-

|| श्रीराम समर्थ ||
|| श्रीसद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज समर्थ ||
भगवंत या श्लोकात आपली अर्थात सगुण-साकाराची सुगमतेने होणारी प्राप्ती सांगतात. -
अनन्यचेता: सततं यो मां स्मरति नित्यश: |
तस्याहं सुलभ:पार्थ नित्ययुक्तस्य योगीन: || गीता अ. ८-१४ ||
हे पृथानंदन ! अनन्यचित्ताचा जो मनुष्य माझे नित्य-निरंतर स्मरण करतो त्या नित्य-निरंतर माझ्यात लागलेल्या योग्यासाठी मी सुलभ आहे अर्थात त्याला सुलभतेने प्राप्त होतो.
ईश्वरप्रणिधान करणाऱ्या योग्याची सतत ( निरंतर ), नित्यश: (यावज्जीवन ) अनन्यचित्त (अव्यभिचारी भाव ) आणि नित्ययुक्त ( सततानुसंधान ) अशी चार वैशिष्ट्ये भगवंतांनी या श्लोकात सांगितली आहेत.
श्रीमहाराजांनी अनन्यचित्ताने श्रीरामरायाचे नित्य- निरंतर नामस्मरण केले. रामनामासाठी उभे आयुष्य वेचले. सदैव रामरायाच्या सततानुसंधानात राहत इतरांनाही नाममार्गाचे महात्म्य सांगत सन्मार्गाला लावले.
श्रीमहाराजांच्या आयुष्यातील अखेर - अखेरच्या दिवसातील धावपळीचा वेध आपण घेत आहोत.
अखेर - अखेरचे दिवस -
वयाच्या ६५व्या वर्षी सन १९०९ साली औंध संस्थानात नेमलेल्या सरकारी प्रशासक जेकबने श्रीमहाराजांना विष घालण्याचे नीच कारस्थान रचले. जेकबच्या हस्तकाने श्रीमहाराजांना जेवणाचे आमंत्रण दिले. त्यानुसार श्रीमहाराज जेवायला गेले. त्या माणसाने त्यांना अन्नामध्ये सोमल मिसळून खायला घातला. रामकृपेने श्रीमहाराजांचे प्राण वाचले पण या प्रसंगानंतर त्यांना दम्याचा विकार जडला आणि तो शेवटपर्यंत राहिला. सन १९१० साली श्रीमहाराजांना प्लेग झाला.
विषप्रयोग, त्यातून उद्भवलेला दमा, आणि प्लेगच्या साथीत प्लेग अशा अंगावरच्या आघातांमुळे श्रीमहाराज खूपच अशक्त, विकल झाले पण त्यांचे नित्याचे व्यवहार थांबले नाहीत. त्यांचे कार्यक्रम व्यवस्थित चालू होते. अविरतपणे त्यांचा प्रवासही चालू होता. सन १९१० साली सर भालचंद्र भाटवडेकर यांच्या निमंत्रणावरून श्रीमहाराज काही मंडळींना बरोबर घेऊन मुंबईला गेले. मुंबईहून परत आल्यावर त्याच साली पुष्कळ मंडळी बरोबर घेऊन ते हुबळीला सावकार चिदंबर नाईक यांनी बांधलेल्या मंदिरात रामाच्या स्थापनेसाठी गेले.
