|| श्रीराम समर्थ ||
|| श्रीसद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज समर्थ ||
भगवंत सांगत आहेत की मी सर्व प्रकाराने देवता आणि महर्षि यांचा आदी असल्याने ईशतत्त्वाचे यथार्थ ज्ञान माझ्याशिवाय पूर्णपणे सांगणारा दुसरा कोणीही नाही.
' न मे विदु: सुरगणा: प्रभवं न महर्षय: |
अहमादिर्हि देवानां महर्षीणाम च सर्वश: || गीता अ. १०/२ ||
' माझ्या उत्पत्तीला अर्थात विभूतिसहित लीलेने प्रकट होण्याला देवता जाणत नाहीत आणि महर्षीजनही जाणत नाहीत. कारण मी सर्व प्रकारे देवांचे आणि महर्षींचेही आदिकारण आहे. '
भगवंत विद्या, बुद्धी, योग्यता, सामर्थ्य इत्यादींनी जाणले जात नाहीत, तर जीज्ञासुच्या श्रद्धा-विश्वासाने आणि भगवत्कृपेने जाणले जातात. ईश्वराचे अगम्य रूप त्याच्या कृपेनेच कळते.
अर्जुनासारख्या शिष्योत्तमाला श्रीकृष्णासारखा सद्गुरू लाभल्याने, तसेच ' शिष्यस्तेहम शाधि मां त्वां प्रपन्नम ' असा शरणागत भाव असल्याने भगवंतकृपेचा लाभ झाला.
भगवंताविषयीची जिज्ञासा, भगवंतदर्शनाची तळमळ, सद्गुरूंच्या भेटीची आंतरिक ओढ यामुळे श्रीमहाराजांच्या मनात प्रचंड खळबळ चाललेली होती. ते बेचैन होते. अस्वस्थ होते. एक दिवस संधी साधून गुरुशोधार्थ घराबाहेर पडले.
गुरुशोधार्थ भ्रमण :-
श्रीमहाराज गुरुशोधार्थ प्रथम बाहेर पडले तेव्हा त्यांचे वय होते दहा. आणि गुरुशोधार्थ पुन्हा बाहेर पडले तेव्हा त्यांचे वय होते बारा. एका लंगोटीनिशी निघालेला हा बालब्रह्मचारी पाहून लोकांना आश्चर्य वाटे. उतरण्यासाठी मंदिराचा आश्रय आणि पोटापुरती माधुकरी मागावी आणि जेथे कोणी सत्पुरुष आहे असे कळेल तेथे त्याच्या दर्शनाला जावे असा श्रीमहाराजांचा दिनक्रम होता. आत्यंतिक शरणागत भावाने भेटेल त्या साधू-सत्पुरुषाला नमन करावे.त्यानेही कृपावंत होऊन स्वत:जवळ असलेली विद्या द्यावी. ' तुला लवकरच गुरु भेटेल ' असा आशीर्वाद द्यावा आणि पुढे पाठवावे असे घडत होते.
गुरुशोधार्थ सुरु झालेल्या प्रवासात काही पोटार्थी, लबाड, भरकटलेले, भोंदू साधूही भेटले. प्रवासात आलेले चांगले, वाईट अनुभव तसेच जो सत्संग घडला त्याने मन, बुद्धी,शरिर तावून सुलाखून निघाले. प्रवासात जी संतदर्शने झाली त्यामागे काही ईश्वरीयोजनाच असावी.
कृष्णा-वारणा संगमाजवळ हरिपूर क्षेत्री संतसाध्वी राधाबाईंचा सहवास लाभला. असे सांगतात की त्या भजन करू लागल्या की रामाची मूर्ती डोलत असे. मिरज येथील सामान्यांना वेड्याप्रमाणे वाटणारे सिद्धपुरुष अण्णाबुवांचे आशीर्वाद लाभले. गळाभेट झाली.श्रीमहाराज सटाणे येथे देव-मामलेदार यांच्या घरी काही दिवस राहिले. देवमामलेदारांचे विशेष प्रेम श्रीमहाराजांना लाभले. देवमामलेदार एक अधिकारी सत्पुरुष असूनही त्यांनी श्रीमहाराजांना अनुग्रहासाठी दुसऱ्याकडे जाण्यास सांगितले.
