|| श्रीराम समर्थ ||
|| श्रीसद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज समर्थ ||
योगप्राप्तीसाठी साधना करणाऱ्या साधकाचा योगाभ्यास पूर्णत्वास जाण्यापूर्वीच त्याला मृत्यू आल्यास अथवा असा साधक योगभ्रष्ट झाल्यास त्याचे ( अंतकाळी ज्याचे मन परमात्मप्राप्तीच्या साधनेपासून विचलीत झाले आहे अशा मनुष्याचे ) काय होते ? तो कोणत्या गतीप्रत पोचतो ? अशी अर्जुनाची आशंका आहे.
योगभ्रष्टाच्या संदर्भातील शंकेचे निरसन करताना भगवंत सांगतात :-
श्रीभगवानुवाच
पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते |
न हि कल्याणकृत्कश्चीद्दुर्गतिं तात गच्छति ||गीता अ. ६/४० ||
' हे पृथानंदन ! त्याचा ( शुभ कार्यात युक्त असलेल्याचा ) विनाश या लोकी होत नाही ( आणि ) परलोकीही होत नाही, कारण हे वत्सा ( तात ) ! कल्याणकारी कर्म करणारा कोणताही मनुष्य दुर्गतीला जात नाही.'
' हे पृथानंदन ! त्याचा ( शुभ कार्यात युक्त असलेल्याचा ) विनाश या लोकी होत नाही ( आणि ) परलोकीही होत नाही, कारण हे वत्सा ( तात ) ! कल्याणकारी कर्म करणारा कोणताही मनुष्य दुर्गतीला जात नाही.'
या श्लोकात भगवंतांनी सर्व साधकांना एक निश्चित आश्वासन दिले आहे की, जो कल्याणकारी काम करणारा आहे अर्थात कोणत्याही साधनाने का होईना, शुद्ध अंत:करणातून परमात्मप्राप्तीची इच्छा ठेवतो, अशा कोण्याही साधकाची दुर्गती होत नाही.
प्राप्य पुण्यकृतां लोकानुशित्वा शाश्वती: समा: |
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोsभिजायते || गीता अ. ६/४१ ||
तो योगभ्रष्ट, पुण्य कर्म करणाऱ्यांच्या लोकांना प्राप्त होऊन ( आणि तेथे ) पुष्कळ वर्षांपर्यंत राहून ( मग येथे ) शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंत पुरुषांच्या घरी जन्म घेतो.
अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम |
एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीद्दृशम || गीता अ. ६/४२ ||
अथवा ( वैराग्यवान योगभ्रष्ट ) ज्ञानवान योग्यांच्या कुळातच जन्म घेतो. अशा प्रकारचा जो हा जन्म आहे, ( तो ) नि:संशय फारच दुर्लभ आहे.
श्रीमहाराजांचा जन्मही पुण्यवान परंपरा लाभलेल्या भगवत्प्रेमी परमपवित्र ब्राह्मणवंशी झाला. श्रीमहाराजांनी भगवन्नामस्मरणात उभे आयुष्य वेचले.केवळ मोक्षप्राप्ती हे आत्मकेंद्रित संकुचित ध्येय न ठेवता इतरांनाही त्यांचा उद्धार व्हावा यासाठी भगवन्नामाची दीक्षा दिली. असा जन्म केवळ दुर्लभच नव्हे तर अगम्य, अमोघ आहे.
श्रीमहाराजांचा जन्म :-
श्रीमहाराजांचा जन्मही पुण्यवान परंपरा लाभलेल्या भगवत्प्रेमी परमपवित्र ब्राह्मणवंशी झाला. श्रीमहाराजांनी भगवन्नामस्मरणात उभे आयुष्य वेचले.केवळ मोक्षप्राप्ती हे आत्मकेंद्रित संकुचित ध्येय न ठेवता इतरांनाही त्यांचा उद्धार व्हावा यासाठी भगवन्नामाची दीक्षा दिली. असा जन्म केवळ दुर्लभच नव्हे तर अगम्य, अमोघ आहे.
' श्रीसद्गुरुलीलामृत ' ग्रंथात ग्रंथकाराने खालील श्लोक श्रीमहाराजांच्या पूर्वजन्मासंदर्भात नेमकेपणाने सांगितला आहे.
