|| श्रीराम समर्थ ||
|| श्रीसद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज समर्थ ||
संत महात्मे भगवंताचे भजन कसे करतात हे भगवंत सांगत आहेत.-
सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता: |
नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ||गीता अ. ९-१४ ||
ते दृढनिश्चयी भक्तजन निरंतर माझ्या गुणांचे व नामाचे कीर्तन करित आणि माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करित व मला वारंवार नमस्कार करित सदा माझ्या ध्यानात निमग्न होऊन अनन्यभक्तीने माझी उपासना करतात.
श्रीमहाराजांनी भगवंताशी अनन्य होऊन ' मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझे आहेत ' असा संबंध जोडून आयुष्यभर रामरायांच्या गुणांचे व नामाचे कीर्तन केले. शरीराने, वाणीने, मनाने, इंद्रियांनी, बुद्धीने त्यांनी जे जे केले ते रामरायाशी नित्ययुक्त होऊन केले, शरणागत भावाने केले.
भगवंताची उपासना - लोक मनापासून नाम घेऊ लागलेले पाहून श्रीमहाराजांना समाधान झाले. भगवंताच्या उपासने संदर्भात ते उद्गारले, ' नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्यजन्माचे ध्येय नव्हे. जनावरेदेखील आपापला प्रपंच करतात. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातल्या कष्टांचे सार्थक होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा उपाय नाही. म्हणून इतका खटाटोप मी करून दाखवतो. प्रत्येकाने नाम घ्यावे हि माझी इच्छा आहे. रामरायाने माझी इच्छा पूर्ण केली. '
' नि:स्वार्थीपणामध्ये मनुष्यजीवानाचे सार्थक आहे हे सर्वांस समजते; परंतु जोपर्यंत त्याला भगवंताचे अधिष्ठान नसते तोपर्यंत त्याच्यापासून मनुष्याला खरी निष्कामता व खरे समाधान मिळत नाही. आणि ही जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत कोणालाही शांती व कृतकृत्यता प्राप्त होत नाहीत. प्रपंचाची घडी बिघडू न देता भगवंताची उपासना करणे असेल तर त्याचे नामच घेणे अवश्य आहे. '
साधनचतुष्टय - ' मला ब्रह्म दाखवा ' असा हट्टाग्रह करणाऱ्या एका साधकास उद्देशून केलेल्या एका निरुपणात श्रीमहाराज सांगतात, ' परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो. शास्त्रात चार प्रकारचे साधन सांगितले आहे. प्रथम नित्यानित्यवस्तूविवेक करावा. अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे. नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे. नंतर या जगातली किंवा स्वर्गातली भोगवासना नाहीशी करावी. हे दुसरे साधन होय. आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते, तेथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे. आपण चूक केली नसतानासुद्धा कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे, हे तिसरे साधन होय. शेवटी भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूंच्या भेटीची खरी तळमळ लागावी. हि सर्व साधनसामुग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल. '
भगवंताचे अनुसंधान - श्रीमहाराजांच्या सांगण्यावरून काही तरुणांनी खोदलेल्या विहीरीला श्रीमहाराजांनी, 'जानकीजीवन स्मरण जय जय राम ! पाणी लागेल, चल मार कुदळ ' असे म्हणताच कुदळ मारल्यावर पाण्याचा झोत वर आला ! सर्वांना आनंद झाला पण श्रीमहाराज बोलले, ' भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य आहे. त्याचे नाव घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही; परंतु भगवंत त्याची लाज राखील यात शंका नाही. प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे. '
रामाची इच्छा - श्रीमहाराज सांगतात, ' रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुखदु;ख भोगावे लागते. पण ते आपल्याला सर्वांच्या शेवटी आठवते म्हणून सुखदु:ख भोगावे लागते.म्हणून आपण सुरवातीपासून रामाची इच्छा लक्षात ठेऊन वागू. यासाठी त्याच्या नामाची गरज आहे. '
प्रपंचाची तऱ्हा - एका प्रसंगी श्रीमहाराज म्हणाले, ' प्रपंचाची तऱ्हा हि अशी आहे. आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले की लगेच उद्या दु:खाचे ताट पुढे वाढून ठेवलेले असते. म्हणून एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दु:खाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दु:ख का मानावे ? शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे, आणि बरा वाईट प्रसंग येईल त्याला सामील होऊन जावे. '
रामरायाने अश्रू गाळले- गोंदवल्यास श्रीरामाने तीनदा अश्रू गाळले. सन १८९७ साली श्रीमहाराज एकाएकी नैमिष्यारण्यात जाण्यासाठी निघाले त्यावेळी रामरायाच्या डोळ्यातून अश्रुपात झाला. सन १९०९ साली श्रीमहाराजांना प्लेग झाला त्यावेळी दुसऱ्यांदा रामाच्या डोळ्यात पाणी आले; आणि सन १९१३ साली २० डिसेंबर रोजी, म्हणजे श्रीमहाराजांनी देह ठेवण्या अगोदर चार दिवस, श्रीमहाराज भजन करीत असता पुन्हा तिसऱ्यांदा रामरायाच्या डोळ्यात पाणी आले.
