Thursday, December 30, 2010

श्रीमहाराज ' नामावतार ' -१

|| श्रीराम समर्थ ||
|| श्रीसद्गुरु  ब्रह्मचैतन्य महाराज समर्थ || 

श्रीकृष्णभगवान अर्जुनाला सांगत आहेत :
जन्म कर्म  च में दिव्यमेवं यो वेत्ति तत्वत:|
              त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोsअर्जुन ||अ.४/९||
'हे अर्जुना, माझा  जन्म आणि कर्म हे दिव्य अर्थात अलौकिक आहे असे जो तत्वत: जाणतो तो शरीराचा त्याग केल्यानंतर जन्म पावत नाही  (तर) मला (च) येऊन  मिळतो.


       श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा  जन्म आणि कर्म हे दिव्य अर्थात अलौकिक आहे. श्रीमहाराजांच्यावरील  अनन्य  श्रद्धेने  भगवन्नामाचे स्मरण करत असताना ज्या क्षणी स्वत:ला विसराल त्या क्षणी मुक्ति मिळेल  अर्थात जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता लाभेल.
       श्रीमहाराजांच्या  पोथीचे  पठण करताना, श्रीमहाराजांचे चरित्र वाचत असताना, श्रीमहाराजांची प्रवचने समजुन घेताना तसेच श्रीमहाराजानी साधकांच्या शंका निरसन करताना सहज पण उत्कटतेने सांगितलेले विचार पाहताना श्रीमहाराज हे अवतारी पुरुष होते याचा प्रत्यय येतो.
       श्रीमहाराजांचे सतशिष्य श्रीब्रह्मानंद महाराज यांची धारणाही अशीच होती: " पंढरपूरचा पांडुरंग दगड़ नाही आणि श्रीमहाराज माणुस नाहीत.ते प्रत्यक्ष राम आहेत.श्रीमहाराज म्हणजे दयासिन्धु! "
       श्रीमहाराज हे प्रत्यक्ष देव आहेत अशी श्रीब्रह्मानंद  महाराजांची श्रद्धा होती. एका प्रसंगी ते सांगतात  " महाराज प्रत्यक्ष रामच आहेत. रामाची करण्यापेक्षा श्रीमहाराजांचीच मानसपूजा करीत जा."
      श्रीमहाराज स्वत:बद्दल सांगतात " मला तुम्ही साडेतीन  हात देह समजता, हे आधी खरे नाही. मी नाही अशी जागाच नाही. मी इथे नाही, मी तिथे नाही. मी जात नाही. मी फक्त एका नामातच आहे, नामाच्या आसपास मी घोटाळत  राहतो. ज्याच्या मुखी नाम आहे त्याच्या ह्रीदयामध्ये माझी वसती आहे. तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदासर्वकाळ माझ्या संगतीचा लाभ घडेल. "
      श्रीमहाराज एका प्रश्नाच्या उत्तरात,  सांगतात " आमचा आपला 'सहजयोग' आहे.'मी'च्या जागी भगवंत विराजमान झाला की जीवन ही साधना बनते, राम कर्ता ही भावना होते. मग माझ्या डोळ्यांनी भगवंत पाहतो,  माझ्या कानांनी तो ऐकतो, माझ्या तोंडाने तो खातो व बोलतो, नव्हे , माझे अंतरंग व बहिरंग भगवंताने भरून जाते. या चालत्या बोलत्या समाधीला सहजयोग म्हणतात. तो साधण्यासाठी भगवंताला शोधायला जावे लागत नाही. खरे म्हणजे मी आज आहे तो भगवंताने निर्माण केला आहे. माझ्यामध्येच त्याचे वास्तव्य आहे, पण त्याला पाहण्याची दृष्टी मला आली पाहिजे. ती दृष्टी आली की घरबसल्या मला त्याचे दर्शन होईल. ती दृष्टी नामाने विनासायास येते असा माझा नव्हे , सर्व संतांचा अनुभव आहे, म्हणून नामाने हा योग साधावा. "
     श्रीमदभगवद्गीतेचे मर्म सांगताना महाराज म्हणतात " भगवंताच्या ईच्छेने सर्व घडते आहे ही भावना ठेवून आपले कर्तव्य करणे हे गीतेचे सार आहे "
     " कर्तव्याची असावी जागृती  | त्यात ठेवावी भगवंताची स्मृती | तेथे होईल समाधानाची प्राप्ती || हे कायम लक्षात ठेवावे. हे माझे निश्चित मत आहे "
     श्रीमहाराजांनी गीतेतील तत्वज्ञान प्रत्यक्ष आचरणात आणले. गीतेतील तत्वज्ञान श्रीमहाराजांच्या प्रवचनातून, व्यवहार व आचार, विचारातून, नव्हे समग्र चरित्रातून प्रकट होते. श्रीमहाराजांविषयीचे विविध ग्रंथ वाचत असताना हे प्रकर्षाने जाणवले. गीतेतील तत्वज्ञान हे कांही मोजक्या विद्वानासाठी, पंडितांसाठी, आचार्यांसाठी आहे हा भ्रम श्रीमहाराजांचा जीवनपट अवलोकन केल्यास दूर व्हावा. श्रीमहाराजांनी पदोपदी जे विचार सहज म्हणून प्रगट केले आहेत त्यातून ते एखादा गीतेतील संदेशच सांगत आहेत असे जाणवले. आणि म्हणून श्रीमदभगवद्गीता आणि श्रीमहाराजांचे चरित्र यांचे सम्यक अवलोकन करण्याचा हा प्रयत्न आहे.
