला टेकून बसले तोच अचानक त्यांच्या दिशेने आरडाओरडा करीत तुकामाईंची स्वारी येताना दिसली. कमरेला लंगोटी, डोक्याला टोपडे, एका हातात चिलीम तर दुसऱ्या हातात ऊसाचे दांडके घेऊन श्रीमहाराजांना मारायला धावले. मारण्यासाठी उगारलेला हात दोघांची दृष्टादृष्ट होताच खाली झाला. खूण पटली. श्रीमहाराजांनी तुकामाईना साष्टांग नमस्कार घातला. तुकामाईंनी श्रीमहाराजांना उचलून पोटाशी धरले. दोघांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. तुकामाईंनी श्रीमहाराजांना हाताला धरून घरात नेले.
          तुकामाईना पाहताच श्रीमहाराजांना विलक्षण समाधान वाटले. सद्गुरू भेटल्याचा परमानंद झाला. तुकामाईंची ब्रह्मनिष्टा, प्रेमळपणा, निस्पुहता आणि दीनवत्सलता पाहून श्रीमहाराज भरून पावले. शरणागत भावाने त्यांनी जवळपास नऊ महिने तुकामाईंची सेवा-सुश्रुषा केली. तो काळ श्रीमहाराजांच्या सहनशीलतेची कसोटी पाहणारा होता. तुकामाईंची सावली बनून ते वावरले. ओढ्याकाठी, रानावनात, वेळी अवेळी, उन्हां पावसात तुकामाईंच्या लहरीनुसार त्यांची पाठराखण केली. कधी कधी मार खाल्ला, स्तुती-निंदा ऐकावी लागली तर कधी तुकामाईंची वत्सलता अनुभवली. मात्र त्यांच्या सेवेतच धन्यता मानली. 
          एकदा तुकामाईंनी श्रीमहाराजांना वडाच्या झाडाची सर्व पाने तोडावयास सांगितली आणि नंतर जेथल्या तेथे लावून टाक म्हणून आज्ञा केली. एकदा तर ऊसाची भलीथोरली मोळी श्रीमहाराजांच्या डोक्यावर देऊन आपल्या मागे येण्यास सांगितले. तुकामाई इकडे तिकडे पळत सुटले. श्रीमहाराज डोक्यावर ऊसाची मोळी घेऊन  त्यांच्या मागे पळत होते. नंतर तुकामाईंनी ते ऊस इतस्तत: फेकून दिले. मुलांना वाटून टाकले. एकदा श्रीमहाराजांना डोहात उडी घेण्यास सांगितले. वर येण्याची आज्ञा न दिल्याने श्रीमहाराज पाण्यातच राहिले. तुकामाईंनी ' बाळ बुडाला ' असा आरडाओरडा केला. लोक जमले. दोनतीन तासांनी पाण्यातून बाहेर येण्याची आज्ञा होताच श्रीमहाराज पाण्यातून उसळी मारून वर आले. एकदा श्रीमहाराजांना मोठा खड्डा खणण्यास सांगितले. जवळच खेळणाऱ्या तीन मुलांना धरून खड्ड्यात टाकले आणि त्यावर माती ढकलली आणि श्रीमहाराजांना त्या मातीच्या ढिगाऱ्यावर सिद्धासन घालून मौनात बसावयास सांगितले. काही वेळाने पोरांचे आईबाप मुलांना शोधत तेथे आले. श्रीमहाराजांनीच मुलांना मातीत पुरले असे तुकामाईंनी सांगताच लोकांनी श्रीमहाराजांना यथेच्छ बडवले, अक्षरश: तुडवले. माती बाजूला करताच मुले मृतवत अवस्थेत होती.लोकांनी शिव्यांचा भडीमार आणि लाथाबुक्क्यांनी श्रीमहाराजांना मारण्यास सुरवात  केली. श्रीमहाराजांनी मौन सोडले नाही. तुकामाई प्रसन्न झाले.मुलांवर त्यांनी नजर फिरवताच ती हालचाल करु लागली. ' त्या बिचाऱ्याला उगाच का मारता, मुले तर जिवंत आहेत. ' असे सांगत तुकामाई मध्ये पडले. लोक ओशाळले. लोकांनी श्रीमहाराजांची क्षमा मागितली. अशा अनेक दिव्व्यातून श्रीमहाराजांना जाव लागल. अपार श्रद्धा आणि निष्ठेने सेवा करतच  राहिले. तुकामाईंच्या कसोटीला श्रीमहाराज पूर्णपणे उतरले. त्या नऊ महिन्यांच्या काळात श्रीमहाराजांना तुकामाईखेरीज कशाचीही, कोणाचीही आठवण आली नाही. गुरूंच्या अखंड सेवेमध्ये ते स्वत:चे भान विसरले. त्यांच्या मनाचे व्यापार स्तब्ध झाले. भूक, तहान, झोप वगैरे देहधर्म सुटले. एकाअर्थी श्रीमहाराज देहाभिमानशून्य झाले. त्यांचे अंत:करण पूर्ण निर्वासन झाले. त्यांच्या चेहऱ्यावर खऱ्या चित्तशुद्धीचे तेज विलसत होते.