सन १९११ साली श्रीमहाराज कराडला रामस्थापनेसाठी गेले. श्रीमहाराजांनी रामस्थापना केलेली बरीचशी राममंदिरे याच सुमारासाची आहेत. श्रीब्रह्मानंदांच्या निमंत्रणावरून श्रीमहाराजांनी बिदरहळळी येथे रामाची स्थापना केली. तेरा कोटी रामनाम जपाची सांगताही श्रीमहाराजांच्या उपस्थितीत बिदरहळळी येथे झाली. कुर्तकोटी येथे डॉ. कुर्तकोटींनी केलेल्या तेरा कोटी रामनाम जपाची सांगता श्रीमहाराजांच्या उपस्थितीत झाली. कुर्तकोटीहून श्रीमहाराज रामस्थापनेसाठी सोलापूरला गेले. सोलापूरहून कुर्डूवाडी. पंढरपूर. पुणे असे मुक्काम करत श्रीमहाराज १९१२ सालच्या नोव्हेंबरमध्ये गोंदवल्यास परत आले. शरीर थकत चालले होते. जीर्ण होत होते. बाहेरून पाहिले असता त्यांचे सर्व कार्यक्रम पूर्ववत व्यवस्थित चाललेले आहेत असे वाटे, परंतु त्यांची प्रकृती बरीच क्षीण होत चालली होती. कधीमधी दिसणारी त्यांच्या पायावरील सूज आता नेहमी दिसू लागली, आणि दम्याचे प्रमाण देखील पहिल्यापेक्षा अधिक झाले. ज्योतिषाच्या सांगण्यावरून श्रीमहाराजांनी धर्मशाळेपाशी शनीचे मंदिर बांधले. ' हा देवाचा फौजदार आहे ' असे शनीचे वर्णन ते करीत.
सर्व मंदिराचे एक संस्थान बनवून त्यावर पंच नेमले. त्यांना सर्व व्यवस्था आखून दिली. 'आल्यागेल्याला भाकरी घालावी, आणि आपण सर्वांनी नाम घ्यावे, ' हे मुख्यत: सांगून ठेवले.
रामनवमीचा उत्सव - सन १९१३ साली साजरी झालेली रामनवमी हि श्रीमहाराजांनी साजरी केलेली शेवटची रामनवमी होय.त्यांनी आपल्या सर्व मंडळींना पत्रे धाडून रामनवमीला येण्याविषयी लिहिले.पत्रात ते लिहितात 'मी कदाचित नैमिष्यारण्यात जाईन, म्हणून तुम्हाला एकदा पहावे असे वाटते. '
श्रीमहाराजांचे असे पत्र आल्यामुळे प्रत्येकजण गोंदवल्याला आला. हा रामनवमीचा उत्सव दहा दिवस चालला. पांच हजारावर माणसे चोहोकडून जमा झाली. नऊ दिवस अहोरात्र अखंड नामस्मरण चालू होते, शिवाय कीर्तन, पुराण, प्रवचन, अध्यात्मसंवाद इत्यादी गोष्टी सुरु होत्या. जमलेल्या सर्वांचे केंद्र अर्थातच श्रीमहाराज होते. प्रत्येक मनुष्य त्यांना नमस्कार करण्यास येई; त्यावेळी मोठ्या प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवून श्रीमहाराज त्याला सांगत, ' बाळ, भगवंताने ज्या परिस्थितीत प्रपंचामध्ये आपल्याला ठेवले आहे, तिच्यात समाधान मानावे; पण त्याच्या नामाला कधीही विसरू नये. जो नाम घेईल त्याच्यामागे राम उभा आहे. नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो येवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका ! ' पारण्याला श्रीमहाराजांनी गावजेवण घातले. जवळजवळ दहा हजार पान झाले, आणि सर्व लोकांना, श्रीमहाराजांनी स्वत: देखरेख ठेवून अगदी पोटभर खावयास घातले.
दशमीला लोकांनी श्रीमहाराजांना अहेर केला. कोणी कफनी दिली, कोणी कुबडी दिली, कोणी माळ दिली, कोणी खडावा दिल्या, कोणी अत्तर दिले; कोणी लोकरीचे कपडे दिले, तर कोणी उपरणे दिले, अशा वस्तूंचा ढीग पडला.
उत्सवाला आलेली मंडळी द्वादशीपासून हळूहळू परत जाण्यास निघाली. परत जाणाऱ्या प्रत्येकाला श्रीमहाराजांनी काही ना काही दिले. काही लोकांना कफन्या व खडावा दिल्या व सांगितले, ' माझी आठवण म्हणून हे ठेवा. ' परंतु ' नाम घ्यायला विसरू नकोस.' हे प्रत्येकाला आग्रहाने सांगण्यासही ते विसरले नाहीत.