तेथून श्रीमहाराज अक्कलकोट स्वामींच्या दर्शनासाठी गेले. स्वामीसमर्थ अध्यात्मविद्येत पोचलेले थोर पुरुष होते. श्रीमहाराजांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातला. स्वामींनी श्रीमहाराजांना जवळ घेतले आणि म्हणाले ' बाळ ! तुझे काम माझ्याकडे नाही '. स्वामींनी श्रीमहाराजांना कृपाप्रसाद देऊन पुढील प्रवासासाठी शुभाशीर्वाद दिले.
अक्कलकोटहून श्रीमहाराज हुमणाबाद येथे श्रीमाणिकप्रभूंच्या दर्शनासाठी गेले. ते श्रीमहाराजांची वाटच पहात होते.त्यांची दोघांची दृष्टादृष्ट होताच दोघानाही परमानंद झाला. श्रीमहाराज काही दिवस त्यांच्या सहवासात राहिले. निरोपाचेवेळी श्रीमाणिक प्रभूंनी ' योग्य वेळी तुझे काम होईल ' असा आशीर्वाद दिला.
मुखी अखंड रामनाम, सद्गुरूंच्या भेटीचा ध्यास, गुरु भेटतील असा दुर्दम्य विश्वास, श्रीरामावर अपार श्रद्धा, आणि संत-महात्म्यांचे आशीर्वाद घेत श्रीमहाराजांचे गुरुशोधार्थ भ्रमण चालू होते. ऊन, वारा,पावसाची तमा नव्हती. रानावनातील काटेकुटे, भयंकर जंगली श्वापदे, साप-विंचू,निबिड अरण्यातील अंध:कार या कशाकशाची पर्वा न करता भ्रमण चालू होते.श्रीमहाराज अबूच्या पहाडामध्ये एका योग्याच्या शोधार्थ फिरत होते. हे योगीराज अबूच्या डोंगरातील एका गुहेत ध्यानस्थ बसले होते. श्रीमहाराजांची तेजस्वी बालमूर्ती पाहून ते प्रसन्न झाले. त्यांच्याजवळची सर्व विद्या त्यांनी श्रीमहाराजांना शिकवली. श्रीमहाराजांनी येथील वास्तव्यात योगविद्येचा अभ्यास केला. असेच एकदा गिरनार पर्वतावर हिंडत असताना श्रीमहाराजांना एक मोठा दत्तभक्त भेटला. त्याला साक्षात दत्तात्रेयांनी अनुग्रह दिला होता. त्याने श्रीमहाराजांना दत्तदर्शन घडवले आणि दत्ताची उपासना दिली होती. रामनामस्मरण तर चालूच होते.
नंतर श्रीमहाराज काशीला आले. काशीमध्ये थोर सत्पुरुष तेलंगस्वामींची भेट झाली. तेलंगस्वामी अध्यात्मातील एक अधिकारी पुरुष होते. योगाभ्यासात पूर्णपदाला पोचलेले होते. त्यांनी श्रीमहाराजांना काही दिवस आपल्याजवळ ठेवून घेतले. श्रीमहाराजांवर त्यांनी जीव लावला. श्रीमहाराजही स्वामींची मनोभावे सेवा करित असत. एके दिवशी स्वामींनी श्रीमहाराजांना जवळ बोलावले आणि म्हणाले ' बाळ ! तुझे काम लवकरच होईल आणि ते तुझ्या मनासारखे होईल ' आणि हिमालयात जाण्यास सुचवले. श्रीमहाराजांना काशीमध्येच आणखी एका प्रसिद्ध संन्याशाचे दर्शन झाले. तो षटशास्त्रांमध्ये पारंगत असून मंत्रविद्याही जाणत होता. त्यानेही आशीर्वाद दिले. आणि मोठ्या प्रेमाने सांगितले "तुला जी विद्या पाहिजे आहे ती देणारा गुरु मी नव्हे; तू दुसरीकडे जा ' आणि श्रीमहाराजांना निरोप दिला.
श्रीमहाराज काशीहून अयोध्येला आले. अयोध्येहून ते नैमिष्यारण्यात गेले. नैमिष्यारण्यातील घनदाट जंगलात आलेले अनुभव चित्तथरारक होते. तेथील वास्तव्यात अनेक चांगल्या अधिकारी तपस्वीसाधूंचे दर्शन झाले. येथील वास्तव्य ध्यानधारणेत व्यतीत झाले. पुन्हा भ्रमण सुरु झाले. देशाच्या पूर्व भागातील बंगालमध्ये येऊन पोचले.