' पूर्वजन्मी हा साधू | असेल कोणी प्रसिद्धु |
वासनाशेषे जन्मसंबंधु |घडला असेल || अ.३/स.२/६३ ||
आज श्रीमहाराजांच्या जन्मोत्सवाच्या मंगलदिनी श्रीमहाराजांच्या अमृतमयी अगाध चरित्राचे स्मरण आणि चिंतनास प्रारंभ होत आहे. श्रीमहाराजांचा जन्म :-
श्रीमहाराजांचा जन्म माणगंगातिरी वसलेल्या सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडीपासून चार कोसांवर असलेल्या गोंदवले ( बु.) या गावी झाला. श्रीमहाराजांचा जन्म वसिष्ठ गोत्री शुक्ल यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण कुळात ' घुगरदरे ' कुटुंबात झाला. कुलकर्णीपणाची वृत्ती या कुटुंबाने जशी स्विकारली होती तशीच आजापणजापासून चालत आलेली पंढरीची वारी दर शुद्ध एकादशीला नित्यनेमाने घडत होती. पंढरीनाथ हे या कुटुंबाचे कुलदैवत होते.
श्रीमहाराजांचे आजोबा लिंगोपंत भक्तिपंथाचे जसे वारकरी होते तसेच कुलकर्णी वृत्ती उत्तमपणे सांभाळणारे सात्विक कर्तबगार गृहस्थ होते. न्यायदानाचे खटले पंत मोठया कुशलतेने आणि नीतिन्यायाने करीत असत हे सरकारला कळल्यावर सरकारने त्यांना काही जमिनी इनाम दिल्या होत्या. गोंदवले परिसरात ते सर्व लोकांना प्रिय होते. लोक त्यांना आदराने ' लिंगोपंत इनामदार ' असे म्हणत असत.
लिंगोपंतांच्या पत्नी राधाबाई एक सगुणखाणी, पतिव्रताशिरोमणी, गृह्काजदक्ष गृहिणी होत्या. त्यांचा प्रपंच एक आदर्श संसार होता.
प्रात:समयी पांडुरंगाचे नामस्मरण आणि भगवद्गीतेच्या एका अध्यायाचे प्रतिदिनी पठण केल्यावरच लिंगोपंतांचा दिवस सुरु होत असे. दिवस मावळल्यावर हरिपाठ म्हणून झाल्यावर फराळानंतर पंत गावकऱ्यानसमवेत भजनात दंग होऊन जात. पंढरीनाथाचा गजर करताना देहभान विसरून ते नाचू लागत. दर शुद्ध एकादशीची पंढरीची वारी ते नेमाने करीत असत.
वयपरत्वे थकल्याने पंतांना वारी करणे शक्य होईना याची त्यांच्या मनाला रुखरुख लागली. याच विचारात असताना एके रात्री पंढरीनाथ पंतांच्या स्वप्नात आले. आणि मळ्यातील एका जागेचा निर्देश केला. दुसऱ्या दिवशी मळ्यात त्या जागेवर खणल्यावर तेथे विठ्ठल-रखुमाईच्या सुंदर मूर्ती आढळल्या. घराजवळ योग्य जागा पाहून एका शुभ मुहूर्तावर पंतांनी देवाची प्रतिष्ठापना केली.
वयपरत्वे थकल्याने पंतांना वारी करणे शक्य होईना याची त्यांच्या मनाला रुखरुख लागली. याच विचारात असताना एके रात्री पंढरीनाथ पंतांच्या स्वप्नात आले. आणि मळ्यातील एका जागेचा निर्देश केला. दुसऱ्या दिवशी मळ्यात त्या जागेवर खणल्यावर तेथे विठ्ठल-रखुमाईच्या सुंदर मूर्ती आढळल्या. घराजवळ योग्य जागा पाहून एका शुभ मुहूर्तावर पंतांनी देवाची प्रतिष्ठापना केली.