आताशा, श्रीमहाराजांचे बोलणे चालणे फार सूचक झाले होते. परंतु त्यांची ती मुद्रा, विनोद करण्याचा स्वभाव, देहाला वाटेल त्याप्रमाणे राबविण्याची शक्ती, या गोष्टींमुळे स्वत:च्या अंतकालाबद्दल त्यांनी दिलेल्या आगाऊ सूचनांचा लोकांच्या मनावर फारसा परिणाम झाला नाही हि गोष्ट खरी आहे. दिवसेंदिवस ते झपाट्याने थकत चालले होते. गोंदवल्यास सेवेसाठी येणाऱ्या सगळ्यांच सगळ, अगदी दुखण खुपणही श्रीमहाराज बघत होते. एक दिवस ते भाऊसाहेब केतकरांना म्हणाले, ' भगवंताची सेवा एकपरी सोपी आहे. पण गुरूची सेवा करणे फार कठीण आहे. नाथांनी खरी गुरूची सेवा केली. कल्याणांनी खरी गुरुसेवा केली. स्पष्ट सांगावयाचे म्हणजे खरा शिष्य मिळणे ही कठीण गोष्ट आहे. देहबुद्धी नाहीशी झाल्याशिवाय पूर्ण गुरुसेवा घडत नाही, आणि गुरुसेवेत देह झीजल्यावाचून देहबुद्धी पूर्ण नष्ट होत नाही. '
पंढरपूरचा मुक्काम - पंढरपूरच्या बडव्यांच्या निमंत्रणावरून श्रीमहाराज सन १९१३ च्या जून महिन्यात सुमारे शंभर मंडळींसह पंढरपूरला आले. तेथे गेल्यानंतर काही दिवसांनी गुरुपौर्णिमा आली आणि त्या निमित्ताने पुन्हा बहुतेक सर्व मंडळी दर्शनाला आली. श्रीब्रह्मानंद देखील कर्नाटकातील बरीच मंडळी घेऊन पंढरपूरला आले. ज्याप्रमाणे रामनवमीचा उत्सव गोंदवल्यास फारच लक्षात राहण्यासारखा झाला, त्याचप्रमाणे ही शेवटची गुरुपौर्णिमाही फारच थाटात आणि प्रेमाची झाली.कधी स्वस्थ न बसणारे श्रीमहाराज त्या दिवशी पूजा चालू असता दोन तीन तास अगदी स्वस्थ बसून होते. सर्वांची पूजा आटोपल्यावर सगळ्यांना ( जवळजवळ सातआठशे स्त्रीपुरुष मंडळींना ) खाली बसण्यास सांगून ते म्हणाले, ' बाळांनो ! ज्याच्यावर कोणाची सत्ता चालत नाही, आणि जो कधी कोणापासून लाच घेत नाही, जो गेलेला कधी परत येत नाही, जो जात असताना कोणाला कळत नाही, जो किती गेला आणि उरला हे कोणाला सांगता येत नाही, आणि जो भगवंताशिवाय कोणाला भीत नाही, असा काळ आजपर्यंत कोणाला चुकला नाही. ज्या काळाच्या सत्तेने वस्तू आकार धारण करते त्याच काळाच्या सत्तेने ती अकस्मात मोडली जाते. सर्व दृश्य वस्तूंना हा नियम लागू आहे; मग देह त्यातून कसा सुटेल ? ज्याने भगवंत घट्ट धरून ठेवला,त्याचा देह राहिला किंवा गेला, तरी त्याच्या अवस्थेमध्ये फरक पडत नाही. भगवंत आकाराने नाहीसा झाला, परंतु नामरूपाने जगात शिल्लक उरला म्हणून यापुढे कोणी सांगणारा भेटो, वा न भेटो, तुम्ही सर्वांनी नाम घेतल्याशिवाय राहू नये. जो भगवंताचे नाम घेईल त्याचे कल्याण राम करील, हे माझे सांगणे खरे माना. प्रपंच लक्ष देऊन करा, त्यामध्ये भगवंताला विसरू नका, हाच माझा अट्टाहास. सर्वांनी आनंदात दिवस घालवावा. ' हे बोलत असताना श्रीमहाराजांना मधून मधून भरून येत होते. ऐकणाऱ्या मंडळींच्या डोळ्यांना अश्रूधारा लागल्या होत्या.
