|| श्रीराम समर्थ ||
|| श्रीसद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज समर्थ ||
भगवंतानी आपल्या अवतारांचे प्रयोजन आणि त्रिविध हेतू ज्या दोन महान श्लोकात उलगडून सांगितले आहेत ते गीतेतील सर्वाधिक प्रसिद्ध श्लोक असे आहेत:
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत |
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम || अ ४/७ ||
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम |
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे || अ ४/८ ||
' हे भरतवंशी अर्जुना ! जेव्हा जेव्हा धर्माची हानी आणि अधर्माची वृद्धी होते तेव्हा-तेव्हाच मी आपण-आपल्याला ( साकाररूपाने ) प्रकट करतो साधूंचे ( भक्तांचे ) रक्षण करण्यासाठी ,पाप कर्म; दुष्ट कर्म करणाऱ्यांचा विनाश करण्यासाठी आणि धर्माची चांगल्याप्रकारे स्थापना करण्यासाठी ( मी ) युगा-युगात प्रकट होत असतो.'
भगवतप्रेमी, धर्मात्मा, सदाचारी, निरपराध आणि निर्बल मनुष्यावर नास्तिक, पापी, दुराचारी आणि बलवान मनुष्यांचा अत्याचार वाढणे तसेच लोकांमध्ये सद्गुण सदचारांची आत्यंतिक उणीव आणि दुर्गुण दुराचारांची आत्यंतिक वाढ होते तेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्माची वृद्धी होत असते.
लोकांची सांसारिक भोग आणि संग्रहामध्ये जसजशी आसक्ती वाढत जाते, तसतसा समाजात अधर्म वाढतो आणि जसजसा अधर्म वाढतो तसतसे समाजामध्ये पापाचरण, कलह, विद्रोह इत्यादी दोष वाढतात. धर्माची हानी आणि अधर्माची वृद्धी झाल्यास लोकांची प्रवृत्ती अधर्मामध्ये होते. अधर्मामध्ये प्रवृत्ती झाल्याने स्वाभाविक पतन होते. भगवान प्राणिमात्रांचे सुहृद आहेत. म्हणून लोकांचे पतन थांबवण्यासाठी ते स्वत: अवतार धारण करतात. म्हणून भगवंताच्या अवतार घेण्याचे प्रयोजन धर्माची स्थापना करणे आणि अधर्माचा नाश करणे हे आहे.
राजस आणि तामस गुणांचे प्राबल्य वाढते आणि परिणामी अधर्माची वृद्धी होते. समाज भयभीत, विस्कळीत आणि दिशाहीन होतो. समाजाचा तोल ढासळतो. आणि म्हणूनच सत्त्व गुणाचा परिपोष होईल,तिन्ही गुणांचा समतोल राहील आणि सन्मार्गाची, धर्माची पुनर्स्थापना होईल यासाठी भगवंत स्वत: अवतीर्ण होतात.
भगवंताच्या सहवासात राहूनही ज्यांची वृत्ती पालटत नाही अशा दुर्जनांचा विनाश करणे हा एकच पर्याय साधूंचे रक्षण करण्यासाठी भगवंत निवडतात आणि त्यामुळे धर्माची चांगल्याप्रकारे संस्थापना होते आणि साधूंसह सर्व प्राणिमात्रांचे कल्याण होते.
दुर्योधन,शिशुपाल, जरासंध,कंस हे सारे श्रीकृष्णाच्या सहवासात आले पण यांची दुष्टवृत्ती पालटली नाही आणि म्हणून भगवंताला या नराधमांचा नाश करावा लागला. सदधर्माची स्थापना करण्यासाठी श्रीरामांनी रावणाला कंठस्नान घातले.
वर्तमानकाळातही धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वृद्धी होत आहे. असे असतानाही भगवंत स्वत: अवतार न घेता भगवंताच्या आज्ञेने संत, महात्मा, साधक पुरुष पृथ्वीवर अवतरतात आणि शतकानुशतके टिकेल असे कार्य त्यांच्याकडून होते आणि धर्माची संस्थापना होत राहते.
वाट चुकलेल्यांना सन्मार्गावर आणण्यासाठी, तिन्ही गुणांचा योग्य समतोल राखण्यासाठी सत्त्वशील पुरुषांच्या रूपाने भगवंत पुन:पुन्हा अवतार घेतात.
या संदर्भात श्रीरामकृष्ण परमहंस सांगतात:-
"ज्याप्रमाणे सम्राट आपल्या अधिपत्याखाली असलेल्या प्रदेशातील बेबंदशाही आणि अव्यवस्थेने माजलेली बंडाळी मोडून काढण्याकरिता आपला विशेष प्रतिनिधी पाठवितो त्याप्रमाणे भगवंत आपला विशेष दूत सर्वाधिकार देऊन अवतारी पुरुषाच्या रूपाने समाजात पाठवतो. अन्याय, अनीती, दुष्टपणा व बेबंदशाही यामुळे वाढलेले अधर्माचे प्राबल्य आणि त्यामुळे विस्कटलेली धर्माची घडी हा अवतारी पुरुष पुन: नीट बसवून देतो आणि भगवंताने निर्माण केलेल्या जगाची सुस्थिती आणि कल्याणकारी धर्माची संस्थापना करतो."