बंगालमध्ये श्रीमहाराज काही श्रेष्ठ भक्तांना भेटले. श्रीरामकृष्णांना भेटण्यासाठी दक्षिणेश्वरला गेले. श्रीरामकृष्ण कलकत्त्यात आहेत असे समजल्यावरून त्यांच्या भेटीसाठी श्रीमहाराज कलकत्त्याला आले. श्रीरामकृष्ण समोरून येताना दिसताच श्रीमहाराजांनी भररस्त्यात साष्टांग नमस्कार घातला. श्रीरामकृष्णांनी त्यांना उचलून हृदयाशी धरले, आणि उद्गारले ' तू स्वत:चा खून कर, तू स्वत:ला मारून टाक '.
श्रीमहाराज कलकत्त्याहून दक्षिण हैदराबादला आले. एका नदीकाठी विचार करत बसलेले असताना अचानक समर्थसंप्रदायातले थोर सत्पुरुष तेथे प्रकटले. त्यांना पाहताच श्रीमहाराजांनी साष्टांग प्रणिपात केला. श्रीरामकृष्ण उदगारले ' बाळ ! येहेळेगावाच्या तुकारामचैतन्यांच्याकडे जा. तेथे तुझे पूर्ण समाधान होईल '.ते जसे अचानक प्रगट झाले तसेच पाहता पाहता ते नाहीसे झाले.
येहळेगावी राहणाऱ्या श्रीतुकारामचैतन्यांकडे जायचे ठरवून त्या गावाची नीट चौकशी करून श्रीमहाराज मोठ्या आशेने आणि उत्साहाने येहळेगावला जाण्यास निघाले.
श्रीमहाराजांचे सद्गुरू श्रीतुकारामचैतन्य :-
सद्गुरू श्रीतुकारामचैतन्य यांचा जन्म शके १७३४ च्या फाल्गुन वद्य पंचमीस मराठवाड्यामध्ये नांदेडपासून काही अंतरावर असलेल्या येहळेगाव या लहानशा गावात झाला. बालपणापासून त्यांचे खेळ, खोड्या, चमत्कार पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत असे.' हे काम काही निराळेच आहे ' याचा प्रत्यय सद्गुरूंचे वडील काशिनाथपंत यांना पदोपदी येत असे.
सद्गुरू तेज:पुंज, आजानुबाहु, आणि शरीराने धष्टपुष्ट होते. त्यांच्याच शेतावर काम करणाऱ्या धनगरावर त्यांची विशेष माया होती आणि तोही त्यांना साधू मानीत असे. त्याच्या घरी जाऊन पुष्कळवेळा हे कांदाभाकरी खात व चिलीम पीत असत. लहानपणापासूनच नदीवर कोठेतरी एकांतात तासंतास ध्यानस्थ बसत असत. सद्गुरूंची बाह्य राहणी फारच अस्ताव्यस्त गबाळ्यासारखी असल्यामुळे लोक त्यांना ' वेडातुका ' असे म्हणत. त्यांचे वागणे वरवर पाहता विक्षिप्त वाटत असले तरी ज्यांचे अंत:करण शुद्ध आहे अशा माणसांशी त्यांचे संभाषण फार मार्मिक व अर्थपूर्ण असे.
येहळेगावापासून काही कोसावर असलेल्या उमरखेड गावी चिन्मयानंद नावाचे फार मोठे सत्पुरुष रहात असत. यांनी प्रथम भेटीतच तुकाराम यांना अनुग्रह दिला आणि त्यांनी सद्गुरूंचे ' तुकारामचैतन्य 'असे नामकरण केले. त्या दिवसापासून सद्गुरूंच्या अंगी परमहंसवृत्ती बाणली. चिन्मयानंद हे नाथपरंपरेतील संत होते. या परंपरेत योग आणि भक्ति यांचा समन्वय आढळतो.