सन १९०९ साली गोंदवल्याच्या आसपासच्या गावामध्ये प्लेगने धुमाकूळ मांडला होता. एके दिवशी संध्याकाळी श्रीमहाराजांना सपाटून ताप भरला. रात्रीतच त्यांच्या गळ्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठ्या गांठी येऊन गळा खूप सुजला. श्रीमहाराजांना प्लेगची लागण झाली होती. शरीर तापाने फणफणत होते. श्रीमहाराज असह्य झाल्याने कण्हत असत. एके दिवशी गणपतराव दामलेंच्या लक्षात आले की रामाच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. श्रीमहाराजांना हे सांगताच तशा तापातच त्यांनी सोवळ्याची लंगोटी नेसून मऊ रुमालाने रामाचे डोळे पुशीत ते रामाला म्हणाले, ' रामा ! मला ताप आला म्हणून तुला इतके का वाईट वाटते ? मला बरे वाटेल ! ' जवळजवळ पंचवीस मिनिटे रामाच्या डोळ्यातून पाणी येत होते. पाणी येण्याचे थांबल्यावर श्रीमहाराजांनी रामाचे कपडे बदलले. श्रीमहाराज खोलीत परत जाण्यास निघाले तेव्हा इतकेच बोलले, ' ही गोष्ट बाहेर कुणाला कळवू नका. उद्या रामाला दुधाचा अभिषेक करावा. '
असली बातमी पसरल्यावाचून रहात नाही. त्याकाळात या घटनेची बातमी ' केसरी ' वृत्तपत्रात छापून आली होती.
श्रीमहाराजांनी मनातले ओळखले - गोंदवल्यास स्वैंपाकघरामध्ये खऱ्या काम करणाऱ्या तीन बायका होत्या. पहिली मुक्ताबाई, दुसरी गंगुताई, आणि तिसरी काशीताई. इतरही स्त्री-पुरुष त्यांच्या मदतीला असत पण या तिघीजणी देहाकडे न पाहता चुलीपाशी खपत असत. एकेकजण आठ आठ पायली पिठाच्या भाकऱ्या भाजीत. मुक्ताबाई ही बालविधवा असून श्रीमहाराजांच्या दूरच्या नात्यातली होती. या तिघीजणींवर श्रीमहाराजांचे विशेष लक्ष असे.एकदा सकाळी मुक्ताबाई दत्तमंदिरात बसली असता सहज तिच्या मनात आले की आज आपण गव्हाची खीर खावी. सहज आलेला हा विचार ती विसरून देखील गेली. पण इकडे राममंदिरात श्रीमहाराज स्वैंपाकघरात गेले आणि म्हणाले, ' गंगुताई आज रामाला नैवेद्यासाठी गव्हाची खीर करा. ' रामाला नैवेद्य दाखविल्यावर श्रीमहाराजांनी गंगुताईकडून एक मोठे फुलपात्र भरून खीर घेतली, त्यावर झाकण घातले, आणि ती घेऊन स्वत: दत्तमंदिरात जाऊन मुक्ताबाईला ते म्हणाले, ' मुक्ताबाई, ही घे खीर ! पोटभर खा हं ? आणखी लागली तर निरोप पाठव. ' सहज मनात आलेली गोष्ट श्रीमहाराजांनी इतक्या प्रेमाने पुरविलेली पाहून मुकताबाईच्या डोळ्यांना पाणी आले. ती म्हणाली, ' महाराज, माझ्या बापानेदेखील असे माझे लाड पुरविले नाहीत; मी आपल्याला काय सांगू ? '
