|| श्रीराम समर्थ ||
|| श्रीसद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज समर्थ ||
भगवंत अर्जुनाला आत्मज्ञान कसे प्राप्त करावे हे सांगत आहेत-
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया |
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन: || गीता अ. ४/३४ ||
' सद्गुरुना साष्टांग नमस्कार करून त्यांची सेवा सुश्रूषा करून, निष्कपट भावाने (सरळतेने ) प्रश्न विचारून ते ज्ञान ( आत्मज्ञान-स्वरूपज्ञान-परमेश्वर स्वरूपाचे ज्ञान ) समजून घे. ते तत्त्व ( परमात्मतत्त्व ) जाणणारे ज्ञानी महापुरुष तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील.'
श्रीमहाराज गुरुशोधार्थ वयाच्या बाराव्या वर्षी घरातून बाहेर पडले. दोन-अडीच वर्षे भ्रमंती चालू होती. अनेक अधिकारी संत-साधू-सत्पुरुष-महात्म्यांचे दर्शन झाले, त्यांची सेवा घडली. त्यांच्याकडे असलेले ज्ञान, योगविद्या, मंत्र-तंत्र त्यांनी श्रीमहाराजांना मोठ्या आनंदाने दिले पण ' तुझा गुरु होण्याचा अधिकार आम्हाला नाही. तुला लवकरच गुरु भेटतील ' असे सांगून पुढे पाठवले. आणि अचानक एके दिवशी श्रीसमर्थांच्या परंपरेतील सत्पुरुष श्रीरामकृष्ण प्रकट झाले आणि त्यांनी श्रीमहाराजांना नाथपरंपरेतील विठ्ठलोपासक श्रीतुकारामचैतन्यांकडे जायला सांगितले.
सद्गुरू श्रीतुकारामचैतन्य भेट :-
श्रीमहाराज पैठण, औरंगाबाद, जालना, नांदेड असा प्रवास करत येहळेगावला पोहचले. तुकामाईंची चौकशी करणारा तो पंधरावर्षांचा बालब्रह्मचारी पाहून लोकांना कुतूहल आणि आश्चर्य वाटले. लोकांनी तुकामाईंच्या विषयी जी माहिती सांगितली त्यावरून श्रीमहाराजांनी मनोमनी जाणले की, तुकामाई हे अध्यात्मातील एका उच्चतम अवस्थेला पोचलेले सत्पुरुष आहेत. डोक्याला टोपडं, हातात बांगड्या, मुलांबरोबर किंवा कुत्र्याच्या पिलांबरोबर खेळणारे, अंगात धड वस्त्र नाही, शरीर चिखलाने माखलेले,आडरानात, शेतात, ओढ्याच्या काठी फिरणारे, हातात चिलीम असे बाह्यांगी वेड्याप्रमाणे वाटणारे आणि तुसडेपणाने वागून शिव्या देणारे असे हे ध्यान शोधावे तरी कोठे ? ' वेडा तुक्या ' म्हणून जरी त्यांची ओळख असली तरी लोक त्यांच्याविषयी आदरयुक्त प्रेमभावाने बोलत होते, हे श्रीमहाराजांनी तत्काळ ओळखले. सबंधगाव, आडरान, ओढाकाठ, भोवतालची शेते अशा सर्व ठिकाणी शोधशोध शोधले परंतु तुकामाईंचा काही पत्ता लागेना. श्रीमहाराज दमून भागून तुकामाईंच्या घराच्या भिंतीला टेकून बसले तोच अचानक त्यांच्या दिशेने आरडाओरडा करीत तुकामाईंची स्वारी येताना दिसली. कमरेला लंगोटी, डोक्याला टोपडे, एका हातात चिलीम तर दुसऱ्या हातात ऊसाचे दांडके घेऊन श्रीमहाराजांना मारायला धावले. मारण्यासाठी उगारलेला हात दोघांची दृष्टादृष्ट होताच खाली झाला. खूण पटली. श्रीमहाराजांनी तुकामाईना साष्टांग नमस्कार घातला. तुकामाईंनी श्रीमहाराजांना उचलून पोटाशी धरले. दोघांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. तुकामाईंनी श्रीमहाराजांना हाताला धरून घरात नेले.
तुकामाईना पाहताच श्रीमहाराजांना विलक्षण समाधान वाटले. सद्गुरू भेटल्याचा परमानंद झाला. तुकामाईंची ब्रह्मनिष्टा, प्रेमळपणा, निस्पुहता आणि दीनवत्सलता पाहून श्रीमहाराज भरून पावले. शरणागत भावाने त्यांनी जवळपास नऊ महिने तुकामाईंची सेवा-सुश्रुषा केली. तो काळ श्रीमहाराजांच्या सहनशीलतेची कसोटी पाहणारा होता. तुकामाईंची सावली बनून ते वावरले. ओढ्याकाठी, रानावनात, वेळी अवेळी, उन्हां पावसात तुकामाईंच्या लहरीनुसार त्यांची पाठराखण केली. कधी कधी मार खाल्ला, स्तुती-निंदा ऐकावी लागली तर कधी तुकामाईंची वत्सलता अनुभवली. मात्र त्यांच्या सेवेतच धन्यता मानली.