पंढरपूरच्या मुक्कामात श्रीमहाराजांचे स्नेही तुकारामबुवा वलव्हणकर यांची भेट झाली. वलव्हणकर हे मठपती होते. ते पंढरपुरास नेहमी येत असत. ते वेदांतशास्त्रात निष्णात असून त्यांची उपासना कडक होती. पुष्कळ लोक त्यांना गुरु मानीत असत. वेदान्तशास्त्र चांगले जाणत असल्याने त्यांचे कीर्तन किंवा प्रवचन फारच वठत असे. ज्ञानेश्वरीवर त्यांचे प्रभुत्व होते. भगवंताच्या नामापेक्षा भगवंताचे रूप श्रेष्ठ आहे असे मोठ्या अट्टाहासाने ते प्रतिपादन करीत. याच विषयाला अनुसरून श्रीमहाराजांच्या बरोबर झालेल्या वाद-संवादात त्यांनी वलव्हणकरांना रूपापेक्षा नाम श्रेष्ठ आहे हे नुसते पटवून दिले नाही तर नामाचे महात्म्य त्यांच्या मनी ठसविले. निरोप घेण्यापूर्वी ते श्रीमहाराजांच्या पाया पडले.
पंढरपूरला श्रीमहाराज जवळपास चार महिने होते. श्रीब्रह्मानंदही त्या काळात त्यांच्याबरोबरच होते. श्रीमहाराजांचा निरोप घेतेवेळी त्या दोघांचे एकांतात बोलणे झाले. स्वत:च्या आयुष्यात आपण काय काय गोष्टी केल्या हे श्रीब्रह्मानंदांना सांगून, आपण यापुढे लवकरच शांत होणार असे त्यांना सुचविले. श्रीब्रह्मानंद मान खाली घालून व हात जोडून मुकाट्याने सर्व ऐकून घेत होते; पण आपण थोड्या दिवसांनी इहलोक सोडणार हे श्रीमहाराजांनी सांगितल्यावर त्यांच्या काळजात चर्र झाले, आणि त्यांच्या सारख्या वैराग्यशील पुरुषाच्या डोळ्यांना टचकन पाणी आले. श्रीमहाराजांचे बोलणे संपल्यावर श्रीब्रह्मानंदांनी त्यांच्या पायावर मस्तक ठेवले. त्यावेळी ' या बर बाळ ! ' असे फार प्रेमाने बोलून श्रीमहाराजांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरविला. श्रीब्रह्मानंदांनी त्यांना एकदा डोळे भरून पाहून घेतले आणि लगेच तोंड फिरवून गाडीत जाऊन बसले.
श्रीब्रह्मानंदांनी पंढरपूर सोडल्यावर मात्र श्रीमहाराजांनी बरोबर असलेल्या पुष्कळशा मंडळींना हळूहळू घरी पाठवून देण्यास आरंभ केला. दोनशे मंडळींपैकी फक्त पन्नाससाठ माणसे राहू दिली; आणि मग आपण स्वत: सप्टेंबर महिना अर्धा संपल्यावर गोंदवल्यास परत आले.
गोंदवल्यास जेमतेम ८-१० दिवस राहून श्रीमहाराज कुरवलीच्या दामोदरबुवांच्या बरोबर त्यांनी कुरवलीस बांधलेले राममंदिर पहावयास गेले. श्रीमहाराजांचे जंगी स्वागत झाले. दर्शनास मोठा समुदाय लोटला. बरोबरच्या उरलेल्या बऱ्याच मंडळींना आपापल्या घरी पाठवून दिले आणि फक्त मोजकी चार-पाच माणसे बरोबर घेऊन ते गोंदवल्यास परत आले. श्रीमहाराज निरवा निरव करीत असावेत हे बरोबरच्या लोकांना जाणवत होते. अगदी निकट सहवासात असणारी तेव्हढीच मंडळी तेथे उरली.