एकदा गोंदवल्यास निरुपणाला बसले असता श्रीमहाराज म्हणाले, ' एखादी गोष्ट मला सांगावी असे जर तुम्हाला वाटले तर ती तुम्ही मारुतीला सांगा, म्हणजे ती मला आपोआप कळेल. '
श्रीमहाराजांना दम्याचा विकार - विषप्रयोग झाल्यापासून श्रीमहाराजांना जोराचा दमा सुरु झाला. एकदा दमा सुरु झाला म्हणजे सबंध रात्रभर त्यांना जागरण होई. इतकेच नव्हे तर पुष्कळ वेळा पलंगाच्या बाजूला उभे राहून तक्क्यावर डोके ठेवून सारी रात्र घालवावी लागे. दहाबारा तास उभे राहिल्यामुळे पाय भारावून त्यांच्यावर चांगली सूज येई. तरी त्यांचे सर्व व्यवहार यथासांग चालू असायचे. त्यांचा दमा सर्वस्वी त्यांच्या ताब्यात होता. श्रीमहाराज भजनाला उभे राहताच दमा कोठच्या कोठे पळून जाई. भजन संपताच थांबलेला दमा पूर्ववत सुरु होई. श्रीमहाराज म्हणत, ' तो आपल्या कामाच्या वेळी त्रास देत नाही ना ! मग आता येईना का बिचारा ! '
' जग हे असे आहे ! ' - एकदा संध्याकाळी नदीकडून परत येताना श्रीमहाराजांना दमा सुरु झाला. दम्याचा जोर इतका होता की पाहता पाहता त्यांनी डोळे फिरविले आणि ते पूर्ण बेशुद्ध झाले. हळू हळू शरीर थंड झाले, श्वास बंद होता आणि जिवंतपणाचे कोणतेच लक्षण आढळेना असे झाले. सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. लोकांचा धीर सुटून बायाकापुरुष हळूहळू रडू लागण्यास आरंभ झाला. अलीकडेच अनुग्रह घेतलेल्या सांगलीच्या एका बाईंच्या कानावर ही गोष्ट जाताच त्या धावत मंदिरात आल्या आणि मोठ्याने हंबरडा फोडून रडत रडत म्हणाल्या,
' महाराज ! तुम्ही गेलात हे ठीक आहे पण मी ठेवायला दिलेल्या माझ्या दागिन्यांच्या डब्याचे काय ? ' ती बाई असे म्हणाली मात्र, श्रीमहाराजांनी मान सरळ करून डोळे उघडले, ते मिस्कीलपणे थोडे हसले आणि तिला म्हणाले, ' बाई ! मी मेलो नाही, मी जिवंत आहे.तुमचा दागिन्यांचा डबा तुम्हाला परत देईन आणि मगच जाईन.मग मला जायला हरकत नाही ना ? ' या प्रसंगाने दागिन्यांचा डबा मागणारी बाई वरमली.
