|| श्रीसद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज समर्थ ||
श्रीभगवंत योगभ्रष्टाच्या गतीविषयी सांगत आहेत :-
' तत्र तं बुद्धिसंयोगम लभते पौर्वदेहीकम ||
यतते च ततो भूय: संसिद्धौ कुरुनन्दन || गीता अ. ६/४३ || '
' हे कुरुनन्दन ! ( पुण्यवान कुळात जन्म घेणाऱ्या ) त्याला त्या ठिकाणी पूर्व देही ( पूर्व जन्मात ) केलेली साधन-संपत्ती ( सहजच ) प्राप्त होते. मग ( तो ) तिच्या ( बुद्धिसंयोग अर्थात समत्व बुद्धियोगाचे संस्काराच्या ) साह्याने साधन सिद्धीच्या विषयात ( परमात्म प्राप्तीसाठी ) पुन्हा ( विशेषतेने ) प्रयत्न करतो.'
' पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोsपि स: |
जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते || गीता अ. ६/४४ || '
' तो ( श्रीमंतांच्या घरी जन्म घेणारा योगभ्रष्ट पुरुष ) भोगांना परवश होऊन देखील त्या पूर्व जन्मात केलेल्या अभ्यासाच्या ( साधनेच्या ) कारणानेच परमात्म्याकडे आकर्षिला जातो, कारण समत्वबुद्धिरूप योगाचा जिज्ञासू सुद्धा वेदांमध्ये सांगितलेल्या सकाम कर्मांच्या फळांना उल्लंघून जातो. '
पूर्वजन्मात केलेल्या साधनेचे जे संस्कार बुद्धीत मुरलेले असतात ते सर्व या जन्मात प्राप्त होत असतात ,
जागृत होत असतात. पूर्वजन्मात केलेल्या अभ्यासामुळे तो या जन्मात परमात्म्याकडे आकर्षिला जातो.याच्या
पाऊलखुणा या जन्मातील बालपणातच स्पष्टपणे दिसू लागतात.
श्रीमहाराजांच्या अगदी कोवळ्या शिशुवायातच त्यांच्या अध्यात्मिक वृत्तीचा प्रत्यय वडिलधार्याना येऊ लागला. या संदर्भात श्रीमहाराजांचे आजोबा आणि वडिलांना त्यांच्याविषयी काय वाटत असे हे सांगणाऱ्या
' श्रीसद्गुरुलीलामृत ' ग्रंथातील खालील ओव्या बोलक्या आहेत.
" यासी बाळ म्हणो नये | बुद्धीने हा वडिल होये | भक्तियुक्त नाम गाये | राम राम म्हणोनी || अ.३ स. २/२१ ||
आमचे घरी कुलदैवत | पंढरीनाथ नेमस्त | परि हा दिसे रामभक्त | पूर्वसंस्कारे || अ.३ स. २/२२ ||
जन्मार्जित तप केले | अथवा रामदूत अवतरले | उपजत ज्ञान कैसे आले | याजपासी || अ.३ स. २/२३ || "
श्रीमहाराजांचे बालपण :-
श्रीमहाराजांचे बाळपणीचे साजिरे गोजिरे रूप पाहून रावजी-गीताबाई तर हरखून गेलेच पण शेजारीपाजारीही त्या रूपाच्या प्रेमात पडले. रावजिंसारखा संसारात विरक्त वृत्तीचा माणूसही बाळाला एकदातरी पाहिल्याशिवाय, जवळ घेतल्याशिवाय घराबाहेर पाऊल टाकत नसे. पाचव्या महिन्यात बाळ रांगू लागले. खाली वस्तू ठेवायची सोय राहिली नाही. देव्हाऱ्यातले देवही जागेवर राहत नव्हते. खाकेत खवला असे बाळ कोणाच्या न कोणाच्या कडेवर असे.
श्रीमहाराजांच्या आई, गीताबाईंना काम करतानाही बाळाला कडेवर घेऊनच फिरावे लागे. त्यांची फारच तारांबळ उडत असे. भजन सुरु झाले,की मात्र बाळाला भजनाचे जागी आजोबांच्याजवळ दिल्यावरच तो शांत असे. आजा -आजींनाही बाळाचा विलक्षण लळा लागला. ते बाळाला प्रेमाने ' गणू ' म्हणत असत. श्रीमहाराज जसजसे मोठे होऊ लागले तसतसे त्यांचे खाणे-पिणे, निजणे-उठणे, स्नान करणे, कपडे घालणे इत्यादी गोष्टी आजोबा आणि आजी मोठ्या लाडाने करत असत.