अलीकडे श्रीमहाराजांच्या बोलण्यात, ' आपण लवकरच जाणार ' अशी भाषा येत असे. तसेच ' येणारा काळ कठीण व वाईट आहे, सांभाळा रे सांभाळा, कली फार मातेल, महागाई फार वाढेल, स्वार्थ फार बोकाळेल, अनीतीला जोर चढेल, भगवंताचा विसर पडेल, आणि रोगराई खूप पसरेल.' असेही ते सारखे लोकांना सांगत. यावर एकदा अम्माने प्रश्न विचारला, ' महाराज, हा पुढे येणारा काळ जर वाईट आहे तर आपण लवकर जाण्याची भाषा का बोलता ? ' हा प्रश्न ऐकून श्रीमहाराज किंचित हसले व बोलले, ' माय, तुम्ही विचारलेला प्रश्न मार्मिक आहे. कितीही मोठा सत्पुरुष तरी त्याने देह धारण केला म्हणजे त्याला थोडे तरी जडाच्या मर्यादेने वागावे लागतेच. प्रत्यक्ष परमात्मा असून देखील श्रीकृष्णाला देह धरल्यानंतर दुर्योधनाची बुद्धी पालटता आली नाही. पण देह सोडल्यावर सत्पुरुषांचे सूक्ष्माच्या साम्राज्यातच वास्तव्य असल्याने जगाची बुद्धी पालटण्यात त्यांना जास्त यश येऊ शकते; आणि ज्यावेळी ज्या गोष्टीची जरूर असते तीच गोष्ट ते करीत असतात. आता समजले ना ! ' अम्मा ' होय ' म्हणाली आणि तो विषय तेथेच थांबला.
बापूसाहेब साठ्ये यांच्याबरोबर फडके नावाचे एक सब जज्ज श्रीमहाराजांच्या दर्शनास आले. श्रीम्हाराजांबरोबर त्यांचा झालेला संवाद आणि श्रीमहाराजांनी व्यक्त केलेले विचार उद्बोधक आहेत. फडके विचारतात, ' सुधारलेल्या लोकांची संस्कृती आणि सुधारणा आपल्याला मान्य नाही काय ? ' श्रीमहाराजांनी उत्तर दिले, ' माझ्यासारख्याची गोष्ट सोडून द्या, पण जे संत असतात तेच खरे सुसंस्कृत आणि सुधारलेले लोक समजावेत. जी कृती सर्व बाजूंनी हिताची असते तीच संस्कृती होय; आणि 'सु' म्हणजे शिव, चांगले, त्याची धारणा करणारी सुधारणा होय. भगवंताकडे नेणारी कृती हीच एकटी सर्व बाजूने हिताची असते कारण, हित म्हणजे कल्याण, आणि भगवंत तर कल्याणाचे निधान आहे. म्हणून ज्या कृतीच्या आरंभी, मध्ये आणि शेवटी भगवंत भरलेला आहे ती कृती संस्कृती होय. आपल्या कृतीमध्ये भगवंत कसा भरता येईल ? ते करणे सोपे आहे. प्रत्येक कृतीमध्ये कर्म करणारा, कर्म करण्याचे साधन, आणि प्रत्यक्ष कर्म, अशा तीन गोष्टी असतात, यापैकी कर्म आणि त्याचे साधन हे जडच असते. पण कर्म करणारा मात्र सचेतन जीव असतो. अर्थात कर्मामध्ये भगवंत भरायला कर्म करणारा जीव भगवंताने भरून गेला पाहिजे. जिवामध्ये भगवंत भरायला जीवाने आपली दारे उघडी टाकली पाहिजेत. या सगळ्याचा अर्थ असा कि जो जीव मीपणाने मरून भगवंताच्या स्मरणात विरून गेला तोच भगवंताने भरून राहिला. अशा लोकांना संत म्हणतात; आणि ते जी जी कर्मे करतात ती ती भगवंताच्या प्रेरणेनेच आणि भगवंतासाठीच असल्यामुळे त्या कर्माच्यापासून जगाचे कल्याण घडते. संतांच्या प्रत्येक कर्मामध्ये तुम्हाला प्रेम, दया, परोपकार, नि:स्वार्थीपणा, आणि भगवंताची निष्ठा याच गोष्टी आढळून येतील.'