काहीवेळापूर्वी सर्व मंदिरात असलेले उदासीन व शोकाकुल वातावरण पालटले. श्रीमहाराजांचे बोलणे ऐकून सर्व मंडळी पोटभर हसली.उपस्थित सर्वांना उद्देशून श्रीमहाराज बोलले, ' जग हे असे आहे ! ज्या साधूच्या प्रारब्धात काही नसेल त्याचाच प्रपंची लोकांशी संबंध येतो. प्रपंची माणसे अत्यंत स्वार्थी असतात, त्यांचा स्वार्थ यत्किंचित न बिघडता त्यांना परमार्थ पाहिजे असतो. हे कसे शक्य आहे ? अत्यंत नि:स्वार्थी बनणे याचे नाव परमार्थ आहे. तो साधायला थोडा तरी स्वार्थ सोडायला तयार व्हावे. साधूसंतांच्याकडे जाऊन हेच शिकायचे असते. प्रपंचावर सर्वस्वी पाणी सोडा असे कोणीच सांगत नाही, आणि असे सांगितले तरी कोणी ऐकत नाही; पण निदान प्रपंच म्हणजे आपला स्वार्थीपणा, हेच आपले सर्वस्व मानू नका असे संत सांगतात ते काही गैर नाही. स्वार्थ कमी होण्यासाठी वासना कमी झाली पाहिजे; वासना कमी होण्यासाठी भगवंताची कांस धरली पाहिजे; भगवंताची कांस धरण्यासाठी त्याचे अनुसंधान ठेवले पाहिजे; आणि त्याचे अनुसंधान टिकविण्यासाठी त्याचे नाम घेतले पाहिजे. म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेत जावे. ज्याला नामाचे प्रेम लागले त्याला भगवंताचे दर्शन घडेल ! '
लोकसंग्रह - सरकारने श्रीमहाराजांना पंचक्रोशीपुरते धर्माचार्यांचे अधिकार दिले होते. भाऊसाहेब केतकर, बापूसाहेब साठ्ये, बापूसाहेब खरे, अप्पासाहेब भडगांवकर, वगैरे मंडळींना श्रीमहाराज ' माझे कौन्सिल ' असे म्हणत आजूबाजूच्या गावातले पुष्कळ तंटे त्यांच्याकडे येत, आणि ते एखाद्या न्यायाधीशाप्रमाणे मध्ये बसून दोन्ही बाजू ऐकून घेत. तंटा करणाऱ्यांपैकी खरा कोण व खोटा कोण हे अंतर्ज्ञानामुळे श्रीमहाराजांना तत्काळ कळत असे. म्हणून ते अशा खुबीने तंटा तोडीत की, त्यामुळे दोन्ही बाजू समाधान पावून घरी जात. जाताना प्रत्येकाला जेवण मिळे !
आपल्याकडे येणाऱ्या कोणत्याही माणसाचा अव्हेर करावयाचा नाही हे श्रीमहाराजांच्या लोकसंग्रहाचे प्रधान तत्त्व होते. त्यामुळे काही निमित्ताने त्यांचा निंदक जरी त्यांच्याकडे आला तरी ते त्याच्याशी फार प्रेमाने वागत. तीच रीत व्यसनी माणसाशी वागताना पाळत असत. याचा परिणाम असा होई की तो मनुष्य आपोआप त्यांना वश होऊन जाई, आणि एकदा वश झाला की त्याला भगवंताच्या मार्गावर नेऊन सोडण्याची त्यांची करामत त्याला अनुभवायला सापडे.
आपल्या प्रपंचात असणारी उणीव भरून काढणे हेच श्रीमहाराजांचे काम आहे या भावनेने गोंदवल्यास येणाऱ्या मंडळींची निराशा होई. त्यांच्यापासून अपमान, अपवाद, अपकीर्ती आणि अपघातदेखील श्रीमहाराजांना सोसावे लागले, पण हे सर्व त्यांनी मोठ्या सहजवृत्तीने सोसलं.