लिंगोपंत-राधाबाई या भगवतपरायण दांपत्याला शोभेल असा एक मुलगा त्यांना झाला. त्याचे नाव ' रावजी ' असे ठेवले.रावजींच्या वयाच्या बाराव्या वर्षी पंतांनी त्यांचे लग्न सातारा जिल्ह्यातील कलेढोण येथील नारायणराव वाघमारे इनामदार यांच्या मुलीशी लाऊन दिले. रावजींच्या पत्नीचे नाव गीताबाई असे ठेवले. कुलकर्णीपणाची विद्या-वृत्ती-व्यवहार पंतांनी रावजीना शिकविला, पण त्यांचे मन त्यात रमत नसे. रावजी एकांतात बसून देवाची पुजाअर्चा, नामस्मरण व ध्यानधारणेत आपला काळ व्यतीत करत असत. रावजी गंभीर, अबोल व एकांतप्रिय होते. प्रापंचिक बाबीत ते उदासीन होते. पंतांनी वाढविलेला प्रपंचाचा
व्याप,कुलकर्णीपणाची वृत्ती याकडे रावजींचे दुर्लक्ष झाले. परिणामी प्रापंचिक ऐश्वर्यास दृष्ट लागली. रावजी सरळ मनाचे, साधे, वैराग्यावृत्तीचे गृहस्थ होते. अंतर्यामी ते अती विरक्त व नेहमी एकांतात पंढरीनाथाच्या नामस्मरणात गुंतलेले असत. रावजींच्या पत्नी सौ. गीताबाई यांचे वय लग्नात ७-८ वर्षांचे होते. पण लग्नानंतर ५-६ वर्षातच प्रपंचाची जबाबदारी त्यांचेवर पडली. आपल्या प्रेमळ आणि कष्टाळू वृत्तीने गीताबाईंनी सासुसासऱ्यांची मर्जी संपादन केली. पाहुणेमंडळींचा पाहुणचार, नोकरचाकरांवर लक्ष,गुराढोरांची काळजी या सर्व गोष्टी गीताबाई जातीने करत असत. रावजींचे प्रपंचात फारसे लक्ष नसल्यामुळे तसेच पंतांचे वय झालेले असल्याने आर्थिक व्यवहारही गीताबाईंना पाहावे लागत. सासू राधाबाईंप्रमाणे गीताबाई परोपकारी, उदार, अडल्या-नडलेल्यांना मदत करणाऱ्या, मदतीला धाऊन जाणाऱ्या होत्या. गावातल्या लोकांचीही त्यांच्यावर श्रद्धा होती. गीताबाईंच्या माहेरी रामाची उपासना होत असे.समर्थांवर त्या मंडळींची निष्ठा होती. गीताबाईही नित्य नेमाने रामनामाचा जप करीत. दासबोधाचे पारायण करीत. श्रीसमर्थ रामदास हे त्यांचे श्रद्धास्थान होते. त्यांच्यासाठी कोणी काही करण्याची इच्छा व्यक्त केली की, त्याचेकडून गीताबाई रामनामाचा जप करण्याचे आश्वासन घेत असत. गीताबाई कर्तव्यतत्पर, प्रेमळ, कष्टाळू, भगवतप्रेमी अशा सत्वशील होत्या.
रावजी प्रपंचात असूनही वैराग्य वृत्तीने स्नानसंध्या,गायत्रीजप आणि नामस्मरणात आपला काळ व्यतीत करत होते.तर सौ. गीताबाई प्रपंच नेटकेपणाने सांभाळत होत्या; पण त्याबरोबरच रामनामजप, दासबोधाचे वाचन, परोपकार यात व्यस्त होत्या. अशा अत्यंत शुद्ध सात्विक आचरण असणाऱ्या, परमार्थात विशेष रुची असणाऱ्या रावजी-गीताबाई या भगवतपरायण परमपवित्र दांपत्याच्या घरात श्रीमहाराजांचा जन्म झाला.
रावजी प्रपंचात असूनही वैराग्य वृत्तीने स्नानसंध्या,गायत्रीजप आणि नामस्मरणात आपला काळ व्यतीत करत होते.तर सौ. गीताबाई प्रपंच नेटकेपणाने सांभाळत होत्या; पण त्याबरोबरच रामनामजप, दासबोधाचे वाचन, परोपकार यात व्यस्त होत्या. अशा अत्यंत शुद्ध सात्विक आचरण असणाऱ्या, परमार्थात विशेष रुची असणाऱ्या रावजी-गीताबाई या भगवतपरायण परमपवित्र दांपत्याच्या घरात श्रीमहाराजांचा जन्म झाला.