श्रीमहाराज वयाच्या चौथ्या वर्षी धुळाक्षरे काढायला शिकले. आजोबांच्या पाठोपाठ गीतेतील श्लोक म्हणू लागले. त्यावर चिंतन करू लागले.अर्थ समजून घेऊ लागले.पंतांनी गीतेचा एखादा श्लोक म्हणावयास सांगितला की श्रीमहाराज तो पाठ म्हणून दाखवीत. श्रीमहाराज एकपाठी होते. आजोबांच्या बरोबर जप करू लागले.पंतांच्या बरोबर भजनात दंग होऊन नाचू लागले. या साऱ्याची त्यांना गोडी लागली.बाळगणूची शिशुवयातील तल्लख बुद्धी आणि देवाविषयीची, भजनाची आवड पाहून पंताना वाटे की, हे बालक हि जणू अमृतवल्ली आहे आणि ती पांडुरंगाच्या कृपेने आपल्याला लाभली आहे. बाळगणू हा कोणी योगभ्रष्ट सत्पुरुष असावा असे पंताना वाटत असे.
श्रीमहाराजांची सहाव्या वर्षी मुंज झाली. भटजींकडून संध्या, पुजा, वैश्वदेव, पवमान, रुद्र या सर्व गोष्टी त्यांनी काही महिन्यातच आत्मसात केल्या. जप, ध्यान याविषयी जिज्ञासा निर्माण झाली. अध्यात्मात रुची वाढीला लागली. मुंज झाल्यावर श्रीमहाराजांच्या वृत्तीत विशेष बदल झाला. आजोबांनी सांगितलेल्या भगवंत भक्तांच्या कथाश्रवणाने ते अंतर्मुख होऊ लागले. नदीकाठी एकांतात ध्यानस्थ बसत असत.
श्रीमहाराजांना वयाच्या सातव्या वर्षी अण्णा खर्शीकर मास्तर चालवत असलेल्या शाळेत घातले. अण्णा मास्तरांच्या जवळ असलेली विद्या श्रीमहाराज पाहता पाहता शिकले. शाळेत शिकण्यासारखे काही शिल्लक नाही हे ध्यानी येताच इतर मुलांना बरोबर घेऊन ओढ्यावर जाऊन खेळ खेळू लागले. गावातील सर्व मुलांचे म्होरके अन लाडके झाले. श्रीमहाराजांचे गोड अन प्रेमळ बोल मुले झेलत असत. पोहणे, घोड्यावर बसणे, सूरपारंब्या अशा सर्वच खेळात ते प्रवीण होते. श्रीमहाराजांच्या बरोबर मुले खेळावयास गेल्याने शाळा बंद पडायची वेळ आली. अण्णा मास्तरांनी श्रीमहाराजांची तक्रार लिंगोपंतांच्याकडे केली. श्रीमहाराजांची शाळा येथेच संपली. मुलांबरोबर खेळता खेळता मधून मधून श्रीमहाराज ' श्रीराम,श्रीराम ' असे भजनही करत असत. श्रीमहाराजांच्या संगतीत इतर मुलांच्या वृत्तीतही बदल होत होता. शाळेतही मुलांचे श्रीरामाचे भजन सुरु झाले. या साऱ्याला कंटाळून अण्णामास्तरांनी आपला गाशा गुंडाळला आणि गाव कायमचेच सोडले.
श्रीमहाराजांच्या खोड्या, खेळ, ध्यानधारणा यामुळे आजोबा, गीताबाई धास्तावले. ' आपली
कुलकर्णीपणाची वृत्ती आणि आपले वतन मी नीट सांभाळेन ' असे वचन श्रीमहाराजांनी आईला दिल्यावरच त्या माऊलीला हायसे वाटले. तथापि श्रीमहाराज आणि त्यांच्या मित्रांच्या खोड्या, खेळ चालूच राहिले.