श्रीगुरुकृपा :-
          भगवंत पुढील श्लोकात ज्ञानप्राप्तीच्या पात्राचे निरुपण करतात -
श्रद्धावांल्लभते ज्ञानं तत्पर: संयतेन्द्रिय: |
                 ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ||गीता अ. ४/३९ ||
          ' जो,  जितेंद्रिय तसेच साधन-पारायण आहे असा श्रद्धावान मनुष्य ज्ञानाला प्राप्त होतो आणि ज्ञानाला प्राप्त होऊन तो तत्काळ परम शांतीला प्राप्त होतो.'
          परमात्म्यामध्ये, महापुरुषांमध्ये, धर्मामध्ये आणि शास्त्रामध्ये प्रत्यक्षाप्रमाणे आदरपूर्वक विश्वास असणे ह्याला श्रद्धा म्हणतात. श्रीमहाराजांची सद्गुरूंवर, रामनामावर अपार श्रद्धा होती. 
          एके दिवशी भर दुपारी तुकामाई श्रीमहाराजांना बरोबर घेऊन शेतावरच्या विहिरीवर आले त्या दिवशी रामनवमी होती. दोघांनी स्नान केले. एका अशोकवृक्षाखाली तुकामाईंनी श्रीमहाराजांना अनुग्रह दिला. श्रीमहाराजांच्या डोक्यावर हात ठेवताच श्रीमहाराजांना तत्काळ समाधी लागली. जीवन धन्य झाले. जेव्हा श्रीमहाराज समाधीअवस्थेतून बाहेर आले तेव्हा तुकामाईंनी त्यांचे ' ब्रह्मचैतन्य ' असे नाव ठेवले, आणि त्यांना  प्रेमाने आलिंगन दिले. ' श्रीराम जयराम जय जय राम ' हा त्रयोदशाक्षरी मंत्र जपून रामोपासना करावयास सांगितले. तुकामाईंनी श्रीमहाराजांना रामदासी दीक्षा दिली आणि अनुग्रह देण्याचा अधिकार दिला. गुरुपदेश केला. काही गोष्टी आवर्जून करावयास सांगितल्या ' प्रापंचिक लोकांना- विशेषत: मध्यम स्थितीतल्या लोकांना- प्रपंचात परमार्थ कसा करावा हे शिकव. राममंदिराची स्थापना करून रामनामाचा प्रसार कर. माझे महत्त्व वाढविण्यापेक्षा श्रीसमर्थांचे महत्त्व वाढव. लोकांमध्ये भजनाचे प्रेम उत्पन्न होईल असा मार्ग दाखव. जे खरे दीन असतील त्यांची सेवा कर आणि सर्व ठिकाणी प्रेम वाढेल असा उपाय कर.'
          श्रीमहाराजांना गुरुकृपास्वरुपात चार वरदाने लाभली -
सर्वज्ञता - संपूर्ण ज्ञान. ज्याविषयी माहिती हवी असेल त्याचे तात्काळ ज्ञान होणे.
सर्वव्यापकता - कुठेही एका क्षणार्धात जाणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी क्षणार्धात देहाने जाणे किंवा एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रगट होणे.