गोंदवलेपासून जवळच असणाऱ्या गावी संभाजी नावाचे एक सत्पुरुष होते.त्यांचे मौन व्रत असे. रावजी आणि गीताबाई त्यांच्या दर्शनाला गेले असता या सत्पुरुषाने प्रसादस्वरूप एक नारळ त्या दोघांना दिला आणि आशीर्वाद देत म्हणाले " परमात्मा तुमचे कल्याण करील, तुम्ही दोघे त्याचे नामस्मरण करा ! "
काही काळ गेल्यानंतर गीताबाईंना दिवस गेले. त्यानंतर त्यांच्या वृत्तीमध्ये सहज लक्षात येईल असा बदल होत होता. डोहाळे लागले तेचमुळी अखंड नामजपात राहण्याचे. ' श्रीराम, श्रीराम ' असे म्हणतच दिवस पुढे सरकत होते, ' दासबोधाचे श्रवण करावे ' ही सुनबाईंची इच्छा पंतांनी म्हासुर्णेकरशास्त्रींच्या विठ्ठल मंदिरातील दासबोधाच्या परायण, प्रवचनाने पूर्ण केली. गीताबाई समर्थांच्या दर्शनालाही जाऊन आल्या. त्यांची वृत्ती नेहमी उल्हसित, आनंदी, प्रसन्न राहू लागली. चेहऱ्यावर एक आगळेच तेज प्रकटले. रामनामाचा अखंड जप आणि मारुतीरायांचे ध्यान यात गीताबाई सदैव रत असत. बाळंतपण गोंदवल्यासच करावयाचे ठरल्यावर गीताबाईंच्या वडिलांस व मातुश्रीस पाचारण केले. आठवा महिना सरताना एके दिवशी सायंकाळी एक तेजस्वी बैरागी पंतांच्याकडे रात्रीच्या मुक्कामास आला. गीताबाईंनी त्यांना नमस्कार केला तेव्हा त्यांच्याकडे पाहून त्या साधूच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो उद्गारला " मेरे लाला ! तू यहा है ! तेरे दर्शनसे माई धन्य हुआ हुं ! "
याच सुमारास रावजींच्या स्वप्नात पंढरीनाथ प्रकटले. आशीर्वाद दिला " तुम्हाला पुत्ररत्न होईल. तो महावैष्णव भगवद्भक्त, सिद्ध पुरुष असेल. त्याची दिगंत कीर्ती होईल." हा दृष्टांत रावजीनी पत्नीस निवेदन केला. उभयतांना खूप आनंद झाला. गीताबाईंचे दिवस भरले. माघ महिन्यातील शुद्ध एकादशी आली. दर एकादशीला होते त्या प्रमाणे पांडुरंगाची षोडशोपचारे पुजा झाली. तीर्थ सर्वांना देण्यात आले. सर्वांचा फराळ झाला. गीताबाईंच्या सांगण्यावरून तिन्हीसांज टळल्यावर सुईण बोलावून आणली. बाहेर एकादशीचे भजन सुरु झाले. गीताबाईंनी तीर्थ घेतले. थोडा फलाहार केला अन अंथरुणाला अंग टेकले. बाहेर तालासुरात मंडळी भजनात दंग होती.भजनाचा गजर चालू होता. गीताबाईंचा रामनामाचा जप सुरु होता. उशापायथ्याशी सासुबाई आणि मातुश्री चिंतित होत्या. गीताबाई मोठया धीराच्या ! रामनामाचा जप करा असे इतरांना सांगत, प्रसुती वेदना सहन करत रामनाम घेत होत्या. पहाट केव्हा झाली याचे भान कोणालाच नव्हते. भजन संपून पांडुरंगाची आरती सुरु झाली.सूर्योदयाचा सुमार असेल.जन्म समय झाला.गीताबाई प्रसूत झाल्या. पूर्वपुण्ये सुपुत्र लाभला.श्रीमहाराजांचा जन्म झाला. सिद्ध पुरुष चैतन्यसूर्य भूतलावर अवतरताच सूर्यनारायणही लगबगीने आपल्या किरणस्पर्शाने श्रीमहाराजांचे दर्शन घेता झाला. मुलगा झाल्याची वार्ता बाहेर येताच भजनीमंडळीत आनंद पसरला. पंतांच्या आनंदाला पारावार उरला नाही. रावजींनाही स्वप्नातील दृष्टांत स्मरून सिद्धपुरुष घरी आल्याने; धन्यता वाटली. पांडुरंगावर फुले उधळण्यात आली. माघ शुद्ध द्वादशीला बुधवारी शके १७७६ या शुभदिनी शुभमुहूर्तावर श्रीमहाराजांचा जन्म झाला.