     एक अपूर्व योग जुळून आला. गोंदवले, गोंदवलेकर महाराज यांच्याविषयी काहीही माहिती नसताना सोबत म्हणून गोंदवले क्षेत्री जाण्याचा योग आला. श्रीमहाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गोंदवलेचा  परिसर, समाधीस्थान, राममंदिर आणि श्रीमहाराजांवरील  प्रेमाने भारलेल्या साधकांच्या मेळाव्यात मला एक अपूर्व समाधान, आनंद आणि प्रसन्नता लाभली आणि श्रीमहाराजांनी मला जवळ केले. त्या दिवसापासून आजअखेर मी श्रीमहाराजांच्या कृपाछत्राखाली असल्याचे ध्यानी आले. जिज्ञासा व उत्सुकतेपोटी श्रीमहाराजांविषयीचे ग्रंथ वाचले. श्रीमदभगवदगीताही नित्य पठणात होती. श्रीमहाराजांच्या कृपेने आणि प्रेरणेने जे विचार स्फुरले ते 'चैतन्यस्पर्श ' या शीर्षकाने प्रसारित करीत आहे. श्रीमदभगवद्गीतेतील तत्वज्ञान सर्वांसाठी आहे. भगवंत कर्ता आहे, ' निरंतर,  निरपेक्ष नामस्मरण व्हावे ' हा श्रीमहाराजांचा संदेश मनी ठसावा हाच या विवेचनाचा हेतू आहे.
     श्रीमहाराजांच्या परिवारात सहज म्हणून जरी प्रवेश झाला तरी त्या 'चैतन्यस्पर्शाने' जीवन आनंदी व समाधानी होईल अशी श्रद्धा आहे. श्रीमहाराजांनी ' संत म्हणजे काय? 'या प्रश्नाच्या उत्तरात जे सांगितले तसाच अनुभव येईल. श्रीमहाराज सांगतात " जेथे सगुणाची अखंड उपासना चालते, आल्यागेल्याला प्रेमाने अन्न दिले जाते आणि मनापासून नामस्मरण केले जाते, तेथे संत जागृत आहे असे समजावे. ज्याच्या सहवासामध्ये आपले मन समाधान पावते व अकारण प्रसन्नता येते तो संत होय. "
     श्रीमहाराजांचे अस्तित्व कोठे आहे हे सांगताना श्रीमहाराजांनी नामधारकाला, साधकाला जे अश्वासन दिले आहे त्याला मी   ' चैतन्यस्पर्श ' संबोधले आहे.
     श्रीमहाराजांचे अश्वासन :  " गोंदवल्यास मी आहे. जेथे मारुतीचे स्थान आहे तेथे मी आहे. मी स्थापन केलेल्या मंदिरात मी आहे. जेथे रोज आरती होते व नामस्मरण घडते तेथे मी आहे. जेथे नि:स्वार्थी प्रेम आहे तेथे मी आहे. जेथे अन्नदान आहे तेथे मी आहे. "
     आज जवळपास शंभर वर्षांचा काळ लोटला तरी श्रीमहाराजांच्या 'चैतन्यस्पर्श' चरित्राने,अमृतवाणीने अनेकांचे जीवन प्रफुल्लीत होत आहे,प्रसन्न व आनंदी होत आहे,समाधानी होत आहे.
     श्रीमहाराजांचे चरित्र नामात साठविलेले आहे. भगवंताच्या नामस्मरणातच श्रीमहाराज आहेत. नामात एकरूप झाल्याने श्रीमहाराज हे ' नामावतार ' आहेत.
श्रीमहाराजांचे चरित्र खालील श्लोकात सामावलेले आहे. 
' जयाचा जनी जन्म नामार्थ झाला |
जयाने सदा वास नामात केला |
जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती |
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती ||
     ' श्रीसद्गुरुलीलामृत ', ' श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वांग्मय  ', ' श्रीसमर्थ सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रवचने ', ' सहज बोलणे हितउपदेश ', ' अमृतवाणी ', हे ते पाच ग्रंथ साधकांसाठी पंचप्राणासारखे आहेत.हे ग्रंथच माझ्या विवेचनाचा आधार आहे.या खेरीज 'श्रीमहाराजांची पत्रे','श्रीब्रह्मचैतन्य गाथा','श्रीमहाराजांच्या आठवणी' या ग्रंथांचेही वाचन यासाठी केले आहे.या उल्लेखित सर्व ग्रंथकारांचे ऋण मान्य करून त्यांना वंदन करूनच हे विवेचन करत आहे.
प्रार्थना : 
गुरुराया, रामराया,  मारुतीराया, सद्गुरुराया मुखी अखंड रामनाम राहो, सद्गुरूंचे निरंतर स्मरण राहो, शेवटचा   श्वासही मुखी  रामनाम आणि सद्गुरूंच्या स्मरणात जावो ही श्रीमहाराजांच्या चरणी नम्र प्रार्थना.
|| श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सत्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय.||


|| जय जय रघुवीर समर्थ ||   
                


1 comment:

  1. छान उपक्रम आहे हा. श्रीमहाराजांनी जवळ करणं हे भाग्यच आहे.

    ReplyDelete