श्रीमहाराजांचा जो अनुग्रहित असेल, त्याच्या संसारात ढवळाढवळ न करता, त्याच्या नकळत त्याची संसारातील आसक्ती शोषून घेणे.
जो महाराजांचा झाला त्याचा अंतकाळ साधून देणे.
          अनुग्रह झाल्यानंतर श्रीमहाराज काही दिवस येहळेगावला तुकामाईंजवळ राहिले. एक दिवस तुकामाई श्रीमहाराजांना म्हणाले, ' बाळ ! आत्मज्ञान जरी झाले तरी ते अंगामध्ये चांगले मुरले पाहिजे. त्यासाठी एकांतात राहून सखोल आत्मचिंतन करण्यासाठी तू हिमालयात जा. मोठमोठ्या तीर्थांचे दर्शन घे, आणि हे सर्व झाल्यावर आपल्या मायबापाना आणि कुटुंबाला भेटण्यासाठी घरी जा. ' 
          निरोपाच्या वेळी श्रीमहाराजांनी तुकामाईंच्या चरणावर मस्तक ठेवले. तुकामाईंनी त्यांना उचलून हृदयाशी धरले. तुकामाईंनी श्रीमहाराजांवर प्राणापलीकडे प्रेम केले. तुकामाईंचा प्रेमाचा सहवास आता सुटणार, ह्या कल्पनेने दोघांच्याही डोळ्यांना पाणी आले. मोठ्या जड अंत:करणाने श्रीमहाराज पुढे जाण्यास निघाले.
          श्रीमहाराज तेथून निघाले ते मजल दरमजल करीत उज्जैनला आले. उज्जैनजवळच असलेल्या एका घनदाट अरण्यात , अगदी निर्मनुष्य  ठिकाणी एका गुहेत, एकांतात ध्यानधारणा करीत श्रीमहाराजांनी काही काळ व्यतीत केला. त्यानंतर श्रीमहाराज थेट नैमिष्यारण्यामध्ये दोन वर्षांपूर्वी ज्या गुहेत रहात होते तेथे त्याच गुहेत आश्रय घेतला. येथे श्रीमहाराजांना आळंदीच्या श्रीनृसिंह सरस्वती स्वामींचा सहवास लाभला. श्रीमहाराज येथे दोन वर्षे राहिले. याच गुहेत श्रीमहाराजांना श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा परिचय झाला. याच गुहेत नानासाहेबांनी , १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा बिमोड झाल्याने आश्रय घेतला होता. श्रीमहाराजांनी नानासाहेबांना उर्वरित आयुष्य भगवंताच्या उपासनेत घालविण्याचा सल्ला दिला. एकंदर परिस्थितीचा विचार करून थोड्या नाखुशीनेच त्यांनी श्रीमहाराजांचा सल्ला मानला. नानासाहेबांनी पुढील सर्व काळ श्रीरामनामाचा जप व ज्ञानेश्वरी, दासबोध आदि अध्यात्मग्रंथांचे वाचन मनन करण्यात घालवला. अंतसमयी श्रीमहाराजांची भेट झाली. सन १९०६ साली नैमिष्यारण्यातच श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा अंत झाला .
          नैमिष्यारण्यातील आपला कार्यभाग संपल्यावर श्रीमहाराज तेथून तीर्थयात्रेसाठी बाहेर पडले.

|| जय जय रघुवीर समर्थ ||     
                
   
                                        

Wednesday, March 16, 2011

श्रीमहाराज ' नामावतार ' - ५


|| श्रीराम समर्थ ||
   || श्रीसद्गुरु  ब्रह्मचैतन्य महाराज समर्थ ||
          
          भगवंत सांगत आहेत की मी सर्व प्रकाराने देवता आणि महर्षि यांचा आदी असल्याने ईशतत्त्वाचे यथार्थ ज्ञान माझ्याशिवाय पूर्णपणे सांगणारा दुसरा कोणीही नाही.