श्रीतुकारामाना संत चिन्मयानंदांचा अनुग्रह झाला हे कळल्यापासून लोक श्रीतुकारामचैतन्यांच्या दर्शनास येऊ लागले. लोक त्यांना प्रेमाने, आदराने ' तुकामाय ' म्हणत असत आणि आपली दु:खे सांगत. त्यांच्या दर्शनाने, आशीर्वादाने संकटाचे निराकरण होते असा अनुभव काही लोकांना आल्यावर तर त्यांच्या दर्शनासाठी लोक तुकामाईंच्या मागे लागले. दर्शनार्थींची गर्दी वाढू लागताच तुकामाई जंगलात, रानावनात निघून जात. तुकामाई अत्यंत नि:स्पृह होते; जरा उग्र पण होते.ते भारी शिव्या देत. पण वरवर कठोर दिसणारे तुकामाई अत्यंत कोमल व मृदू अंत:करणाचे असून दुसरयाचे दु:ख पाहवत नसे.
वात्रट व टवाळ लोकांशी आणि प्रापंचिक इच्छा पूर्ण करून घेऊ पाहणाऱ्या लोकांशी तुकामाई पिशाच्चवृत्तीने वागत ही गोष्ट खरी; परंतु खऱ्या जिज्ञासूबरोबर ते फार प्रेमळपणे वागत. त्यांचे बोलणे फार गूढ असे, पण ज्याच्यासाठी ते असे त्याला ते बरोबर आकलन होई. उच्च अशा अध्यात्मिक अवस्थेमध्ये वावरणाऱ्या या महात्म्याला लोक ' वेडा तुक्या ' म्हणत असत. त्यांची वृत्ती सदैव आनंदी असे. ज्याचा त्याचा अधिकार पाहून योग किंवा भक्ति किंवा दानधर्म किंवा तीर्थयात्रा करायला सांगत. तरी सर्वसाधारणपणे भगवंताचे नामस्मरण करा आणि त्याला शरण जा, त्याच्यावर विश्वास ठेवा हेच त्यांचे पुन्हा पुन्हा सांगणे असे. स्वत: नाथपंथी विठ्ठलोपासक असूनही त्यांनी श्रीमहाराजांना रामोपासना दिली.
एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जे ब्रह्मनिष्ठ सत्पुरुष भारतामध्ये होते त्यांच्यापैकी श्रीतुकारामचैतन्य हे एक होत. ते विलक्षण योगिराज आणि थोर महात्मा होते. बहुजनसमाजावर आईप्रमाणे प्रेम करणारा हा संत बाहेरून जरी कडक दिसला तरी अंतरी प्रेमळ होता. त्यांचे दर्शन घेऊन परत जायला निघालेल्या लोकांना वियोगाचे दु:खाने रडायला येत असे. तुकामाईंच्याकडून अनुग्रह मिळण्यास फार कष्ट पडत. त्यांच्या कसोटीला उतरणे अति कठीण गोष्ट असल्याने त्यांचे चार-पाचच खरे शिष्य होते. जो मनुष्य परमार्थ साधण्यासाठी त्यांच्याकडे येई त्याचा पाया चांगला मजबूत करून मगच त्याच्यावर ते कृपा करीत.
सर्वसामान्यांसाठी, वात्रट व टवाळ लोकांसाठी ते ' वेडा तुक्या ' होते, गरजू, दु:खितांसाठी, रंजल्या-गांजलेल्यासाठी ते ' तुकामाय ' होते आणि जिज्ञासू, साधक, पारमार्थिक आणि अधिकारी पुरुषांसाठी ते
' श्रीतुकारामचैतन्य ' होते.श्रीमहाराजांसाठी ते तुकामाय होते, श्रीतुकारामचैतन्य होते, प्रत्यक्ष सद्गुरू होते.
' मूर्तिमंत विरक्ती, शांती व आनंद ' असे श्रीतुकारामचैतन्यांचे वर्णन करता येईल. या महापुरुषाने शके १८०९ मध्ये ज्येष्ठ्मासी शुद्ध अष्टमीस, शुक्रवारी, प्रहर रात्रीचे समयी येहळेगाव येथेच देह ठेवला.
प्रार्थना :
गुरुराया, रामराया, मारुतीराया, सद्गुरुराया मुखी अखंड रामनाम राहो, सद्गुरूंचे निरंतर स्मरण राहो, शेवटचा श्वासही मुखी रामनाम आणि सद्गुरूंच्या स्मरणात जावो ही श्रीमहाराजांच्या चरणी नम्र प्रार्थना.
|| श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सत्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय.||
|| जय जय रघुवीर समर्थ ||
No comments:
Post a Comment