श्रीमहाराज आता नऊ वर्षांचे झाले होते. शाळेत जाणेही बंद झाले होते. श्रीमहाराजांना गुंतवून ठेवण्यासाठी त्यांना रानात गुरे चरायला धाडण्यात आले. गुराख्यांच्या पोरांबरोबर, गोपालांबरोबर रानातही खेळ सुरु झाले. या खेळाचे स्वरूप जरा भिन्न होते. चार दगड मांडत. राम, लक्ष्मण, सीता असे तीन दगड मांडून त्यासमोर एक दगड ठेवत, तो म्हणजे मारुती. त्यांच्याभोवती गोपाळांसह श्रीमहाराज फेर धरून भजन म्हणत नाचू लागत. इकडे गुरांच्याकडे कोणाचे लक्ष नसल्याने ती आजुबाजूच्या शेतात शिरून नासधूस करू लागली. याही तक्रारी पंतांच्याकडे गेल्या. गीताबाईही या रोजच्या कटकटीना कंटाळल्या. श्रीमहाराजांचे रानात जाणेही बंद झाले.
याच काळात लक्षात यावा असा श्रीमहाराजांच्या वृत्तीमध्ये बदल घडत गेला. नदीकाठी, एकांतात ते तासनतास ध्यानस्थ बसू लागले. अंतरात श्रीरामाचे अनुसंधान चालू असे. गावातल्या मारुतीमंदिरात येणाऱ्या साधू, बैरागी, गोसावी, यात्रेकरूना श्रीमहाराज भेटत असत. भगवंताविषयी अनेक प्रश्न विचारीत असत. श्रीमहाराजांचे त्यांच्या उत्तरांनी क्वचितच समाधान होत असे. श्रीमहाराजांना, भगवंताविषयीची तीव्र जिज्ञासा आणि दर्शनाची तळमळ लागली. ' सद्गुरुंवाचून भगवंताचे दर्शन होत नाही आणि त्यासाठीच मी गावोगाव गुरूंच्या शोधार्थ फिरत आहे ' हे एका वृद्ध रामदासींचे उद्गार ऐकल्यापासून सद्गुरूंना शोधण्यासाठी आपल्याला घराबाहेर पडले पाहिजे असा विचार श्रीमहाराज करू लागले.
आपल्या दोन खास बालमित्रांपैकी, एक श्रीमहाराजांचा चुलतभाऊ दामोदर आणि दुसरा वामन म्हासुर्णेकर यांना श्रीमहाराजांचा गुरुशोधार्थ पळून जाण्याचा विचार पसंत पडला. घरात वडीलमंडळीना न सांगता श्रीमहाराज त्या दोघांबरोबर घराबाहेर पडले. मजल दरमजल करीत कोल्हापूरला आले. तेथे अंबाबाईचे दर्शन घेतल्यावर एका धर्मशाळेत राहिले. कोवळे वय, तेज:पुंज, गोरेगोमटे असे श्रीमहाराजांचे रूप पाहून लोक त्या बालब्रह्मचारींच्या दर्शनाला येऊ लागले. त्यांच्यासमोर फळे, फराळ ठेऊ लागले.मात्र श्रीमहाराजांचा चुलतभाऊ दामोदर एक-दोन दिवसातच कंटाळला. घरच्यांची आठवण आल्याने ' घरी जातो ' असे सांगून गोंदवल्यास परत गेला.
इकडे गोंदवल्यास, मुले घरातून गायब झाल्याचे लक्षात येताच,मुलांची शोधाशोध सुरु झाली. गीताबाई हवालदिल झाल्या.त्यांना अन्न गोड लागेना. लिंगोपंतांनी मुलांच्या शोधासाठी चारी दिशांना माणसे पाठवली. आठ-दहा दिवस झाले तरी मुलांचा पत्ता लागेना. बाराव्या दिवशी दामू अचानक घरी आला. त्याच्याकडून मुलांचा ठावठिकाणा, ख्यालीखुशाली समजली. रावजी लगेचच श्रीमहाराजांना आणण्यासाठी कोल्हापूरला निघाले.