' न मे विदु: सुरगणा: प्रभवं न महर्षय: |
                      अहमादिर्हि देवानां महर्षीणाम च सर्वश: || गीता अ. १०/२ ||
          ' माझ्या उत्पत्तीला अर्थात विभूतिसहित लीलेने प्रकट होण्याला देवता जाणत नाहीत आणि महर्षीजनही जाणत नाहीत. कारण मी सर्व प्रकारे देवांचे आणि महर्षींचेही आदिकारण आहे. '
          भगवंत विद्या, बुद्धी, योग्यता, सामर्थ्य इत्यादींनी जाणले जात नाहीत, तर जीज्ञासुच्या श्रद्धा-विश्वासाने  आणि भगवत्कृपेने जाणले जातात. ईश्वराचे अगम्य रूप त्याच्या कृपेनेच कळते.
          अर्जुनासारख्या शिष्योत्तमाला श्रीकृष्णासारखा सद्गुरू लाभल्याने, तसेच ' शिष्यस्तेहम शाधि मां त्वां प्रपन्नम ' असा शरणागत भाव असल्याने भगवंतकृपेचा लाभ झाला.
          भगवंताविषयीची जिज्ञासा, भगवंतदर्शनाची तळमळ, सद्गुरूंच्या भेटीची आंतरिक ओढ यामुळे श्रीमहाराजांच्या मनात प्रचंड खळबळ चाललेली होती. ते बेचैन होते. अस्वस्थ होते. एक दिवस संधी साधून गुरुशोधार्थ घराबाहेर पडले.
गुरुशोधार्थ भ्रमण :-
          श्रीमहाराज गुरुशोधार्थ प्रथम बाहेर पडले तेव्हा त्यांचे वय होते दहा. आणि गुरुशोधार्थ पुन्हा बाहेर पडले तेव्हा त्यांचे वय होते बारा. एका लंगोटीनिशी  निघालेला हा बालब्रह्मचारी पाहून लोकांना आश्चर्य वाटे. उतरण्यासाठी मंदिराचा आश्रय आणि पोटापुरती माधुकरी मागावी आणि जेथे कोणी सत्पुरुष आहे असे कळेल तेथे त्याच्या दर्शनाला जावे असा श्रीमहाराजांचा दिनक्रम होता. आत्यंतिक शरणागत भावाने भेटेल त्या साधू-सत्पुरुषाला नमन करावे.त्यानेही कृपावंत होऊन स्वत:जवळ असलेली विद्या द्यावी. ' तुला लवकरच गुरु भेटेल ' असा आशीर्वाद द्यावा आणि पुढे पाठवावे असे घडत होते.
          गुरुशोधार्थ सुरु झालेल्या प्रवासात काही पोटार्थी, लबाड, भरकटलेले, भोंदू साधूही भेटले. प्रवासात आलेले चांगले, वाईट अनुभव तसेच जो सत्संग घडला त्याने मन, बुद्धी,शरिर तावून सुलाखून निघाले. प्रवासात जी संतदर्शने झाली त्यामागे काही ईश्वरीयोजनाच असावी.
          कृष्णा-वारणा संगमाजवळ हरिपूर क्षेत्री संतसाध्वी राधाबाईंचा सहवास लाभला. असे सांगतात की त्या भजन करू लागल्या की रामाची मूर्ती डोलत असे. मिरज येथील सामान्यांना वेड्याप्रमाणे वाटणारे सिद्धपुरुष अण्णाबुवांचे आशीर्वाद लाभले. गळाभेट झाली.श्रीमहाराज सटाणे येथे देव-मामलेदार यांच्या घरी काही दिवस राहिले. देवमामलेदारांचे विशेष प्रेम श्रीमहाराजांना लाभले. देवमामलेदार एक अधिकारी सत्पुरुष असूनही त्यांनी श्रीमहाराजांना अनुग्रहासाठी दुसऱ्याकडे जाण्यास सांगितले. 
          तेथून श्रीमहाराज अक्कलकोट स्वामींच्या दर्शनासाठी गेले. स्वामीसमर्थ अध्यात्मविद्येत पोचलेले थोर पुरुष होते. श्रीमहाराजांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातला. स्वामींनी श्रीमहाराजांना जवळ घेतले आणि म्हणाले ' बाळ ! तुझे काम माझ्याकडे नाही '. स्वामींनी श्रीमहाराजांना कृपाप्रसाद देऊन पुढील प्रवासासाठी शुभाशीर्वाद दिले.