भगवंतानी दुष्टांचा विनाश करण्याची शक्ती स्वत:जवळ राखून एक अलौकिक, अदभूत अशी प्रेमभक्तीची शक्ती प्रदान करून या युगात पृथ्वीवर महापुरुषांची, संत-साधू-महात्म्यांचीएक सत्त्वशील परंपरा कायम केली आहे. धर्म शब्दाचा प्रचलित अर्थ ध्यानी घेतला तरी अशी संतांची परंपरा सर्व धर्मात स्थळ, काळ, परिस्थितीच्या मर्यादांना ओलांडून सर्वत्र पहावयास मिळते.
या महान संत परंपरेतच श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे नामावतार धारण करून प्रकट झाले.
सध्या जगात एवढे पाप वाढले आहे, तरी भगवंत अवतार घेत नाही, याचे कारण काय ? या प्रश्नाला उत्तर देताना श्रीमहाराज सांगतात;-
" सुष्टांचे रक्षण व दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवंत अवतार घेत असतो. दुष्टांपासून ज्याचे रक्षण करावयास हवे असे सुष्टच आता जगात पहावयास मिळत नाहीत, तर मग भगवंत अवतार कसा घेणार ? रावण, कंस वगैरे व्यक्ती फार जबरदस्त व साक्षात अहंकाराच्या मूर्तीच होत्या. अशा व्यक्तींच्या नाशाकरिता भगवंताला अवतार घेणे जरूर होते. पण आपण लोक रावण, कंसाइतके जबर नाही.आपला अहंकार आपल्यासारखाच मामुली, पण आपला नाश करण्याला पुरेसा आहे. तेव्हा आपल्यासारख्यान्करता भगवंताने आपले नाव ठेवले आहे. नाम हे सूक्ष्म आहे व शेतातील हरळीसारखा फार खोल गेलेला व सूक्ष्म असा असलेला आपल्या ठिकाणचा अहंकार नाहीसा करण्यास भगवंताचे नाव समर्थ आहे. तेव्हा हाच भगवंताचा नामावतार समजावा व सर्वांनी नामस्मरण करावे व शरण्बुद्धीने राहावे."
श्रीमहाराज सांगतात " संतांच्या मनात दुष्टांचा देखील नाश व्हावा बुद्धीच नसते.श्रीज्ञानेश्वरांनी देवापाशी मागितले काय ? ' खळांची व्यंकटी जावो ' असे म्हटले, त्याचा नाश व्हावा असे न मागता, त्यांच्या दुष्ट बुद्धीचा नाश व्हावा हे मागितले."
साधकाचा प्रश्न होता ' आम्ही आपणाकडून काय शिकावे, काय मिळवावे ?'
श्रीमहाराजांनी सांगितले " माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही. माझ्यातले प्रेम काढले तर मग ' मी ' नाहीच.म्हणूनच तुम्ही माझ्यापासून जनप्रियत्व शिका.कारण जो लोकांना आवडतो तो भगवंताला आवडतो. जो भगवंताच्या ईच्छेने वागेल त्यालाच जनप्रियत्व येईल.आपण आपल्यासाठी जे करतो ते सगळ्यांसाठी करणे, हे भगवंताला आवडते. प्रत्येकाला आपण हवेसे वाटले पाहिजे. त्यासाठी कुणाचे अंत:कारण दुखवू नका."
" मी अत्यंत समाधानी आहे, तसे तुम्ही समाधानी रहा. यासाठी आपण काळजी करायची नाही, व त्यासाठी, परमात्मा सर्व करतो, ही भावना ठेवायला शिकावे. "
" माझ्याजवळ जे आहे ते तुम्हाला व्यावहारिक जगात कुठेही मिळायचे नाही. ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम."
नाम आणि नाम आणि नामच ही श्रीमहाराजांची ओळख आहे.श्रीमहाराजांना नामात शोधायचे, नामात पहायचे आणि आपणही नामात रंगून जायचं हेच या संतचरित्राचे विशेष आहे.
उपरिनिर्दिष्ट गीतेतील दोन श्लोक हे दीपस्तंभासारखे आश्वासक आहेत. या भवसागरातून तरुन जाण्यासाठी श्रीमदभगवद्गीतेच्या प्रकाशात श्रीमहाराजांच्या चरित्राचे पुनरावलोकन करण्यास सुरुवात करीत आहे.
|| जय जय रघुवीर समर्थ ||

हा ब्लॊग जिवंत ठेवा व अधिकाधिक लिखाण यावर प्रकाशित करा ही विनंती!!
ReplyDelete