एकदा तुकामाईंनी श्रीमहाराजांना वडाच्या झाडाची सर्व पाने तोडावयास सांगितली आणि नंतर जेथल्या तेथे लावून टाक म्हणून आज्ञा केली. एकदा तर ऊसाची भलीथोरली मोळी श्रीमहाराजांच्या डोक्यावर देऊन आपल्या मागे येण्यास सांगितले. तुकामाई इकडे तिकडे पळत सुटले. श्रीमहाराज डोक्यावर ऊसाची मोळी घेऊन त्यांच्या मागे पळत होते. नंतर तुकामाईंनी ते ऊस इतस्तत: फेकून दिले. मुलांना वाटून टाकले. एकदा श्रीमहाराजांना डोहात उडी घेण्यास सांगितले. वर येण्याची आज्ञा न दिल्याने श्रीमहाराज पाण्यातच राहिले. तुकामाईंनी ' बाळ बुडाला ' असा आरडाओरडा केला. लोक जमले. दोनतीन तासांनी पाण्यातून बाहेर येण्याची आज्ञा होताच श्रीमहाराज पाण्यातून उसळी मारून वर आले. एकदा श्रीमहाराजांना मोठा खड्डा खणण्यास सांगितले. जवळच खेळणाऱ्या तीन मुलांना धरून खड्ड्यात टाकले आणि त्यावर माती ढकलली आणि श्रीमहाराजांना त्या मातीच्या ढिगाऱ्यावर सिद्धासन घालून मौनात बसावयास सांगितले. काही वेळाने पोरांचे आईबाप मुलांना शोधत तेथे आले. श्रीमहाराजांनीच मुलांना मातीत पुरले असे तुकामाईंनी सांगताच लोकांनी श्रीमहाराजांना यथेच्छ बडवले, अक्षरश: तुडवले. माती बाजूला करताच मुले मृतवत अवस्थेत होती.लोकांनी शिव्यांचा भडीमार आणि लाथाबुक्क्यांनी श्रीमहाराजांना मारण्यास सुरवात केली. श्रीमहाराजांनी मौन सोडले नाही. तुकामाई प्रसन्न झाले.मुलांवर त्यांनी नजर फिरवताच ती हालचाल करु लागली. ' त्या बिचाऱ्याला उगाच का मारता, मुले तर जिवंत आहेत. ' असे सांगत तुकामाई मध्ये पडले. लोक ओशाळले. लोकांनी श्रीमहाराजांची क्षमा मागितली. अशा अनेक दिव्व्यातून श्रीमहाराजांना जाव लागल. अपार श्रद्धा आणि निष्ठेने सेवा करतच राहिले. तुकामाईंच्या कसोटीला श्रीमहाराज पूर्णपणे उतरले. त्या नऊ महिन्यांच्या काळात श्रीमहाराजांना तुकामाईखेरीज कशाचीही, कोणाचीही आठवण आली नाही. गुरूंच्या अखंड सेवेमध्ये ते स्वत:चे भान विसरले. त्यांच्या मनाचे व्यापार स्तब्ध झाले. भूक, तहान, झोप वगैरे देहधर्म सुटले. एकाअर्थी श्रीमहाराज देहाभिमानशून्य झाले. त्यांचे अंत:करण पूर्ण निर्वासन झाले. त्यांच्या चेहऱ्यावर खऱ्या चित्तशुद्धीचे तेज विलसत होते.
श्रीगुरुकृपा :-
भगवंत पुढील श्लोकात ज्ञानप्राप्तीच्या पात्राचे निरुपण करतात -
श्रद्धावांल्लभते ज्ञानं तत्पर: संयतेन्द्रिय: |
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ||गीता अ. ४/३९ ||
' जो, जितेंद्रिय तसेच साधन-पारायण आहे असा श्रद्धावान मनुष्य ज्ञानाला प्राप्त होतो आणि ज्ञानाला प्राप्त होऊन तो तत्काळ परम शांतीला प्राप्त होतो.'
परमात्म्यामध्ये, महापुरुषांमध्ये, धर्मामध्ये आणि शास्त्रामध्ये प्रत्यक्षाप्रमाणे आदरपूर्वक विश्वास असणे ह्याला श्रद्धा म्हणतात. श्रीमहाराजांची सद्गुरूंवर, रामनामावर अपार श्रद्धा होती.