          अक्कलकोटहून श्रीमहाराज हुमणाबाद येथे श्रीमाणिकप्रभूंच्या दर्शनासाठी गेले. ते श्रीमहाराजांची वाटच पहात होते.त्यांची दोघांची दृष्टादृष्ट होताच दोघानाही परमानंद झाला. श्रीमहाराज काही दिवस त्यांच्या सहवासात राहिले. निरोपाचेवेळी श्रीमाणिक प्रभूंनी ' योग्य वेळी तुझे काम होईल  ' असा आशीर्वाद दिला.
        मुखी अखंड रामनाम, सद्गुरूंच्या भेटीचा ध्यास, गुरु भेटतील असा दुर्दम्य विश्वास, श्रीरामावर अपार श्रद्धा, आणि संत-महात्म्यांचे आशीर्वाद घेत श्रीमहाराजांचे गुरुशोधार्थ भ्रमण चालू होते. ऊन, वारा,पावसाची तमा नव्हती. रानावनातील काटेकुटे, भयंकर जंगली श्वापदे, साप-विंचू,निबिड अरण्यातील अंध:कार या कशाकशाची पर्वा न करता भ्रमण चालू होते.श्रीमहाराज अबूच्या पहाडामध्ये एका योग्याच्या शोधार्थ फिरत होते. हे योगीराज   अबूच्या डोंगरातील एका गुहेत ध्यानस्थ बसले होते. श्रीमहाराजांची तेजस्वी बालमूर्ती पाहून ते प्रसन्न झाले. त्यांच्याजवळची सर्व विद्या त्यांनी श्रीमहाराजांना शिकवली. श्रीमहाराजांनी येथील वास्तव्यात योगविद्येचा अभ्यास केला. असेच एकदा गिरनार पर्वतावर हिंडत असताना श्रीमहाराजांना एक मोठा दत्तभक्त भेटला. त्याला साक्षात दत्तात्रेयांनी अनुग्रह दिला होता. त्याने श्रीमहाराजांना दत्तदर्शन घडवले आणि दत्ताची उपासना दिली होती. रामनामस्मरण तर चालूच होते.  
          नंतर श्रीमहाराज काशीला आले. काशीमध्ये थोर सत्पुरुष तेलंगस्वामींची भेट झाली. तेलंगस्वामी अध्यात्मातील एक  अधिकारी पुरुष होते. योगाभ्यासात पूर्णपदाला पोचलेले होते. त्यांनी श्रीमहाराजांना काही दिवस आपल्याजवळ ठेवून घेतले. श्रीमहाराजांवर त्यांनी जीव लावला. श्रीमहाराजही स्वामींची मनोभावे सेवा करित असत. एके दिवशी स्वामींनी श्रीमहाराजांना जवळ बोलावले आणि म्हणाले ' बाळ ! तुझे काम लवकरच होईल आणि ते तुझ्या मनासारखे होईल ' आणि हिमालयात जाण्यास सुचवले. श्रीमहाराजांना काशीमध्येच आणखी एका प्रसिद्ध संन्याशाचे दर्शन झाले. तो षटशास्त्रांमध्ये पारंगत असून मंत्रविद्याही जाणत होता. त्यानेही आशीर्वाद दिले. आणि मोठ्या प्रेमाने सांगितले "तुला जी विद्या पाहिजे आहे ती देणारा गुरु मी नव्हे; तू दुसरीकडे जा ' आणि श्रीमहाराजांना निरोप दिला.
          श्रीमहाराज काशीहून अयोध्येला आले. अयोध्येहून ते नैमिष्यारण्यात गेले. नैमिष्यारण्यातील घनदाट जंगलात आलेले अनुभव चित्तथरारक होते. तेथील वास्तव्यात अनेक चांगल्या अधिकारी तपस्वीसाधूंचे दर्शन झाले. येथील वास्तव्य ध्यानधारणेत व्यतीत झाले. पुन्हा भ्रमण सुरु झाले. देशाच्या पूर्व भागातील बंगालमध्ये येऊन पोचले.