कोल्हापुरात श्रीमहाराज व वामन यांची चांगली व्यवस्था लागली खरी पण एक-दोन दिवसातच वामनही कंटाळला आणि श्रीमहाराजांना सांगून तो गोंदवल्यास जाण्यास निघाला. वाटेतच कोल्हापूरच्या वेशीवरच त्याला श्रीमहाराजांचे वडील रावजी भेटले. दोन-तीन दिवसांच्या शोधानंतर श्रीमहाराजांचा ठावठिकाणा सापडला.श्रीमहाराज कोल्हापूर येथील श्रीसिद्धेश्वर नावाच्या राजगुरूंच्या घरी होते. राजगुरुंची अनुज्ञा घेऊन रावजी श्रीमहाराजांसह गोंदवल्यास परतले. श्रीमहाराज दृष्टीला पडताच गीताबाईंचा जीव भांड्यात पडला. बाळगणूला त्यांनी पोटाशी धरले.
गोंदवलेस परत आल्यावर श्रीमहाराजांवर सर्वांची नजर होती. पण श्रीमहाराज बेचैन, अस्वस्थ होते. श्रीमहाराज रामनामस्मरण आणि ध्यानात जास्तीत जास्त वेळ घालवत असत.मौनात राहणे पसंत करीत. बालवयात आलेली ही विरक्त वृत्ती वडीलमंडळींच्या लक्षात आली. ' श्रीमहाराजांचे लग्न केल्यास ते संसारात रमतील ' हा पंतांचा सल्ला रावजी-गीताबाईंना मान्य झाला. लग्नासाठी मुली सांगून येत होत्या. वधू संशोधन सुरु झाले.
श्रीमहाराजांना दहावे वर्ष संपून अकरावे वर्ष लागले होते. खातवळ गावचे कुलकर्णी संभाजी मल्हार गोडसे यांच्या मुलीशी श्रीमहाराजांचा विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. श्रीमहाराजांचा विवाह हा लिंगोपंतांच्या हातचे शेवटचे कार्य ठरले. पंतांची तब्बेत वयोमानामुळे क्षीण झालेली होती. आपला शेवट जवळ आला हे त्यांनी ओळखले. पंतांच्या पत्नी राधाबाई तापाचे निमित्त होऊन वारल्या आणि पुढे चार महिन्यानंतर पंतही स्वर्गवासी झाले.
श्रीमहाराज, आपले आजोबा लिंगोपंत यांच्या छत्रछायेत वाढले.पंतांच्या वागण्याचा श्रीमहाराजांवर प्रभाव होता. अन्नदान, लोकसंग्रह, सर्वांशी प्रेमाची,आपुलकीची वागणूक आणि भगवन्नामस्मरण, भजन हे संस्कार श्रीमहाराजांवर सहजपणे झाले. या साऱ्या संस्कारांना पूर्वजन्मातील संस्कारांची जोड मिळाली असावी आणि म्हणूनच भगवंताच्या अनुसंधानातच श्रीमहाराजांचे उत्तर आयुष्य घडत गेले.
श्रीमहाराजांवर लग्नाचा अपेक्षित परिणाम झाला नाही. ते अधिकच विरक्त झाले. वडील रावजीही वैराग्य वृत्तीने जपतपात मग्न असल्याने श्रीमहाराजांना ध्यानधारणा करण्यास जणू प्रोत्साहनच मिळाले.
ध्यानीमनी सद्गुरूंच्या शोधाची तळमळ लागलेली होती. एकेदिवशी आईला सूचना देऊन श्रीमहाराज एकटेच गुरुशोधार्थ पुन्हा बाहेर पडले. पूर्वसूचना असल्याने आईबापांनी शोधाशोध केली नाही. बारा वर्षांचे कोवळे वय आणि बरोबर संगीसाथी कोणी नाही असे असतानाही श्रीमहाराजांचा अध्यात्मिक कल ध्यानी घेऊन पंढरीनाथावर भार टाकून रावजी-गीताबाई स्वस्थ राहिले.
प्रार्थना :
गुरुराया, रामराया, मारुतीराया, सद्गुरुराया मुखी अखंड रामनाम राहो, सद्गुरूंचे निरंतर स्मरण राहो, शेवटचा श्वासही मुखी रामनाम आणि सद्गुरूंच्या स्मरणात जावो ही श्रीमहाराजांच्या चरणी नम्र प्रार्थना.
|| श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सत्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय.||
|| जय जय रघुवीर समर्थ ||
No comments:
Post a Comment