पंतांना नातू झाला, ही वार्ता गावभर पसरली. गावात घरोघरी साखर वाटण्यात आली. बाळाला पहायला गाव लोटला. पंतांनी ज्योतिषाकडून बाळाची कुंडली मांडली. वैदिक ब्राह्मणवृन्दाकडून वेदोक्त मंत्रांनी बाळासाठी आशीर्वाद घेतले. पंतांना जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटले. श्रीमहाराजांचा जन्म हा पंतांसाठी वृद्धापकाळात लाभलेला एक अपूर्व असा आनंदाचा परमोच्च क्षण होता.
श्रीमहाराजांचे बारसे मोठया थाटात झाले.अपूर्व सोहळा झाला. आनंदाचा सुकाळ जाहला. वेदमुर्तींचा आदरसत्कार यथायोग्य दक्षिणा देऊन केला. खणानारळांनी सुवासिनींच्या ओटया भरल्या. सुपुत्र झाल्याची आनंदवार्ता सर्वांना कळवल्याने मोठा स्नेहसमुदाय जमला होता. बारशाचा मोठा समारंभ केला. बाळाला वाळे, बिंदल्या आदी भूषणे घालण्यात आली. सुवासिनी पाळण्याखालून बाळाला देताना ' कोणी गोविंद घ्याहो, कोणी गोपाळ घ्याहो ' म्हणत होत्या. सुंठवडा वाटला, घुगऱ्या, पेढे, साखर वाटण्यात आली. गणेश नामाचा गजर झाला. सर्व संमतीने बाळाचे नाव ' गणपती ' असे ठेवण्यात आले. बाळाला पाळण्यात ठेवण्यात आले. बाळ गणपतीच्या दर्शनाने उपस्थित सर्वांच्या चित्तात आनंद मावेना.
श्रीमहाराज जन्मल्यापासूनच गुटगुटीत, गोंडस, गौरकाय होते. त्यांच्या गोरेपणात पिवळसर झांक होती. सुरेख नाक, तेज:पुंज डोळे, भव्य कपाळ, प्रसन्न मुद्रा आणि काळेकेसांचे जावळ अशा या सुबक, सुंदर मूर्तीचे वर्णन शब्दात कसे करावे बरे ? साक्षात रामरायाच बालरूपात प्रकट झाले होते. निर्गुणरूप, सगुणब्रह्म स्वरुपात अवतरले होते. धन्य ते माता-पिता ! धन्य ते गोंदवले ग्रामवासी !
श्रीमहाराज जन्मल्यापासूनच गुटगुटीत, गोंडस, गौरकाय होते. त्यांच्या गोरेपणात पिवळसर झांक होती. सुरेख नाक, तेज:पुंज डोळे, भव्य कपाळ, प्रसन्न मुद्रा आणि काळेकेसांचे जावळ अशा या सुबक, सुंदर मूर्तीचे वर्णन शब्दात कसे करावे बरे ? साक्षात रामरायाच बालरूपात प्रकट झाले होते. निर्गुणरूप, सगुणब्रह्म स्वरुपात अवतरले होते. धन्य ते माता-पिता ! धन्य ते गोंदवले ग्रामवासी !
प्रार्थना :
गुरुराया, रामराया, मारुतीराया, सद्गुरुराया मुखी अखंड रामनाम राहो, सद्गुरूंचे निरंतर स्मरण राहो, शेवटचा श्वासही मुखी रामनाम आणि सद्गुरूंच्या स्मरणात जावो ही श्रीमहाराजांच्या चरणी नम्र प्रार्थना.
|| श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सत्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय ||
|| जय जय रघुवीर समर्थ ||

No comments:
Post a Comment