           बंगालमध्ये श्रीमहाराज काही श्रेष्ठ  भक्तांना भेटले. श्रीरामकृष्णांना भेटण्यासाठी दक्षिणेश्वरला गेले. श्रीरामकृष्ण कलकत्त्यात आहेत असे समजल्यावरून त्यांच्या भेटीसाठी श्रीमहाराज कलकत्त्याला आले. श्रीरामकृष्ण समोरून येताना दिसताच श्रीमहाराजांनी भररस्त्यात साष्टांग नमस्कार घातला. श्रीरामकृष्णांनी त्यांना उचलून  हृदयाशी धरले, आणि  उद्गारले  ' तू स्वत:चा खून कर, तू स्वत:ला मारून टाक '. 
     श्रीमहाराज कलकत्त्याहून दक्षिण हैदराबादला आले. एका नदीकाठी विचार करत बसलेले असताना अचानक समर्थसंप्रदायातले थोर सत्पुरुष तेथे प्रकटले. त्यांना पाहताच श्रीमहाराजांनी साष्टांग प्रणिपात केला. श्रीरामकृष्ण उदगारले ' बाळ ! येहेळेगावाच्या तुकारामचैतन्यांच्याकडे जा. तेथे तुझे पूर्ण समाधान होईल '.ते जसे अचानक प्रगट झाले तसेच पाहता पाहता ते नाहीसे झाले.
          येहळेगावी राहणाऱ्या श्रीतुकारामचैतन्यांकडे जायचे ठरवून त्या गावाची नीट चौकशी करून श्रीमहाराज मोठ्या आशेने आणि उत्साहाने येहळेगावला जाण्यास निघाले. 
श्रीमहाराजांचे सद्गुरू श्रीतुकारामचैतन्य :-
          सद्गुरू श्रीतुकारामचैतन्य यांचा जन्म शके १७३४ च्या फाल्गुन वद्य पंचमीस मराठवाड्यामध्ये नांदेडपासून काही अंतरावर असलेल्या येहळेगाव या लहानशा गावात झाला. बालपणापासून त्यांचे खेळ, खोड्या, चमत्कार पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत असे.' हे काम काही निराळेच आहे ' याचा प्रत्यय सद्गुरूंचे वडील काशिनाथपंत यांना पदोपदी येत असे.
          सद्गुरू तेज:पुंज, आजानुबाहु, आणि शरीराने  धष्टपुष्ट होते. त्यांच्याच शेतावर काम करणाऱ्या धनगरावर त्यांची विशेष माया होती आणि तोही त्यांना साधू मानीत असे. त्याच्या घरी जाऊन पुष्कळवेळा हे कांदाभाकरी खात व चिलीम पीत असत. लहानपणापासूनच नदीवर कोठेतरी एकांतात तासंतास ध्यानस्थ बसत असत. सद्गुरूंची बाह्य राहणी फारच अस्ताव्यस्त गबाळ्यासारखी असल्यामुळे लोक त्यांना ' वेडातुका ' असे म्हणत. त्यांचे वागणे वरवर पाहता विक्षिप्त वाटत असले तरी ज्यांचे अंत:करण शुद्ध आहे अशा माणसांशी त्यांचे संभाषण फार मार्मिक व अर्थपूर्ण असे.
          येहळेगावापासून काही कोसावर असलेल्या उमरखेड गावी चिन्मयानंद नावाचे फार मोठे सत्पुरुष रहात असत. यांनी प्रथम भेटीतच तुकाराम यांना अनुग्रह दिला आणि त्यांनी सद्गुरूंचे ' तुकारामचैतन्य 'असे नामकरण केले. त्या दिवसापासून सद्गुरूंच्या अंगी परमहंसवृत्ती बाणली. चिन्मयानंद हे नाथपरंपरेतील संत होते. या परंपरेत योग आणि भक्ति यांचा समन्वय आढळतो.