एके दिवशी भर दुपारी तुकामाई श्रीमहाराजांना बरोबर घेऊन शेतावरच्या विहिरीवर आले त्या दिवशी रामनवमी होती. दोघांनी स्नान केले. एका अशोकवृक्षाखाली तुकामाईंनी श्रीमहाराजांना अनुग्रह दिला. श्रीमहाराजांच्या डोक्यावर हात ठेवताच श्रीमहाराजांना तत्काळ समाधी लागली. जीवन धन्य झाले. जेव्हा श्रीमहाराज समाधीअवस्थेतून बाहेर आले तेव्हा तुकामाईंनी त्यांचे ' ब्रह्मचैतन्य ' असे नाव ठेवले, आणि त्यांना प्रेमाने आलिंगन दिले. ' श्रीराम जयराम जय जय राम ' हा त्रयोदशाक्षरी मंत्र जपून रामोपासना करावयास सांगितले. तुकामाईंनी श्रीमहाराजांना रामदासी दीक्षा दिली आणि अनुग्रह देण्याचा अधिकार दिला. गुरुपदेश केला. काही गोष्टी आवर्जून करावयास सांगितल्या ' प्रापंचिक लोकांना- विशेषत: मध्यम स्थितीतल्या लोकांना- प्रपंचात परमार्थ कसा करावा हे शिकव. राममंदिराची स्थापना करून रामनामाचा प्रसार कर. माझे महत्त्व वाढविण्यापेक्षा श्रीसमर्थांचे महत्त्व वाढव. लोकांमध्ये भजनाचे प्रेम उत्पन्न होईल असा मार्ग दाखव. जे खरे दीन असतील त्यांची सेवा कर आणि सर्व ठिकाणी प्रेम वाढेल असा उपाय कर.'
श्रीमहाराजांना गुरुकृपास्वरुपात चार वरदाने लाभली -
सर्वज्ञता - संपूर्ण ज्ञान. ज्याविषयी माहिती हवी असेल त्याचे तात्काळ ज्ञान होणे.
सर्वव्यापकता - कुठेही एका क्षणार्धात जाणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी क्षणार्धात देहाने जाणे किंवा एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रगट होणे.
श्रीमहाराजांचा जो अनुग्रहित असेल, त्याच्या संसारात ढवळाढवळ न करता, त्याच्या नकळत त्याची संसारातील आसक्ती शोषून घेणे.
जो महाराजांचा झाला त्याचा अंतकाळ साधून देणे.
अनुग्रह झाल्यानंतर श्रीमहाराज काही दिवस येहळेगावला तुकामाईंजवळ राहिले. एक दिवस तुकामाई श्रीमहाराजांना म्हणाले, ' बाळ ! आत्मज्ञान जरी झाले तरी ते अंगामध्ये चांगले मुरले पाहिजे. त्यासाठी एकांतात राहून सखोल आत्मचिंतन करण्यासाठी तू हिमालयात जा. मोठमोठ्या तीर्थांचे दर्शन घे, आणि हे सर्व झाल्यावर आपल्या मायबापाना आणि कुटुंबाला भेटण्यासाठी घरी जा. '
निरोपाच्या वेळी श्रीमहाराजांनी तुकामाईंच्या चरणावर मस्तक ठेवले. तुकामाईंनी त्यांना उचलून हृदयाशी धरले. तुकामाईंनी श्रीमहाराजांवर प्राणापलीकडे प्रेम केले. तुकामाईंचा प्रेमाचा सहवास आता सुटणार, ह्या कल्पनेने दोघांच्याही डोळ्यांना पाणी आले. मोठ्या जड अंत:करणाने श्रीमहाराज पुढे जाण्यास निघाले.
श्रीमहाराज तेथून निघाले ते मजल दरमजल करीत उज्जैनला आले. उज्जैनजवळच असलेल्या एका घनदाट अरण्यात , अगदी निर्मनुष्य ठिकाणी एका गुहेत, एकांतात ध्यानधारणा करीत श्रीमहाराजांनी काही काळ व्यतीत केला. त्यानंतर श्रीमहाराज थेट नैमिष्यारण्यामध्ये दोन वर्षांपूर्वी ज्या गुहेत रहात होते तेथे त्याच गुहेत आश्रय घेतला. येथे श्रीमहाराजांना आळंदीच्या श्रीनृसिंह सरस्वती स्वामींचा सहवास लाभला. श्रीमहाराज येथे दोन वर्षे राहिले. याच गुहेत श्रीमहाराजांना श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा परिचय झाला. याच गुहेत नानासाहेबांनी , १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा बिमोड झाल्याने आश्रय घेतला होता. श्रीमहाराजांनी नानासाहेबांना उर्वरित आयुष्य भगवंताच्या उपासनेत घालविण्याचा सल्ला दिला. एकंदर परिस्थितीचा विचार करून थोड्या नाखुशीनेच त्यांनी श्रीमहाराजांचा सल्ला मानला. नानासाहेबांनी पुढील सर्व काळ श्रीरामनामाचा जप व ज्ञानेश्वरी, दासबोध आदि अध्यात्मग्रंथांचे वाचन मनन करण्यात घालवला. अंतसमयी श्रीमहाराजांची भेट झाली. सन १९०६ साली नैमिष्यारण्यातच श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा अंत झाला .
नैमिष्यारण्यातील आपला कार्यभाग संपल्यावर श्रीमहाराज तेथून तीर्थयात्रेसाठी बाहेर पडले.
|| जय जय रघुवीर समर्थ ||
No comments:
Post a Comment