त्याचप्रमाणे सुधारणा म्हणजे जे शिव आहे किंवा जे मंगल आहे त्याची धारणा होय. जे खरे मंगल आहे त्यामध्ये अमंगलाचे नावदेखील असता कामा नये. या जगातली अशी एक तरी वस्तू मला दाखवा की जी सर्वस्वी मंगल आहे ! या दृश्य जगातली कोणतीही वस्तू अशी पूर्ण मंगल असणे शक्यच नाही. कारण, जग हे त्रिगुणात्मक असल्यामुळे जेथे चांगले तेथे वाईट असते, जेथे उजेड तेथे अंधार असतो, जेथे मंगल असते तेथे अमंगल असते. जर दृश्य वस्तूमध्ये मंगल नाही तर ते सुक्ष्मातच असले पाहिजे. रूप हे दृश्य आहे आणि नाम हे सूक्ष्म आहे म्हणून भगवंताच्या नामाइतके पूर्ण मंगल असे दुसरे कोणतेही नाही. अर्थात ज्याने भगवंताचे नाम आपल्या अंतरात धारण केले तोच खरा सुधारलेला मनुष्य होय. साहेबासारखे खाणे व पिणे, त्यांच्यासारखे कपडे घालणे, त्यांच्यासारखे व्यवहार करणे, हे सुधारणेचे लक्षण नसून, भगवंताच्या नामाची आवड उत्पन्न होऊन ते घ्यावेसे वाटणे हे खरे सुधारणेचे लक्षण आहे. '
सुधारणा आणि संस्कृती यासंदर्भात श्रीमहाराजांचे विचार ऐकून फडके थक्कच झाले तरी त्यांना एक शंका होती की, नवनव्या शोध, सुधारणांमुळे होणाऱ्या सोयी यामुळे मनुष्याची सुधारणा व्हायला काही उपयोग नाही का ? या प्रश्नावर श्रीमहाराज सांगतात, ' नवीन नवीन शोध लागत आहेत आणि त्यामुळे नवीन सोयी होत आहेत हे स्पष्टच दिसते आहे. पण यामुळे मनुष्य खरोखर सुखी झाला आहे काय ? अधिक सुखी बनणे हेच सुधारणेचे फळ आहे. साहेबाच्या नव्या शोधांनी मनुष्याच्या देहाला सुख मिळेल, परंतु खरे सुख मनाच्या अवस्थेवर अवलंबून असल्याने असे शोध कितीही लागले तरी मनुष्य खरा सुखी होणार नाही. ' मध्येच फडके म्हणाले, ' अहो, याचा अर्थ असा की आपण देहाच्या सुखसोयींना महत्त्व देत नाही.' श्रीमहाराज लगेच बोलले, ' महत्त्व का देत नाही ? देहाला आम्ही महत्त्व देतो, पण वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देत नाही. परमार्थाचे साधन देखील जर देहावर अवलंबून आहे तर देहाला महत्त्व न देऊन कसे चालेल ? परंतु देहाला सर्वस्व मानून आणि त्याला सुखात ठेवण्याच्या नदी लागून आत्म्याची कुचंबणा करणे हे आत्मघाताचे लक्षण आहे. तुम्ही सध्या जिला सुधारणा म्हणता तिचा प्रवाह या दिशेने जोराने वहात आहे. सर्व जग त्यात गुरफटले जात असून आणखी पाचपन्नास वर्षांनी या सुधारणेची कडू फळे खाण्याचा प्रसंग आल्याशिवाय राहणार नाही.' पुन्हा फडक्यांनी विचारले, ' महाराज, आपले विचार फारच खोल आणि व्यापक आहेत, पण या पुढे होणाऱ्या विनाशापासून वाचण्याचा काही मार्ग आहे का ? श्रीमहाराज म्हणाले,' का नाही ? मार्ग आहेच आहे ! प्रत्येकाने, निदान ज्याला प्रपंचाला पुरेसे मिळत आहे त्याने तरी, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानून आपले लक्ष भगवंताकडे वळविले आणि आपला काल त्याच्या नामात घालविला तर जगातला द्वेष, मत्सर, लोभ आणि क्षोभ पुष्कळ कमी होतील आणि सामान्य मनुष्य सुखी राहील. खरे ना ? '
' मी आजपासून नाम घेत जाईन ! ' असे म्हणून फडके निघून गेले.
|| जय जय रघुवीर समर्थ ||
No comments:
Post a Comment