          श्रीतुकारामाना संत चिन्मयानंदांचा अनुग्रह झाला हे कळल्यापासून लोक श्रीतुकारामचैतन्यांच्या दर्शनास येऊ लागले. लोक त्यांना प्रेमाने, आदराने ' तुकामाय ' म्हणत असत आणि आपली दु:खे सांगत. त्यांच्या दर्शनाने, आशीर्वादाने संकटाचे निराकरण होते असा अनुभव काही लोकांना आल्यावर तर त्यांच्या दर्शनासाठी लोक तुकामाईंच्या मागे लागले. दर्शनार्थींची गर्दी वाढू लागताच तुकामाई जंगलात, रानावनात निघून जात. तुकामाई अत्यंत नि:स्पृह होते; जरा उग्र पण होते.ते भारी शिव्या देत. पण वरवर कठोर दिसणारे तुकामाई अत्यंत कोमल व मृदू अंत:करणाचे असून दुसरयाचे दु:ख पाहवत नसे.
          वात्रट व टवाळ लोकांशी आणि प्रापंचिक इच्छा पूर्ण करून घेऊ पाहणाऱ्या लोकांशी तुकामाई पिशाच्चवृत्तीने वागत ही गोष्ट खरी; परंतु खऱ्या जिज्ञासूबरोबर ते फार प्रेमळपणे वागत. त्यांचे बोलणे फार गूढ असे, पण ज्याच्यासाठी ते असे त्याला ते बरोबर आकलन होई. उच्च अशा अध्यात्मिक अवस्थेमध्ये वावरणाऱ्या या महात्म्याला लोक ' वेडा तुक्या ' म्हणत असत. त्यांची वृत्ती सदैव आनंदी असे. ज्याचा त्याचा अधिकार पाहून योग किंवा भक्ति किंवा दानधर्म किंवा तीर्थयात्रा करायला सांगत. तरी सर्वसाधारणपणे भगवंताचे नामस्मरण करा आणि त्याला शरण जा, त्याच्यावर विश्वास ठेवा हेच त्यांचे पुन्हा पुन्हा सांगणे असे. स्वत: नाथपंथी विठ्ठलोपासक असूनही त्यांनी श्रीमहाराजांना रामोपासना दिली. 
          एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जे ब्रह्मनिष्ठ सत्पुरुष भारतामध्ये होते त्यांच्यापैकी श्रीतुकारामचैतन्य हे एक होत. ते विलक्षण योगिराज आणि थोर महात्मा होते. बहुजनसमाजावर आईप्रमाणे प्रेम करणारा हा संत बाहेरून जरी कडक दिसला तरी अंतरी प्रेमळ होता. त्यांचे दर्शन घेऊन परत जायला निघालेल्या लोकांना वियोगाचे दु:खाने रडायला येत असे. तुकामाईंच्याकडून अनुग्रह मिळण्यास फार कष्ट पडत. त्यांच्या कसोटीला उतरणे अति कठीण गोष्ट असल्याने त्यांचे चार-पाचच खरे शिष्य होते. जो मनुष्य परमार्थ साधण्यासाठी त्यांच्याकडे येई त्याचा पाया चांगला मजबूत करून मगच त्याच्यावर ते कृपा करीत.
          सर्वसामान्यांसाठी, वात्रट व टवाळ लोकांसाठी ते ' वेडा तुक्या ' होते, गरजू, दु:खितांसाठी, रंजल्या-गांजलेल्यासाठी ते ' तुकामाय ' होते आणि जिज्ञासू, साधक, पारमार्थिक आणि अधिकारी पुरुषांसाठी ते  
' श्रीतुकारामचैतन्य ' होते.श्रीमहाराजांसाठी ते तुकामाय होते, श्रीतुकारामचैतन्य होते, प्रत्यक्ष सद्गुरू होते.
          ' मूर्तिमंत विरक्ती, शांती व आनंद ' असे श्रीतुकारामचैतन्यांचे वर्णन करता येईल. या महापुरुषाने शके १८०९ मध्ये ज्येष्ठ्मासी शुद्ध अष्टमीस, शुक्रवारी, प्रहर रात्रीचे समयी येहळेगाव येथेच देह ठेवला.
प्रार्थना : 
गुरुराया, रामराया,  मारुतीराया, सद्गुरुराया मुखी अखंड रामनाम राहो, सद्गुरूंचे निरंतर स्मरण राहो, शेवटचा   श्वासही मुखी  रामनाम आणि सद्गुरूंच्या स्मरणात जावो ही श्रीमहाराजांच्या चरणी नम्र प्रार्थना.
|| श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सत्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय.||

|| जय जय रघुवीर समर्थ ||