गोंदवल्यास त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसावर श्रीमहाराज पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करीत. एका वर्षी दिवाळीला पुष्कळ मंडळी गोंदवल्यास जमली. कर्नाटकातून श्रीब्रह्मानंददेखील बरीच मंडळी घेऊन आले होते. दिवाळीच्या दिवशी सकाळी श्रीमहाराज स्वत: पहाटे उठले आणि त्यांनी लवकर पाणी तापविण्याची व्यवस्था करून सर्वांना आपल्या हाताने स्नान घातले. नंतर सर्व मंडळींनी त्यांना स्नान घातले. त्यांचे स्नान चालू असता मुक्ताबाईच्या मनात आले की, ' मलाही महाराजांना दोन तांबे घालायला मिळाले तर किती छान होईल ! ' इकडे त्यांचे स्नान बहुतेक संपले होते तरी ते म्हणाले, ' मुक्ताबाई ! मला थंडी वाजते आहे. दोन तांबे कढत पाणी आणून घाल ! ' तिने चटदिशी घंगाळ भरून आणले आणि त्यांना मनसोक्त पाणी घातले आणि तिचे अगदी समाधान झाले.
सोलापूरची रामस्थापना - बिदरहळळीहून श्रीमहाराज कुर्तकोटीला गेले. चार दिवस राहिल्यावर ते विजापूरवरून सोलापूरला आले. सोलापूरला भाऊसाहेब जवळगीकर यांनी बांधलेल्या मंदिरामध्ये रामाची स्थापना झाली. सोलापूरहून श्रीमहाराज कुर्डुवाडीला गेले. तेथे दोन दिवस मुक्काम झाल्यावर ते एकाएकी पंढरपूरला आले. पंढरपुरात बडवे आपापसात तंटा करू लागले होते त्यामुळे पांडुरंगाची महापूजा बंद पडण्याची वेळ आली होती. देवस्थानची आबाळ होत होती. कलेक्टरने श्रीमहाराजांना पत्र धाडून तंटा मिटविण्याची विनंती केली होती. श्रीमहाराजांनी तंटा करणाऱ्या बडव्यांना बोलावून आणले आणि तंटा होण्याचे मूळ कारण शोधून काढले आणि सामोपचाराने तंटा मोडला व तसे कलेक्टरला कळविले. पुढे काही दिवस ते पंढरपूरला राहिले.
पंढरपुराहून सरळ गोंदवल्यास न जाता श्रीमहाराज पुण्यास गेले. तेथे सर्व मंडळींची भेट घेऊन प्रत्येकास नामाचा आधार न सोडण्याविषयी बजावून सांगितले. दोन दिवस पुण्यास मुक्काम करून ते गोंदवल्यास निघाले.
राममंदिराची स्थापना - श्रीमहाराजांनी पुष्कळ ठिकाणी रामाची मंदिरे स्थापन केली. आपण सामान्यपणे समजतो त्यापेक्षा मंदिराविषयी त्यांची कल्पना निराळी होती. ज्याप्रमाणे विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केंद्र असते त्याचप्रमाणे मंदिर हे अलौकिक म्हणजे अध्यात्मविद्येचे केंद्र असले पाहिजे.आपल्या आचारधर्माचे आणि परंपरेचे रक्षण करणे हे मंदिराचे काम असून त्यात राहणारे लोकदेखील त्या पेशाला लायक असेच असावेत. मंदिरात अध्यात्माचे श्रवण व मनन चालावे. जो साधक असेल त्याला साधन करण्यास ते योग्य स्थान असावे.प्रपंचाच्या त्रासाने कष्टी झालेल्या जीवाला मंदिरात आल्यानंतर स्वत:च्या दु:खाचा काही काळ तरी विसर पडावा असे तेथील वातावरण असावे. मंदिरात नियमित अन्नदान व नियमित उपासना चालू असावी. सारांश, मंदिर हे मोठे पवित्र स्थान असले पाहिजे. मंदिरात गेले की भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे !
' भजन मनापासून घडावे ' - भजन कसे असावे हे श्रीमहाराज सांगतात, ' माझे भक्त जेथे माझे भजन करतात तेथे मी हजर आहे हे भगवंताचे वचन पूर्ण खरे आहे. पण आपण भजन जे करतो ते भजनाचे सोंग होते, म्हणून भगवंत देखील आपल्याकडे तितपतच लक्ष देतो. भजन कसे मनापासून घडावे ! प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे आणि आपले म्हणणे ऐकतो आहे अशा खऱ्या भावनेने भजन म्हणावे. अशा प्रकारच्या भजनाने उपासनेला जोर चढतो. खऱ्या भजनाला तालसूर लागत नाहीत; त्याला प्रेमळपणा लागतो,तसे नसते तर तुकारामबुवा आधी गाणे शिकले असते ! '
बिदरहळळी रामस्थापना व जपाची सांगता - श्री ब्रह्मानंदांनी कर्नाटकात बिदरहळळी या गावी रामाची स्थापना करण्यासाठी श्रीमहाराजांना आमंत्रण केले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे श्रीमहाराज लगेच जाऊ शकले नाहीत. शेवटी श्रीमहाराज एकदाचे निघाले.त्यांची प्रकृती त्या वेळीही फारशी बरी नव्हती. बापूसाहेब साठ्ये यांना लिहिलेले त्यावेळचे एक पत्र उपलब्ध आहे, त्यावरून ते किती थकले होते याची कल्पना येईल. त्यातील मजकूर असा - ' विशेष लिहिण्याचे कारण की मी ब्रह्मानंदबुवांच्या इकडे प्राणाच्या कराराबरोबर आलो आहे. जीविताची आशा सोडून मी आलो आहे. दररोज ताप चार डिग्री येतो. श्वास फार झाला आहे. अन्न खाववत नाही. जिना चढून जाण्याची शक्ती उरली नाही. असे झाले आहे. परंतु भागवतांनी ( डॉ. कुर्तकोटी यांना श्रीमहाराज ' भागवत ' किंवा ' महाभागवत 'संबोधित ) व ब्रह्मानंदबुवांनी तेरा कोटी जप केला आहे. याशिवाय दोन ठिकाणी श्रीरामाच्या मूर्तींची स्थापना होणार आहेत. एवढ्याचकरिता देह गेला तरी हरकत नाही असे समजून मी आलो आहे. माझ्याबरोबर सुमारे तिनशे मंडळी आहेत...... '
बिदरहळळी येथील रामाची स्थापना व जपाची सांगता हा समारंभ श्रीमहाराजांच्या उपस्थितीत संपन्न झाला तीन महिने अन्नदान चालू होते. श्रीमहाराजांच्या पूर्वायुष्यामध्ये त्यांनी कलकत्ता येथे केलेल्या 'हरिहाटा'ची आठवण होण्यासारखे भजन व अन्नदान बिदरहळळीला झाले. त्यानंतर इतका मोठा समारंभ त्या भागामध्ये झाला नाही.सोलापूरची रामस्थापना - बिदरहळळीहून श्रीमहाराज कुर्तकोटीला गेले. चार दिवस राहिल्यावर ते विजापूरवरून सोलापूरला आले. सोलापूरला भाऊसाहेब जवळगीकर यांनी बांधलेल्या मंदिरामध्ये रामाची स्थापना झाली. सोलापूरहून श्रीमहाराज कुर्डुवाडीला गेले. तेथे दोन दिवस मुक्काम झाल्यावर ते एकाएकी पंढरपूरला आले. पंढरपुरात बडवे आपापसात तंटा करू लागले होते त्यामुळे पांडुरंगाची महापूजा बंद पडण्याची वेळ आली होती. देवस्थानची आबाळ होत होती. कलेक्टरने श्रीमहाराजांना पत्र धाडून तंटा मिटविण्याची विनंती केली होती. श्रीमहाराजांनी तंटा करणाऱ्या बडव्यांना बोलावून आणले आणि तंटा होण्याचे मूळ कारण शोधून काढले आणि सामोपचाराने तंटा मोडला व तसे कलेक्टरला कळविले. पुढे काही दिवस ते पंढरपूरला राहिले.
पंढरपुराहून सरळ गोंदवल्यास न जाता श्रीमहाराज पुण्यास गेले. तेथे सर्व मंडळींची भेट घेऊन प्रत्येकास नामाचा आधार न सोडण्याविषयी बजावून सांगितले. दोन दिवस पुण्यास मुक्काम करून ते गोंदवल्यास निघाले.
|| जय जय रघुवीर समर्थ ||
No comments:
Post a Comment